Type to search

अग्रलेख संपादकीय

उत्तम संसदपटूचा अस्त!

Share

देशाच्या लोकशाहीवर आघात वाढत आहेत. राजकीय साठमारीत जाणकारांची आणि वैचारिक परिपक्व संसदपटूंची उणीव जाणवत आहे. दूरदृष्टीच्या सुसंस्कृत आणि समंजस नेत्यांची गरज भासत आहे. अशावेळी देशाने एक खंबीर आणि सुजाण नेतृत्व गमावले आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी परवा अखेरचा श्‍वास घेऊन जगाचा निरोप घेतला. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज अलीकडेच गेल्या.

आता जेटली यांच्या जाण्याने आणखी एक कर्तबगार नेता आणि उत्तम संसदपटूला देश मुकला आहे. प्रकृती खालावल्याने जेटलींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. त्यांना प्राणरक्षक प्रणालीवरही ठेवले गेले, पण वैद्यकीय तज्ञांचे प्रयत्न जेटलींना वाचवू शकले नाहीत. ‘नेता कसा असावा?’ या प्रश्‍नाच्या उत्तरादाखल जेटली यांचे नाव त्यांना जाणणारे लोक नक्कीच घेतील. भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलणारे आणि अर्थव्यवस्थेला गती देणारे, नोटबंदी-जीएसटीसारखे महत्त्वपूर्ण निर्णय जेटली अर्थमंत्री असताना पंतप्रधान घेऊ शकले. मुख्य अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पाचा विलय आणि अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला संसदेत मांडण्याची प्रथा त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झाली.

कायदेतज्ञ, अभ्यासू, दिलदार, मनमिळावू, राजकारणात असूनही द्वेषाला थारा न देता मित्र जोडणारा जेटलींसारखा गुणग्राही आणि सुस्वभावी नेता विरळाच! सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते. सर्वोच्च न्यायालयातील नावाजलेल्या वकिलांत जेटलींचे नाव अग्रक्रमावर होते. वैद्यकीय क्रांतीच्या आजच्या युगात सहासष्ट वय तसे फार नाही. जेटलींसारख्या नेत्यासाठी तर मुळीच नाही, पण दोन-तीन शस्त्रक्रिया झेलणार्‍या जेटली यांच्या शरीराने त्यांना साथ दिली नाही. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मजबूत जनादेशासह भाजप पुन्हा सत्तारूढ झाला.

त्या यशात जेटलींचे बहुमोल योगदान होते. मात्र प्रकृती साथ देत नसल्याने सत्तेचा मोह त्यांनी टाळला. मंत्रिमंडळात मानाचे पान निश्‍चित असताना त्यांनी नम्रपणे मंत्रिपद नाकारले होते. सत्ता आणि पदे मिळवण्याच्या स्पर्धेत चालून येणारे मंत्रिपद नाकारण्यासाठी मोठे मनोबल लागते. राजकारणात थांबायचे कोठे ते अनेक बुजुर्ग ढुड्डाचार्यांनासुद्धा कळत नाही. फार थोडे जण ते धारिष्ट्य दाखवू शकतात, जेटली त्यापैकीच एक! जेटलींचे देहावसान ही केवळ एका पक्षाची नव्हे तर देशाची हानी आहे. भारतीय समाजमनावर अमिट छाप उमटवणार्‍या जेटलींना ‘देशदूत’ची श्रद्धांजली!

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!