Type to search

उत्तर प्रदेशात वारे कसे फिरणार?

ब्लॉग

उत्तर प्रदेशात वारे कसे फिरणार?

Share

केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. यावेळची निवडणूक त्यास अपवाद नाही. पण उत्तर प्रदेशातील निवडणुकीचा रंग आणि ढंग नेहमी वेगळा राहिला आहे. पाच वर्षांपूर्वीची मोदी लाट यावेळी फार दिसत नाही. समाजवादी व बसपने सोशल इंजिनिअरिंग केले आहे. तर काँग्रेसची नजर ब्राह्मण, रजपूत-बनिया, मागासवर्गीय आणि मुस्लीम समुदायांवर आहे. निवडणुकीचे सात टप्पे पूर्ण होईपर्यंत वार्‍याची दिशा काय असेल याची उत्सुकता तर आहेच.

मोठ्या निवडणूक उत्सवाचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. सर्व राज्यांमध्ये निवडणुकांची धूळवड, गुलाल उधळण सुरू आहे. पण निवडणुकीचा खरा रणसंग्राम आहे तो उत्तर प्रदेशात. येथे सातही टप्प्यात कुठे ना कुठे मतदान चालणार आहे. कारण केंद्रातील सत्तेचा निर्णय आणि मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो, हा आजवरचा अनुभव आहे. यावेळची निवडणूक त्यास अपवाद नाही. लोकसभेच्या सर्वाधिक म्हणजे 80 जागा एकट्या उत्तर प्रदेशच्या आहेत. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेवर भाजपने त्यापैकी 72 जागा जिंकल्या होत्या. मायावती यांचा बहुजन समाज पक्ष भुईसपाट झाला होता. काँग्रेसची धूळधाण उडाली होती. फक्त तत्कालीन पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी निवडणूक जिंकले. समाजवादी पक्ष मुलायमसिंह परिवारासकट 5 जागा जिंकू शकला. मात्र यावेळी या राज्यात चित्र वेगळे आहे.

भाजपने विकासाबरोबरच राष्ट्रीय सुरक्षिततेचा अजेंडा जनतेसमोर ठेवला आहे. तर काँग्रेस पक्षाने हिंदुत्वावर मवाळ भूमिका घेत शेतकरी व तरुण वर्गासंबंधित मुद्दे उचलून धरले आहेत. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष व राष्ट्रीय लोकदल उत्तर प्रदेशातील प्रादेशिक पक्षांसाठी जनतेच्या मुद्यांपेक्षा स्वत:च्या अस्तित्वाचा प्रश्न मोठा आहे.

उत्तर प्रदेशाच्या निवडणूक रणांगणात कुणाचे पानिपत होते आणि कोण बाजी मारतो ते बघायचे. कारण येथील युद्धभूमीवर जुने जाणते सेनापती, योद्धे आहेत. तसेच नवीन सेनानी आणि ताज्या दमाचे सैनिकही आहेत. प्रत्येक मतदारसंघात सुमारे दीड लाख नवे मतदार आहेत. सध्याच्या आर्थिक आव्हानांवर उपाय काढण्याचे, न्यायाचे काँग्रेसचे आश्वासन तर दुसरीकडे राष्ट्रवादाचा भावनिक मुद्दा यापैकी युवक आणि शेतकरी कुणाला झुकते माप देतात की जातीला, धर्माला चिकटून राहतात यावर बरेच काही अवलंबून असेल.

उत्तर प्रदेश म्हणजे अठरा पगड जातीपातींच्या अस्मितेची मुळे खोलवर रोवून असलेला, धर्माच्या तापत्या तव्यावर असलेला प्रदेश. पक्षापेक्षा जातीच्या उमेदवाराबरोबर घट्ट नातेसंबंध असलेली येथील मानसिकता. यावेळी 2014 ची हवा येथे नाही. भाजपसाठी वाट खडतर नसली तरी सरळ सुलभही नाही. काँग्रेस पक्ष येथे सक्रिय झाला असला तरी त्याच्या जागांमध्ये फार वाढ होण्याची शक्यता नाही. परंतु काही प्रमाणात तो उच्चवर्णियांची आणि मुस्लीम व मागासवर्गीयांची मते खाण्याची भीती अनुक्रमे भाजप आणि सप-बसप आघाडीला भेडसावत आहे.

समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष व राष्ट्रीय लोकदल यांनी काँग्रेस पक्षाला आपल्या आघाडीत स्थान दिले नाही. परंतु प्रियंका गांधी यांना निवडणूक प्रचारात धडाक्याने उतरवून काँग्रेसने या आघाडीला बचावाचा पवित्रा घेण्यास भाग पाडले. म्हणूनच मायावती यांनी, ‘काँग्रेसमध्ये भाजपला हरवण्याची ताकद नाही. केवळ सप, बसपला लो. दल हे गठबंधनच भाजपला पराभूत करू शकते. म्हणून याच आघाडीला मत द्या’ असे जाहीर आवाहन मुस्लीम मतदारांना केले. पण ते निवडणूक आचारसंहितेचे उल्लंंघन ठरते.

मतदानाच्या पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात दलित, मुस्लीम, जाट समुदायाचा प्रभाव असलेल्या भागात भाजपला सप, बसप, राष्ट्रीय लोकदल आघाडी विरुद्ध सामना करावा लागत आहे. येत्या 18 एप्रिल रोजी दुसर्‍या टप्प्यातील येथील लढाई ही मुख्यत्वे मोदी विरुद्ध मायावती अशी आहे. मतदान होणार्‍या आग्रा, मथुरा, फत्तेपूर सिक्री, अलिगढ, अमरोहा, बुलंद शहर व नगिना या आठही जागा 2014 मध्ये भाजपने जिंकल्या होत्या. यापैकी 6 जागांवर मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे उमेदवार लढतीत आहेत. यातील आग्रा, हाथरस, बुलंद शहर व नगिना या चार जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत.

