उत्तराखंडमध्ये नगरचेे दोन भाविक बेपत्ता

0

भूस्खलन  शेकडो भाविक सुखरुप :  नातेवाईकांचा जीव टांगणीला

अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तराखंडमध्ये विष्णुप्रयाग गावाजवळ शुक्रवारी दरड कोसळल्याने बद्रीनाथ-केदारनाथचे यात्रेकरू अडकले आहेत. यात नगर जिल्ह्यातील शेकडो भाविकांचा समावेश आहे. बहुतांशी भाविकांशी नातेवाईक आणि प्रशासनाचा संपर्क झाला आहे. ते सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, नगरमधून खासगी वाहनाने गेलेेले दोन भाविक बेपत्ता आहेत. दुपारी दीडपर्यंत त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. दरम्यान, मागील दुर्घटनेत श्रीरामपूरमधील एकाचा मृत्यू झाला होता.

जिल्ह्यातून नेवासा तालुक्यातील शिंगणापूर येथून खासगी ट्रॅव्हलने 40, कोपरगावमधील ट्रॅव्हलने 30, नगरमधील ट्रव्हलने 110 भाविक या यात्रेला गेले आहेत. यासह नगरमधून खासगी वाहनाने 10, श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथून 8 भाविक बद्रीनाथ-केदारनाथ यात्रेला गेले आहेत. यातील बहुतांशी भाविकांशी संपर्क झाला आहे. ते शनिवारी सकाळपर्यंत सैन्याच्या बेस कॅम्पमध्ये होते. त्यानंतर ते हळूहळू पुढे सरकत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे नेते सुभाष कराळे यांचे भाऊ, भाऊजई आणि अन्य नातेवाईक असे 8 जण खासगी वाहनाने बद्रीनाथ-केदारनाथ यात्रेला गेलेे आहेत. या सर्वांचा गुरूवारपासून संपर्क नसल्याचे कराळे यांनी नगर टाईम्सशी बोलतांना सांगितले. मात्र, शनिवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांचा संपर्क झाला असल्याचे त्यांनी कळविले. यासह नगरमधील दोन महिलांचा संपर्क होत नसल्याचे आपत्ती कक्षाने सांगितले.

जिल्ह्यातून ट्रॅव्हलने गेलेल्या 120 भाविकांशी संपर्क झाला आहे. अन्य भाविकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. काही भाविक सैन्याच्या बेस कॅम्पमध्ये सुरक्षित आहेत.
– अभय महाजन, जिल्हाधिकारी

 

LEAVE A REPLY

*