‘उजव्या’चे आवर्तन थांबल्यानंतरच ‘मुळा’वर वीज निर्मिती!

0

राहुरी (प्रतिनिधी)- मुळा धरणातून सोडण्यात आलेले उजव्या कालव्याचे आवर्तन थांबल्यानंतरच आता वीज निर्मितीचा मार्ग मोकळा होणार आहे. वीज निर्मिती यशस्वी झाल्यानंतर मुळा धरणासह परिसरातील लाभार्थी गावांना चांगल्या प्रकारे वीज पुरवठा होणार असून ही गावे आता धरणासह स्वयंप्रकाशमान होणार आहेत. धरणाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या वीज निर्मिती केंद्राची चाचणी अयशस्वी झाल्याने वीज निर्मिती केंद्राचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आवर्तन थांबण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

 
मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या तोंडाशी प्रचंड वेगाने पडणार्‍या पाण्यावर वीज निर्मिती करण्याचा निर्णय आघाडी शासनाने 5 वर्षांपूर्वी घेतला होता. त्यानंतर सन 2013 साली पुणे येथील एका ठेकेदार कंपनीने वीज निर्मिती करण्याचा ठेका शासनाकडून घेतला. 4 मे. वॅट वीज निर्मिती करण्यासाठी गेल्या 4 वर्षांपासून ठेकेदार कंपनीकडून युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले होते. धरणावर ‘सि-प्लेन’ सेवा बारगळल्यानंतर वीज निर्मिती प्रकल्प यशस्वी होणार की नाही? याबाबत संभ्रम होता. मात्र काही महिनाभरापूर्वीच ठेकेदार कंपनीने वीज निर्मिती प्रकल्पाचे काम पूर्ण केल्याचा अहवाल वरिष्ठांना दिला. वीज निर्मिती प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून उजवा कालव्यातून पडणार्‍या पाण्याच्या वेगात वीज निर्मिती करण्याचा निर्णय कंपनीने पाटबंधारे विभागाला सांगीतला. ठेकेदार कंपनीच्या सूचनेनुसार उजवा कालवा सोडण्यापूर्वी वीज निर्मितीसाठी अगोदर पाणी सोडण्यात आले.

 

मात्र, वीज निर्मिती प्रकल्पासाठी महत्वाचे असणारे लोखंडी प्लेट सरकत नसल्याने वीजप्रवाह न होता पाणी जमा होऊ लागल्याने अखेर वीज निर्मिती प्रकल्पाची चाचणी अयशस्वी ठरल्याची माहिती सांगण्यात आली.

 
याबाबत मुळा पाटबंधारे विभागाचे शाखाभियंता शामराव बुधवंत यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे मालक व अभियंत्यांनी विशेष योगदान देत मुळा धरणाच्या पायथ्याशी वीज निर्मिती केंद्र उभारले आहे. वीज निर्मिती प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून किरकोळ प्रमाणात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी साधारणतः महिनाभराचा कालावधी लागणार आहे. उजव्या कालव्यातून सोडण्यात आलेले आवर्तन थांबताच वीज निर्मिती प्रकल्पाला निर्माण झालेली तांत्रिक अडचण सोडवत वीज निर्मिती होऊन मुळा धरणासह लगतच्या गावांना त्याचा लाभ होणार असल्याचे बुधवंत यांनी सांगितले.

 
मुळा धरणामध्ये यंदा बर्‍यापैकी पाणीसाठा उपलब्ध असल्याने वीज निर्मिती करण्यासाठी पाण्याचा वापर करणे सोयीचे ठरणार असल्याने कंपनी वीज निर्मितीसाठी उत्सूक होती. मात्र, चाचणी अयशस्वी राहिल्याने साधारण महिनाभराच्या कालावधीनंतर वीज निर्मिती करण्यास प्रारंभ होईल, अशी अपेक्षा कंपनीच्या अभियंत्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मुळा धरणातून उजवा कालवा 1652 क्यूसेक प्रवाहाने वाहत असून डावा कालवा 300 क्यूसेक प्रवाहाने शेतकर्‍यांना पाणी दिले जात आहे. सध्या धरणात 8 हजार 470 दलघफू पाणी साठा शिल्लक राहिला असून दोन्ही कालव्यातून पाणी सोडले जात असताना जिवंत साठा 3970 दलघफू इतका राहिलेला आहे. यामुळे धरणसाठ्यात घट होत आहे.

 
उजव्या कालव्यावर 33 के.व्ही. क्षमतेचे उभारण्यात आलेल्या वीज उपकेंद्रातून वीज निर्मिती होण्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था पूर्ण झाली असून उजवा कालव्याचे आवर्तन बंद होताच पुन्हा वीज निर्मितीची चाचणी केली जाणार आहे. या चाचणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

 उजव्या कालव्यावरील पाण्याच्या प्रवाहाने वीज निर्मिती झाल्यानंतर 4 मे. वॅट वीज धरणासह कुशीत असलेल्या बारागाव नांदूर वीज उपकेंद्राला वीज पुरवठा केला जाणार आहे. वीज निर्मितीची जोडणी नांदूर सबस्टेशनला पूर्ण झालेली आहे. 30 वर्षाच्या कालावधीपर्यंत ही कंपनी वीज विक्री करणार आहे. तर 30 वर्षानंतर वीज निर्मिती प्रकल्प शासनाच्या नावे होऊन त्याचा लाभ महावितरण विभागाला होणार आहे.

LEAVE A REPLY

*