Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

आशा व गट प्रवर्तक कर्मचार्‍यांचा नेवासा तहसीलवर मूकमोर्चा

Share

मोर्चानंतर पंचायत समितीसमोर केले आत्मक्लेश आंदोलन

नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर काल मूकमोर्चा नेण्यात आला. आशा व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्या, ‘आशां’ना 10 हजार रुपये तर गट प्रवर्तकांना 18 हजार रुपये वेतन द्या, तिप्पट मानधन वाढीचे परिपत्रक तातडीने काढावे आदी मागण्यांसाठी पंचायत समितीपासून तोंडाला पट्ट्या बांधून हा मूकमोर्चा काढण्यात आला.

संघटनेच्या शारदाताई काळे, मंगल नगरे, मुक्ता काळे यांनी मनोगत व्यक्त केले. आशा कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांबाबत त्या म्हणाल्या, आशा व गट प्रवर्तक कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यासाठी काम करत आहेत. शासनाने आतापर्यंत केवळ मानधन वाढविण्याचे आश्वासन दिले. आरोग्य केंद्रातील नर्सला जो पगार मिळतो त्याच्या 30 टक्के किमान वेतन आम्हाला मिळाले पाहिजे. मानधन नको शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्या अशी मागणी केली.
आमच्या मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीवर माहेर व सासरकडील सर्व नातेवाईक बहिष्कार टाकणार आहेत याची शासनाने नोंद घ्यावी. असा इशारा दिला.

अ‍ॅड. बन्सी सातपुते म्हणाले, आशा व गट प्रवर्तक यांचे विविध मागण्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलने झाली. शासन गेंड्याच्या कातडीचे असल्याने दुर्लक्ष करीत आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. त्याप्रमाणे येणार्‍या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत. 35 रुपयांपासून काम करत असताना आज 1500 रुपये मानधनावर ग्रामीण भागाच्या आरोग्याचा कणा असलेल्या आशा व गट प्रवर्तकांना हक्कासाठी लेकरंबाळं घरी ठेवून रस्त्यावर उतरावे लागते मात्र आमदार खासदारांना एका रात्रीत पगार वाढ होते. आचारसंहितेच्या आधी मागण्या मान्य कराव्यात यासाठी शिष्टमंडळाने पालकमंत्री राम शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यांनी आश्वासन दिले आहे. जर मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून सरकारचा तेरावा घालावाच लागेल असेही ते म्हणाले.

यावेळी आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या रोहिणी कुलट,मंगल दराडे, अलका शिरसाठ, अनिता गव्हाणे, रोहिणी गायकवाड, कांचन चोरमल, लक्ष्मी उभेदळ, अंजली शेळके, नलिनी जपे, वंदना थोरात, मंगल चांदणे, प्रिया भोसे, संध्या राहुरकर यांच्यासह तालुक्यातील आशा सेविका व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तहसीलदार रुपेश सुराणा यांनी निवेदन स्विकारून तुमच्या मागण्या शासनाकडे पाठविण्यात येतील असे सांगितले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!