उकांडा..श्‍वास कोंडला कोंडला…!

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या अंगणातील उकांड्याच्या दुर्गंधीमुळे गुदमरत असलेला श्‍वास मोकळा करण्यासाठी शालेय विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले. शालेय विद्यार्थी व शहर सुधार संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी माळीवाड्यात रास्तारोको आंदोलन केले. पंधरा दिवसांत कचरा संकलन केंद्र दुसरीकडे हलविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

माळीवाड्यातील महापालिकेच्या मोटार गॅरेज येथे कचरा संकलन केंद्र आहे. शहरात जमा झालेला कचरा या केंद्रातून बुरूडगाव कचरा डेपोकडे पाठविला जातो. एका वाहनातून दुसर्‍या वाहनात कचरा टाकताना तो खाली सांडतो. तसेच दिवसभर हे काम सुरू असल्याने त्याची दुर्गंधी सुटते. शेजारीच भाऊसाहेब फिरोदिया आणि सविता फिरोदिया माध्यमिक शाळा आहे. महापालिकेचे प्रभाग कार्यालयात ये-जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने तिकडे जाणार्‍या नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. हे कचरा संकलन केंद्र दुसरीकडे हलविण्यात यावे यासाठी चार महिन्यापूर्वी महापालिकेला पत्र देण्यात आले आहे. महापालिकेने शिवाजीनगर परिसरात कचरा संकलन केंद्रासाठी जागाही शोधली, मात्र तेथेही त्याला विरोध झाला. त्यामुळे येथेच कचरा संकलन केंद्र सुरू आहे. कचर्‍याच्या दुर्गंधीने हैराण झालेली शाळेतील मुलेच आज रस्त्यावर उतरली. त्यांच्या मदतीला मग शहर सुधार समितीचे पदाधिकारी उबेद शेख, शाकीर शेख, संजय झिंजे हेही धावले. आंदोलन सुरू असल्याचे समजताच महापालिकेचे आरोग्य अधिकारी बोरगे तिकडे गेले. त्यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत निवेदन स्वीकारले. पंधरा दिवसांत कचरा संकलन केंद्र अन्यत्र हलविण्याचे आश्‍वासन त्यांनी आंदोलक मुलांना दिले. पंधरा दिवसांत कचरा संकलन केंद्र दुसरीकडे न हलविल्यास आयुक्तांच्या दालनात कचरा टाकून दिल्लीगेट येथे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

नगर शहरात कुठलीही गोष्ट महापालिका स्वत:च्या मनाने करत नाही. प्रत्येक चांगली गोष्ट करण्यासाठी नागरिकांवर आंदोलन करण्याची वेळ येते. चांगले काम करण्यासाठी आंदोलनाची वेळ आज शालेय विद्यार्थ्यांवरही ओढावली.

LEAVE A REPLY

*