इम्रान खानची अनपेक्षित गुगली?

0
पाकिस्तानसह काही देशांमध्ये भारताविरोधी कट-कारस्थाने रचली जातात, अशी शंका आपल्या पंतप्रधानांनी बर्‍याच वेळा व्यक्त केली आहे. जागतिक व्यासपीठावरून बोलतानाही यासंदर्भातील आपले विचार ते स्पष्टपणे मांडतात. पाकिस्तानविरोधी भूमिका मांडताना ते कधीच मुलाहिजा ठेवत नाहीत.

विरोधी पक्षांना त्यांचे म्हणणे कधी-कधी अतिरंजित तर्कट वाटत असेल. पंतप्रधान अकारण गहजब माजवतात, असा आक्षेपही विरोधक घेतात. प्रभावी वक्तृत्वाचे देणे लाभलेल्या पंतप्रधानांची विधाने सर्वस्वी चूक ठरवणे कुणालाच जमत नाही. तथापि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी परवा जाहीरपणे केलेल्या विधानामुळे पंतप्रधानांच्या निराधार वाटणार्‍या तर्काला पुष्टी मिळाली आहे. भारतात निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच अनपेक्षितपणे व अकारण ही प्रतिक्रिया व्यक्त का झाली असावी? भाजप आणि पंतप्रधान पुन्हा सत्तेत आले तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांततेची आणि काश्मीर मुद्यावर चर्चा होणे शक्य आहे, असे त्यांनी का म्हणावे?

आजवर त्या दिशेने झालेल्या कोणत्याही प्रयत्नाला पाकिस्तानकडून पुरेसा प्रतिसाद मिळाल्याचा इतिहास नाही. ‘काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास विरोधकांकडून टीका होईल या भीतीने शांततेची चर्चा होणार नाही’ असे आगाऊ मत इम्रान खान यांनी का व्यक्त केले असावे? याआधी असे कधीही घडले नव्हते. केवळ भारतच नव्हे तर कोणत्याही देशातील निवडणुकांविषयी दुसर्‍या देशाच्या प्रमुखांनी अशा प्रकारची विधाने निवडणूक काळात व्यक्त केल्याचे ऐकिवात नाही.

यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खान यांच्या या वक्तव्यामागे अमेरिका वा चीनचा हात असू शसेल का? याची दखल पंतप्रधानांना गांभीर्याने घ्यावी लागेल. कारण ‘भाई-भाई’ म्हणत शेजारी देशाच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. शांततेची चर्चा सुरू असतानाच पाकने दहशतवादी हल्ले केल्याचा कटू अनुभव भारताने घेतला आहे. इम्रान यांचे विधान कदाचित एरव्ही एका खेळाडूचे निरागस विधान मानता आले असते;

पण ज्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे त्यामुळे पंतप्रधान मोदींची कोंडी करण्याची आयती संधी त्यांनी विरोधकांना उपलब्ध करून दिली आहे. मोदीजींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नेतृत्वाची चमक सिद्ध केली आहे. त्यामुळे देशात सध्या तरी अजोड नेतृत्व म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. इतकेच नव्हे तर उदार परराष्ट्र धोरणामुळे जागतिक राजकारणात त्यांच्या नावाचा दबदबा आहे. कदाचित त्याला अनुलक्षूनच पाक पंतप्रधानांनी काहीशा धूर्तपणे ही खेळी खेळली असेल का? केवळ निरागस विधान म्हणून खान यांच्या विधानाची संभावना करून चालणार नाही एवढे खरे!

LEAVE A REPLY

*