आ. खडसेंना पुन्हा वगळले

0
जळगाव । दि. 12 । प्रतिनिधी-भाजपाच्या कर्जमाफीच्या जाहीरातीतून पुन्हा एकदा माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांना वगळल्याने जिल्हा भाजपातील गटबाजी उघडकीस आली आहे.
कर्जमाफीबद्दल राज्य सरकारचे आभार मानणारी जाहीरात आज जिल्हा भाजपाकडून प्रसिध्द करण्यात आली. या जाहीरातीत मात्र माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांना डावलल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
जळगाव जिल्ह्यात भाजपा पक्ष रूजविण्यात आ. एकनाथराव खडसे यांचा सिंहाचा वाटा राहीला आहे. भल्यभल्यांना त्यांनी अंगावर घेऊन भाजपाची वाट नेहमीच सुकर करून दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात कधी नव्हे ती शत प्रतिशत सत्ता स्थापन करण्यात खडसेंनाच श्रेय जाते. जिल्हा बँक, जिल्हा दुध संघ, नगरपालिका, जिल्हा परीषद याठिकाणी सत्ता आणण्यामध्ये आ. खडसेंचा मोलाचा वाटा राहीला आहे.

विविध आरोपांवरून राजकीय बळी ठरलेल्या माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचे जिल्ह्यातील स्थान डळमळीत करण्याचाही प्रयत्न खुद्द जिल्हा भाजपाकडून होत असल्याने खडसे समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सोशल मिडीयावरून खडसेंच्या छायचित्रासह संघर्षाच्या मथळ्यांखाली हा संतापही दिसून येत आहे. खडसेंचे जिल्हांतर्गत होत असलेले खच्चीकरण हे राजकारणाचाच एक डाव असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.

पण ‘मौका सब को मिलता है’ या उक्तीची दखल घेत आ. एकनाथराव खडसे यांनी तुर्तास तरी या सर्व प्रकारांबाबत मौन बाळगले असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

*