इंग्रजी पेपरला 11 कॉपीबहाद्दर जाळ्यात ;नाशिक जिल्ह्यातील 86 केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात परीक्षा सुरळीत

0

नाशिक : नाशिक विभागात बारावी परीक्षेच्या सुरुवातीच्या इंग्रजीच्या पेपरला एकूण 11 कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले. यंदा सूचनांचे काटेकोरपणे पालन आणि उत्तम नियोजनामुळे कॉपी करणार्‍यांची संख्या घटल्याचे दिलासादायक चित्र आहे.
संपूर्ण राज्यासह नाशिक विभागात बारावी परीक्षेची सुरुवात झाली. मंगळवारी इंग्रजीचा पहिला पेपर होता. यात नाशिक विभागातून 11 जणांवर कॉपी केसेसची कारवाई करण्यात आली.

त्यात नाशिक जिल्ह्यात सिन्नरमध्ये महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालयात दोन जणांवर तर जळगाव जिल्ह्यात नूतन मराठा उच्च माध्यमिक विद्यालयात 2 याशिवाय धुळे जिल्ह्यात आर्वी केंद्रावर 2 तर नेर येथील केंद्रात 4 तर नंदुरबार जिल्ह्यात 1 कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती विभागीय सचीव कार्यालयाकडून देण्यात आली.
यंदा सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

परीक्षेच्या 200 मीटर परिसरात कोणलाही परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे कॉपी करण्याचे प्रमाण घटले. दरवर्षी बारावी परिक्षेच्या सुरुवातीलाच गोंधळ, कॉपी ठरलेली असते. परंतु यंदा परीक्षा मंडळाने सुरक्षा व्यवस्था कठोर केल्याने समस्या उद्भवल्या नाहीत. उपद्रवी केंद्रांनाही आधीच सूचना दिल्याने त्या ठिकाणीही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या पेपरलाच बहुतेकदा गोंधळ होतो शिवाय याच पेपरला कॉपीबहाद्दरही जास्त सापडतात. त्यामुळे इंग्रजीच्या पेपरविषयी मंडळाला चिंता होती.

परंतु यंदा 200 मीटर परिसरात सर्वांनाच मज्जाव करण्यात आला. माध्यमांनाही प्रवेश देण्यात आला नाही. शिवाय कनिष्ठ महाविद्यालय संघटनेच्या बैैठकीत आधीच आगाऊ सूचना दिल्याने त्याचा लाभ या परीक्षेत झाला त्यामुळे केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील 86 केंद्रांवर 74 हजार 719 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा सुरळीत दिली. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात महामंडळाने 86 केंद्र संचालकांची नियुक्ती केेली होती. शिवाय 26 परीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय परीक्षा केंद्रावर चित्रीकरण बरोबरच पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आल्याने त्याचाही लाभ झाला. सामाजिक संघटना, राजकीय संघटना यांच्याकडून विद्यार्थ्यांना 200 मीटरच्या बाहेर शुभेच्छा देण्याबाबत स्पष्ट सूचना मंडळाकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदा खर्‍या अर्थाने मंडळाचा कारभार पारदर्शक दिसला. सकाळी 11 वाजता पेपर असला तरी 10 वाजल्यापासूनच केंद्रावर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. बहुतेक विद्यार्थ्यांबरोबर पालकही आल्याने महाविद्यालय परिसरात गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. दुपारी 2 पर्यंत हे चित्र कायम असल्याचे दिसले.

LEAVE A REPLY

*