संपूर्णत: जातीय समीकरणांवर येथील हार-जीत अवलंबून आहे. भाजपच्या उमेदवार अभिनेत्री हेमामालिनी (मथुरा) आणि काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर (फत्तेपूर सिक्री) यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णयही टाच टप्प्यात होणार आहे. मतदारसंघात आपण विकासाची कामे केल्याचा दावा हेमामालिनी यांनी वारंवार केला आहे. परंतु बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांच्याविरुद्ध प्रचार चालू आहे. हेमामालिनी (भाजप) विरुद्ध कुंवर नरेंद्रसिंह (राष्ट्रीय लोकदल) व महेश पाठक (काँग्रेस) असा मथुरेत त्रिकोणी सामना आहे. सुमारे 17 लाख 86 हजार मतदारांमध्ये जाट (3.8 लाख), मुस्लीम आहे. सुमारे 17 लाख 86 हजार मतदारांमध्ये जाट (3.8 लाख), मुस्लीम (1.7 लाख), ठाकूर/रजपूत (2.1 लाख) शिवाय मागासवर्गीय आहेत. 2014 मध्ये हेमामालिनी साडेतीन लाख मतांच्या फरकाने जिंकल्या होत्या. यावेळी ते एवढे सोपे नाही. मथुरा मतदारसंघातील 25 उमेदवारांमध्ये आणखी एक हेमामालिनीदेखील आहेत.

फत्तेपूर सिक्री मतदारसंघात 2 लाख जाट मतदार आणि 3 लाख 20 हजार ब्राह्मण मतदारांवर डोळा ठेवून अनुक्रमे राजकुमार चाहर आणि बसपने भगवान शर्मा ऊर्फ गुड्डू पंडित यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांचा सामना करताना राज बब्बर यांची प्रतिष्ठा पणाला लागली नाही तरच नवल.बुलंद शहर हा भाजपचा गड मानला जातो. 2014 मध्ये भाजपचे भोलासिंह यांनी 4 लाख अधिक मतांनी येथे निवडणूक जिंकली होती. यावेळी त्यांचा मुकाबला आहे योगेश वर्मा (बसप) आणि बंसी सिंह (काँग्रेस) यांच्याबरोबर. अमरोहा मतदारसंघातील लढत चुरशीची असेल, असे जाणकार सांगतात. भाजपने खासदार कंवर सिंह यांनाच पुन्हा तिकीट दिले आहे. कंवर हे गुज्जर समाजाचे प्रतिनिधित्व करतात. धन्नासेठही आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे निकटवर्ती व जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षातून आपल्याकडे आलेल्या दानिश अली यांना मायावती यांनी येथे तिकीट दिले आहे. तर सचिन चौधरी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. धन्नासेठ तंवर किती मागासवर्गीयांची मते आपल्याकडे वळवतात तसेच दानिश अली किती मुस्लीम मतांचे विभाजन रोखतात, यावर येथील निवडणुकीचा निकाल अवलंबून राहील.

अलाहाबाद, बनारसप्रमाणे अलिगढ हे या राज्यातील एक महत्त्वाचे आणि जुने शिक्षण केंद्र. साडेतीन लाख मुस्लीम मतदार येथे आहेत. परंतु भाजप, सप, बसप किंवा काँग्रेस यांनी कुणीही येथे मुस्लीम उमेदवार उभा केलेला नाही. ही लक्षात घेण्याजोगी बाब आहे. 2 लाख जाट मतदारांच्या भरवशावर सप-बसप आघाडीने येथे माजी जाट खासदार अजित बलियान यांना तिकीट दिले आहे. तर भाजपचे उमेदवार सतीशकुमार गौतम यांची भिस्त ब्राह्मण, ठाकूर व बनिया मतदारांवर आहे. आघाडी व काँग्रेसमध्ये मुस्लीम मतांच्या विभाजनाचा फायदा भाजपला मिळू शकतो.

उत्तर प्रदेशातील निवडणुकीचा रंग आणि ढंग नेहमी वेगळा राहिला आहे. राज्यात मुस्लिमांची लोकसंख्या 18 टक्के आहे. 80 पैकी 34 जागांवर त्यांची मते किंवा भूमिका निर्णायक ठरते. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस हे स्वत:ला मुस्लीम/अल्पसंख्याक हितैषी मानतात. प्रत्यक्षात किती मुस्लीम बांधवांना ते उमेदवारी देतात, हा मुद्दा अलाहिदा. निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने सरळ लढतीपेक्षा त्रिकोणी लढतीमध्ये मुस्लिमांच्या मतांचे विभाजन भाजपला नेहमी फायद्याचे ठरत आले आहे. 2014 च्या निवडणुकीत अल्पसंख्याकांची काही प्रमाणात मते भाजपला मिळाली. अन्य मागासवर्गीयांनीही मोदी यांच्या झोळीत मतदान केले.

परंतु 2014 पासून गेल्या पाच वर्षांत बरेच पाणी वाहून गेले आहे. पाच वर्षांपूर्वीची मोदी लाट यावेळी फार दिसत नाही. समाजवादी व बसपने सोशल इंजिनिअरिंग केले आहे, तर काँग्रेसची नजर ब्राह्मण, रजपूत-बनिया, मागासवर्गीय आणि मुस्लीम समुदायांवर आहे. निवडणुकीचे सात टप्पे पूर्ण होईपर्यंत वार्‍याची दिशा काय असेल याची उत्सुकता तर आहेच.
सुरेखा टाकसाळ

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!