Type to search

अग्रलेख संपादकीय

उंटावरुन शेळ्या हाकल्यामुळेच…

Share

‘ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देणे योग्यच आहे. तथापि विकासाची धोरणे राजधानीत ठरतात. त्यासाठी तंत्रज्ञान आयात केले जाते. ते तंत्रज्ञान आपल्या परिस्थितीशी जुळणारे आहे की नाही याचा विचार केला जात नाही. त्यामुळे नंतर ते अयशस्वी ठरते. त्यामुळे काही वर्षांनी पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करावा लागतो.

आपल्या देशात सातत्याने हे असेच सुरू आहे. तंत्रज्ञान कितीही अद्ययावत असले तरी ते परिस्थितीशी अनुकूल ठरतेच असे नाही. ग्रामीण विकासाचे धोरण राबवताना तेथील ज्ञान, त्या ज्ञानावर आधारित संस्था आणि तेथील तंत्रज्ञानाचा विचार व वापर केला गेला तरच ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधता येईल’ असे परखड मत प्रसिद्ध अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले आहे. निवृत्तीनंतर ग्रामीण भागाचा विकास हेच ध्येय स्वीकारले आहे. याच विचाराने पंढरपूर व गडचिरोली येथे प्रकल्प सुरू केल्याचे काकोडकर यांनी सांगितले.

काकोडकर हे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आहेत. ‘थोरियम’ या इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ते ओळखले जातात. शांततापूर्ण अणुचाचण्यांचे तेही एक शिल्पकार होते. या क्षेत्रातील त्यांचा अधिकार मोठा आहे. विकासाच्या धोरणांमधील विसंगती हे जुनाट दुखणे आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील परिस्थिती वेगळी असते. पंचक्रोशीतील गावांमध्येही सारखेपणा नसतो. गावागणिक भौगोलिक आणि सामाजिक वातावरण बदलते. हे लक्षात न घेता दिल्लीतील वातानुकूलित दालनात बसून कधीही न पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या ग्रामीण भागाच्या विकासाची धोरणे व योजना ठरतात. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

हा दुष्काळाचा तत्कालिक परिणाम नाही. पाण्याची अनुपलब्धता ग्रामीण भागातील अनेक गावांच्या आणि पाड्यांच्या पाचवीला पुजलेली आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील बहुतांश महिलांचे आयुष्य पाणी भरण्यातच व्यतित होते. अनेक गावे पाण्यासाठी फक्त टँकरवर अवलंबून आहेत. ‘घरोघरी शौचालये’ ही योजना जाहीर करताना या परिस्थितीचा विचार झाला का? शहरी भागामधील झोपडपट्ट्यांमध्ये ही योजना राबवताना पाण्याच्या नियोजनाचा काय विचार केला गेला? शैक्षणिक धोरणे आखताना ग्रामीण भागातील बोलीभाषांचा, भौगोलिक रचनांचा आणि परिसर इतिहासाचा विचार खरेच होत असेल का? विकासाच्या धोरणांतील विसंगतीची ही वानगीदाखलची उदाहरणे आहेत.

अशा अनेक योजना अयशस्वी का होतात याचे नेमके कारण काकोडकर यांनी सांगितले आहे. असा कोणताही साधकबाधक विचार न करता आखलेली धोरणे अयशस्वी होत असतील तर यात नवल ते काय? पण उंटावरून शेळ्या हाकणार्‍यांना हे कसे कळावे? अशा ‘उंटावरच्या अनेक शहाण्यांचे कान सोनारानेच टोचले’ हे बरेच झाले, पण ते कानच बहिरे असतील तर सोनार कितीही कुशल असला तरी बहिरेपण कसे दूर होणार?

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!