आ. जगताप यांचे आजपासून उपोषण

0

3 मेपर्यंत पाणी न मिळाल्यास सामूहिक आत्मदहन

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – कुकडी कालव्याचे आवर्तन सुटले असून या आवर्तनातून तालुक्यातील पाण्याचे सर्व 64 उद्भव भरून द्यावेत, फळबागांसाठी वाढीव एक टीएमसी पाणी द्यावे या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 आणि 2 मे रोजी उपोषण करणार असून या उपोषणानंतरही शेतीच्या आवर्तनाबाबतचा प्रस्ताव मंगळवार 3 मे पर्यंत सादर करून फळबागा आणि शेतीला पाणी देण्याचा निर्णय झाला नाही तर सामूहिकपणे आत्मदहन करू असा इशारा आ. राहुल जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कुकडी कालव्यातील आंदोलनात आ. जगताप आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन मोडीत काढल्यानंतर आंदोलनाची पुढील रणनीती आखली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ. राहुल जगताप बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, प्रा. तुकाराम दरेकर, नगरसेवक अख्तर शेख, फक्कडराव मोटे, दादा औटी, स्मितल वाबळे, वसीम शेख, सागर बोरुडे आदी उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले, पिण्यासह कुकडीचे पाणी शेतीला आणि फळबागांना देण्याची मागणी कायम असून यासाठी सुरू केलेले आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी सोमवार 1 मे रोजी (महाराष्ट्र दिनी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरुवात करण्यात येणार आहे. 3 मे पर्यंत शेतीला आवर्तन देण्याच्या निर्णयाची वाट पाहणार असून शेती आणि फळबागांना पाणी देण्याचा निर्णय झाला नाही तर, आत्मदहन करण्यात येणार आहे. सध्याच्या आवर्तनात एक ते दीड टीएमसी वाढीव पाणी कालव्यातून काढून पाण्याचे केवळ 11 च उद्भव भरून न देता तालुक्यातील पाण्याचे सर्व 64 उद्भव भरून द्यावेत. फळबागा आणि शेतीला पाणी द्यावे याबाबतचा प्रस्ताव सादर करुन निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा आ. जगताप यांनी दिला आहे.
आंदोलनाचा फार्स ः लगड
स्वतःचे कार्यकर्ते अंगावर आल्यामुळे आमदारांनी अटकेचा बनाव करून स्वतःची सुटका करून घेतली. आंदोलनाचा फार्स करून शेतकर्‍यांचे वाटोळे करण्याचा ठेकाच लोकप्रतिनिधीने घेतला असल्याचा आरोप पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड यांनी केली.
लोकप्रतिनिधीने आंदोलन केल्यामुळे फक्त विसापूरला पाणी भेटले. ते फक्त विसापूर मर्यादित लोकप्रतिनिधी आहेत काय? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. जर त्यांना आंदोलन करायचे होते, तर श्रीगोंदा व कर्जत तालुक्यांच्या हद्दीवर असणार्‍या मुख्यवितरिका क्र. 14 मध्ये उतरून करायला हवे होते. म्हणजे तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांना फायदा झाला असता. मात्र लोकप्रतिनिधी फक्त पिंपळगाव पिसाचा विचार करतात व आमचे वाटोळे करतात. त्यामळे या आंदोलनात त्यांचेच काही कार्यकर्ते आक्रमक होऊन अंगावर येऊ लागले होते, त्यामुळेच त्यांनी पोलीस प्रशासनाला अटक करण्यास सांगितले व स्वत:ची सुटका करून घेतली, असे लगड यांनी स्पष्ट केले.

घोड चे पाणी कोणी पळविले ः नागवडे
घोडचे पाणी कर्जत तालुक्यातील खड्डे भरण्यासाठी तीन दिवस कोणी नेले. याचा जाब आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या नेत्यांना विचारणार आहात का? कुकडीतील 28 टीएमसी पैकी डाव्या कालव्याद्वारे किती पाणी येते व उजव्या कालव्याला किती जाते, कुकडी आठमाही असून आवर्तन कसे घेतात याबाबत पुणे जिल्ह्याच्या तुमच्याच एका बड्या नेत्याच्या वतीने कोर्टात याचिका चालू आहे. याचा जाब नेत्यांना विचारणार का? फक्त तालुक्यात आंदोलनाचा फार्स करून भुई धोपटण्याचा कार्यक्रम करणार आहात का? असा सवाल भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

*