इंडोनेशियन बॅडमिंटन सुपर सिरीज : प्रणय, श्रीकांत उपांत्य फेरीत

0

भारताचा बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणय याने इंडोनेशियन बॅडमिंटन सुपर सिरीजमध्ये रियो आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चेन लोंग याला पराभूत करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

तर किदाम्बी श्रीकांत याने तैवानच्या जु वेई वांग याच्यावर सरळ गेममध्ये विजय मिळवत अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे.

एक तास १५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणय याने २१-१८,१६-२१,२१-१९ असा विजय मिळवला. २५ वे रँकिंग असलेल्या प्रणय याने पात्रता फेरीतून स्पर्धेत प्रवेश नक्की केला आहे.

त्याला चेन लोंग याच्यासोबत याआधी झालेल्या तिन्ही लढतीत पराभव स्वीकारावा लागला होता. आज त्याने लोंग विरुद्धचा पहिला विजय नोंदवला. तसेच या सुपर सिरीजच्या उपांत्य फेरीत पहिल्यांदा प्रवेश केला आहे.

भारताच्याच किदाम्बी श्रीकांत याने तैवानच्या जु वेई वांग याला २१-१५, २१-१४ असे पराभूत करत अंतिम चारमध्ये जागा निश्चित केली.

प्रणयची पुढची लढत जपानचा काजुमासा सकाई आणि इंग्लंडचा राजीव ओसफ यांच्यातील विजेत्यासोबत होईल. तर श्रीकांतचा उपांत्य फेरीतील सामना कोरियाच्या दुसऱ्या मानांकित साने वान याच्याशी होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*