Type to search

ब्लॉग

आव्हान सोपे नाही!

Share

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाली. त्याचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले असले तरी बाळासाहेबांसाठी ही लढाई सोपी नाही. दुसर्‍या बाजूला येणार्‍या काळात भाजपचे नेतृत्व चंद्रकांत पाटील हेच असेल यावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब झाले आहे. अशा वेळी आपला गड राखण्याचे आव्हान बाळासाहेबांसमोर आहे.

पराभवाने मरगळ आलेल्या राज्यातील काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी आणण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली. त्यांच्या सोबतीला कार्याध्यक्ष म्हणून पाच शिलेदार देण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षामध्ये हा बदल झाला असतानाच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी राज्याचे महसूलमंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपत आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यांच्या या सूचक वक्तव्याची सुई या पाच कार्याध्यक्षांपैकी कोणाकडे आणि भाजपत येणारे आमदार कोण हे स्पष्ट झाले नाही. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांना भाजपची उमेदवारी देऊन विरोधी पक्षनेत्यालाच गळाला लावण्याचा अनुभव लक्षात घेता, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरून काँग्रेसचा आत्मविश्वास डळमळीत करण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

भाजपच्या या रणनीतीने गांगरून गेलेल्या काँग्रेस नेत्यांना व कार्यकर्त्यांना मानसिक बळ देऊन त्यांचामध्ये आत्मविश्वास जागृत करण्यास थोरात यशस्वी होतील का, हे खरे काँग्रेस पक्षापुढील आणि थोरातांसमोरील आव्हान आहे. विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. निवडणूक लक्षात घेऊनच थोरात आणि त्यांच्या शिलेदरांच्या नेमणुका झाल्या असतील; पण देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना टक्कर देऊन आगामी निवडणूक जिंकून देण्याची ताकद नव्या प्रदेशाध्यक्षांमध्ये आहे का? राज्यात लढताना एका सर्वंकष नेतृत्वाची गरज होती. ती गरज बाळासाहेब थोरात पूर्ण करतील का? असे झाले नाही तर केवळ चव्हाण गेले आणि थोरात आले, यापलीकडे नवे काय झाले, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.

बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे जुनेजाणते नेते आहेत. स्वच्छ आणि सहकारातले ज्ञानी अशी त्यांची प्रतिमा असली तरी राधाकृष्ण विखे-पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी ही आणि राज्यपातळीवर मंत्री म्हणून ओळख सोडली तर थोरातांची संघटनात्मक पातळीवर ओळख आहे का? मंत्री असताना आणि नंतर पक्षाचा कार्यक्रम म्हणून राज्यात ते फिरले असतील तेवढाच त्यांचा संपर्क धरता येईल. आजही खेड्यापाड्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला पवार नावाने हाक मारतात. विलासराव देशमुख कुणाचाही मोबाईल उचलायचे. थोरात यांच्याबद्दल अशी खात्री देता येईल? दुर्दैवाने राज्यात काँग्रेसकडे असा नेता नाही. पृथ्वीराज चव्हाणही कमी पडतात. अशोक चव्हाण यांच्यात संघटन कौशल्य आहे; पण तेही थकले आहेत.

महाराष्ट्रातल्या काँग्रेसला सर्वांना घेऊन चालेल अशा एका दमदार तरुण चेहर्‍याची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस अशी दोन-तीन गटात वाटली गेली आहे. काँग्रेसला कुणी हरवू शकत नाही. काँग्रेसवालेच काँग्रेसला हरवतात. जिल्ह्या-जिल्ह्यात हेच सुरू आहे म्हणून काँग्रेसला वाईट दिवस आले आहेत. काँग्रेसला एकत्र आणण्याचे आव्हान कसे आणि कोण पेलणार? नव्या टीमच्या नियुक्तीनंतरही या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. बाळासाहेब थोरात यांना एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला उभे करावे लागेल. यापुढील काळात जुने आणि नवे असे सर्वजण एकदिलाने काम करू आणि काँग्रेस पक्षाला राज्यात उभारी देऊ, असे थोरात यांनी पद स्वीकारल्यानंतर म्हटले आहे. पण काँग्रेसचा एकंदर इतिहास पाहता हे ‘एकदिलाने’ वगैरे शब्द प्रत्यक्ष व्यवहारात फारसे दिसले नाहीत.

थोरातांसाठी लढाई वाटते तितकी सोपी नाहीये. पक्ष मरगळलाय. वरिष्ठ नेते नाराज आहेत, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम त्यांना करावे लागेल. काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी शोकांतिका ही की, बरीच वर्षे सत्तेत राहिल्याने या पक्षाला रस्त्यावर उतरून आंदोलन करायला जमत नाही. आता आंदोलन करायला जावे तर वेळही उरलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, पैशाशिवाय काहीच होत नाही हा विचार काँग्रेसमध्ये पक्का रुजलेला आहे. त्यामुळे विचारधारा म्हणून पक्षाचे काम करायचे असते ही भावनाच फारशी दिसत नाही. दुसरीकडे चंद्रकांतदादा पाटलांसाठी सोयीच्या ग्राऊंडवर मॅच आहे. त्यांच्या सूचक वक्तव्याने त्यात आणखी भर पडणार आहे. त्याचबरोबर चंद्रकांतदादा हे येणार्‍या काळातले नेतृत्व असणार आहे, यावरही हे शिक्कामोर्तब आहे. अशा परिस्थितीत आपला आहे तो गड राखण्याचे आव्हान बाळासाहेब थोरात यांच्यासमोर असणार आहे.
– राजेंद्र पाटील, 9822753219

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!