उतार वयाच्या जखमा

0

तुम्ही सोडून निघून गेलात म्हणून आम्ही खचून जाऊ असे होणार नाही. जीवनात तुमच्यासाठी आम्ही काय कष्ट केलेत, किती संकट पाहिलेत याचा अनुभव आहे आमच्याकडे आजही. उतार वयाच दुख: एकच, ज्यांना आम्ही आमचे समजून समाजात वावरायचो, आनंदाने बहरायचो त्यांनीच दिलेल्या जखमा भरून निघणार्‍या नाहीत. समाजाशी भांडायला निधड्या छातीने उभे राहिलो, पण घरातून पाठीवर झालेला हल्ला निश्वास करणारा होता.

जेव्हा अनुभव माणसाला शहाणा करतो तेव्हा त्याला जाग येते. कुणी कुणाचे नाही, मी कुणाचा नाही हे कळले मला. जेव्हा माणसाला माणसाची गरज असते तेव्हा त्याला त्याची किमंत कळते, काम संपले की मी कोण आणि तुम्ही कोण. आई वडील म्हणून मुलांची सर्व कर्तव्य पार पाडली. मात्र जेव्हा आम्ही थकलो नेमके तेव्हाच आमच म्हातारपण त्यांना दुखापत वाटू लागली. ज्या मुलांना आम्ही जन्म दिला अंगा खांद्यावर खेळविले, नको नको ते लाड पुरविले, शिकवून नोकरीला लावले, विवाह लावून दिलेत त्यांनाच आज आम्ही नकोसे वाटतोय.

उतार वयात शरीरही थकते आणि नशिबही भामटे, साथ देत नाही. माझ्या आयुष्यातील जिवंत आणि मी अनुभवलेली अशीच एक घटना मला याठिकाणी व्यक्त करायला आवडेल. जीवनात अनेक दुःखाचे प्रसंग येतात परंतु त्यावेळी माणसाचे मनोबल आणि शारीरिक सक्षमता त्याच्या जवळ भक्कम असते. उतार वयात शरीर थकलेले, कितीही हिंमत जुळवून धेर्याने लढ म्हटले तरी पराजयाच्या पत्रावड्या नशिबी येतात. दोन वर्ष झालेत या प्रसंगाला, एका वृद्धाश्रमात मित्रासोबत भेट द्यायला गेलो होतो. वृद्धाश्रम म्हणजे म्हातारपणी कपाळी लागलेला कलंक असे माझे नव्हे तर तेथील एका गृहस्थाचे मत आहे. संपूर्ण वृद्धाश्रमात फिरून आल्यावर मनाला फार दुख: झाले.

असे कसे असू शकतात मुले जे आपल्याच आई वडिलांना वृद्धाश्रमात पोहचवून देतात. त्या क्षणाला हा विचार मला विचलित करणारा होता. खंत वाटते त्या मुलांची ज्यांच्यासाठी आई वडिलांनी आयुष्यभर मरमर केली. विदेशी संकृतीचे वारे भारतीयांना स्पर्श करून गेलेत की यांची संकृती नीतिमूल्ये डोक्यातून उडून जातात. म्हातारपणी थकलेल्या शरीराला सांभाळणे म्हणजे तळहातावरच्या फोळाचे संगोपन करणे असे नाही. त्यांना त्यावेळी फक्त प्रेम हवे, गप्पा करणारी नातवंडे जवळ हवीत, सम वयातील मंडळी विचार विनिमय करण्यासाठी सायंकाळी भेटावीत एवढ्याच त्यांच्या सामान्य गरजा असतात.

तुमच्या व्यक्तिगत जीवनात त्यांचा हस्तक्षेप फार कमी असतो. त्यामुळे आजच्या या सुशिक्षित मुला मुलीना जर आपल्याच आई वडिलांना वागवता येत नसेल तर माणूस म्हणून तुम्ही भिकारडे आहात. त्यादिवशी वृद्धाश्रमात ज्या आजोबांसोबत भेट झाली ज्या गप्पा झाल्यात त्यातून जे अनुभव ऐकलेत ते अंगावर रोमांच उभे करणारे होते. ज्या वडिलांनी मुलांसाठी लाखोची संपत्ती उभी केली त्याच वडिलांना दाराशी सुद्धा उभी न करणारी ही मुलं किती निर्लज्ज आणि नालायक असावीत. गृहस्थाच्या नावाचा उल्लेख करणे मला योग्य वाटत नाही त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख मी करीत नाही. दोन विवाहित मुले त्या गृहस्थाला होती, दोघही उच्चशिक्षित चांगल्या पदावर नोकरी करणारे, दोघांच्याही पत्नी अर्धवेळ नोकरी करणा-या तरी देखील त्यांना त्यांचा बाप परवडत नव्हता.

घरात दोघही मुलांना दोन दोन चिमुकली गोंडस मुले होती. त्यांना स्पर्श करण्याची सुद्धा ताकीद देणार्‍या सुना होत्या आणि ज्या घरात पंखा नाही, पाणी नाही, लाईट फक्त रात्रीच सुरु व्हायची दिवसातून एक कळशीभर पाणी मिळायचे अशा भरगोस सोई सुविधा मला मिळायच्या. बायको लवकर सोडून गेली याच फार दुख: मला त्यावेळी वाटायचे, परंतु आज मनाला बर वाटतेय की या दुखः पेक्षा मरण आलेलं कधीही परवडणारे आहे. रोज मरून मिटून जगण्याला काय अर्थ आहे. माझी नातवंड माझ्या समोर खेळायची परंतु माझी हिम्मत होत नव्हती त्यांना स्पर्श करायची, प्रेमाने खेळवायची, मुका घ्यायची. मन घट्ट करून राहणे किती त्रासदायक असते हे मला माझ्या मुलांनी शिकविले.

आम्ही मुलांवर प्रेम केले आणि मुलांनी पैशांवर, एवढाच फरक आहे. मुलांनी ठरवलेल्या वेळेवर जेवण करायचं हा नियम लागू झाला होता. दुखलं खुपल तर त्याच्यावर उपचार म्हणजे सूनेच टोचून केलेलं भाषण. एवढा अन्याय सहन करणारा लाचार बाप कितीकाळ यांच्या तुकड्यांवर जगणार हा विचार मला माझ्या सारख्याच लाचार मित्राने करायला लावला. त्यावेळी त्याने मला वृद्धाश्रमात येण्याचे सांगितले. पण जीवनातला मोह आणि नात्यातले फास काही तुटत नाही हे खरेच आहे. शेवटी कंठी आलेला अन्यान असह्य झाला आणि न सांगताच घरातून पळ काढला.

वृद्धाश्रमात मला पुन्हा स्वातंत्र्य मिळाले होते जगण्याचे. परंतु पोटच्या पोरांनी बाप कुठे गेला याचा तपासही केला नाही. पोरांना संस्कार देण्यात कुठे चूक झाली हे आजही मला कळत नाही. एक बाप म्हणून तुम्हीही जगत असाल तर मुलांसाठी तुमचे कर्तव्य पूर्ण कराच मात्र तुमच्यासाठी शेवटी खर्चा पोटी थोडासा पैसा साठविणे विसरू नका. नाहीतर अनेक वृद्धाश्रमात लाचार आई वडील डोळे मिटतील.
(लेखक- रायसोनी इन्स्टिट्यूटचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)
मो. 7798802275
अमोल बाविस्कर

LEAVE A REPLY

*