इव्हीएम घोटाळ्याप्रकरणी सत्यता तपासू – जिल्हाधिकारी

0

नाशिक  : इव्हीएम अर्थात मतदान यंत्रांविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारींची तपासणी केली जाईल. त्यानंतरच आयोगाकडे पाठवायचे की नाही याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले.

नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या इव्हीएममध्ये दोष आहेत. त्यात काहीतरी सेटिंग केल्याचा आरोप राज्यभर केला जात आहे. नाशिकमध्येही काही संघटनांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. त्यात काही प्रभागात नगरसेवकांना त्यांचे स्वत:चे मतही मिळाले नाही.

असे कसे होऊ शकते, असा प्रश्न विविध संघटनांनी उपस्थित केला. शहरातून बुधवारी इव्हीएमची अंत्ययात्राही काढण्यात आली. यात्रेतून त्यांनी सत्ताधार्‍यांवरच आरोप करत सत्ताधार्‍यांनीच यात काहीतरी गडबड केल्याने इतर पक्षांच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करत या यंत्रांच्या चौकशीची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी तक्रार प्राप्त झाली आहे. तीची तपासणी केली जाईल.

त्यातील सत्यता आणि शक्यताही तपासली जाईल. स्थानिक स्तरावरच त्यावर निर्णय देणे किंवा ती सोडवणे शक्य असल्यास संबंधितांना तसे कळवले जाईल. परंतु त्यात तथ्य आढळल्यास आयोगाकडे पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

त्यामुळे आता इव्हीएम घोटाळ्याच्या होत असलेल्या आरोपाला काही प्रमाणात प्रशासनाने गंभीरतेने घेतल्याचेही दिसून येत आहे. मात्र जोपर्यंत त्यातील तांत्रिक बाबी तपासल्या जाणार नाहीत तोपर्यंत यातून कुठलीही बाब समोर येणार नसल्याचेही स्पष्ट झाल्याने अजून काही दिवस तक्रारदारांना दम धरावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

*