आरोग्य कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीमुळे उपकेंद्राच्या दारातच आदिवासी महिला प्रसूत,बालक दगावले

0

अकोले (प्रतिनिधी)- तांभोळ येथील आरोग्य उपकेंद्रात कर्मचारी गैरहजेर असल्यामुळे एक गर्भवती महिला उपकेंद्राच्या दारातच बाळंत झाल्याची व उपचारा अभावी तिच्या नवजात बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच तांभोळ येथे घडली.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की- म्हाळादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत तांभोळ येथे उपकेंद्र आहे.तेथे आरोग्य सेवक म्हणून एस एस बोठे व आरोग्य सेविका म्हणून श्रीमती ए एन शिंदे हे कर्मचारी काम पहात आहेत. श्री.बोठे व श्रीमती शिंदे हे पती पत्नी आहेत.दिनांक 25 जून रोजी रात्री साडे दहा वाजता तांभोळ गावातील जानकी कैलास मधे या आदिवासी महिलेला प्रसूतीसाठी कुटुंबातील सदस्यांनी उपकेंद्रात नेले मात्र या उपकेंद्रास टाळे होते.

 

 

आरोग्य कर्मचारी निवासी थांबणे आवश्यक असतांना त्या दिवशी दोघेही बाहेर होते.त्यामुळे महिलेला तेथेच प्रसूती वेदना सुरु झाल्या.या महिलेने आरोग्य उपकेंद्राच्या दारातच मुलाला जन्म दिला.मात्र कर्मचारी गैरहजर असल्याने बालकाला उपचार न मिळाल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाला.यासंदर्भात किसन नाना भांगरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे.त्यात श्री.भांगरे यांनी म्हंटले आहे की-तांभोळ येथील आरोग्य उपकेंद्रातील कर्मचार्‍यांकडून रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही,ते लोकांशी उद्धतपणाने बोलत असतात,2016-17 मध्ये आरोग्य विभागा मार्फत घेण्यात आलेल्या प्लस पोलिओ मोहिमेचा सर्व्हे आरोग्य सेवक बोठे व आरोग्य सेविका शिंदे यांनी केलेला नाही.

 

 

त्यामुळे अनेक बालकांना पोलिओ च्या लसीकरणा पासून वंचित राहावे लागले ,संबंधीत कर्मचारी हे नागरिकांना ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात.त्यामुळे गावातील नागरिक त्यांचे विरोधात तक्रार देण्यास पुढे येत नाही.हे दोघेही कर्मचारी उपकेंद्रामध्ये नेहमी गैरहजर राहतात व रुग्णांना आरोग्य सेवा देत नाहीत.त्यामुळे तांभोळ गावात साथीच्या रोगाचा प्रसार होत आहे.

 

 

25 जून रोजी रात्री साडे दहा वाजता जानकी कैलास मधे या महिलेची प्रसूती उपकेंद्राच्या गेट मध्येच झाली.त्यावेळी उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी उपस्थित नव्हते.काही ग्रामस्थांनी त्यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.आरोग्य सेवा वेळेत न मिळल्यानेच जानकी मधे यांच्या नवजात बालकाचा मृत्यू झालेला आहे.या बालकाच्या मृत्यूस श्रीमती शिंदे व बोठे हेच जबाबदार आहेत.या बालकाच्या मृत्यूस जबाबदार अधिकारी -कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा गावकरी आंदोलन छेडतील असा इशारा दिला आहे.

 

 

संबंधित कर्मचार्‍यांची तातडीने येथून बदली करावी अशी मागणीही भांगरे यांनी आपल्या तक्रार अर्जात केली आहे.तक्रारीच्या प्रति जि प च्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, विभागीय आयुक्त,आरोग्य विभागाचे विभागीय उपसंचालक,जिल्हा आरोग्य अधिकारी ,पं स सभापती,जि प सदस्य,सरपंच तांभोळ आदींनी पाठविण्यात आल्या आहेत.

 

 

ग्रामस्थांच्याही या कर्मचार्‍यांच्या बाबत तक्रारी आहेत.ग्रामसभेतही त्यांच्या बदलीचा ठराव घेण्यात आला होता मात्र आरोग्य विभागाने कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळेच दुर्दवी घटना घडल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

 

 

तांभोळ उपकेंद्रातील आरोग्य सेवक व सेविका यांनी 24 तास उपकेंद्राच्या ठिकाणी हजर रहाणे आवश्यक होते मात्र त्यांच्या गैर हजेरीमुळेच हि संतापजनक घटना घडली. अधिकारी कर्मचार्‍यांच्या हलगर्जी पणामुळेच या बालकाचा मृत्यू झाला आहे.या दोघांना बाहेर सोडणारे म्हाळादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी श्री.शिंदे यांनी त्यांच्या जागी पर्यायी आरोग्य सेवेची व्यवस्था करावी लागत होती.मात्र त्यांनी ती केली नाही तेथे जर आरोग्य कर्मचारी उपकेंद्रात उपस्थित असते तर त्या बालकाला जीवनात येण्या अगोदरच आपले प्राण गमवावे लागले नसते.या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंदितांवर कडक कारवाईचा प्रस्ताव पाठविणार आहे.
मारुती मेंगाळ,उपसभापती,पं. स.अकोले

LEAVE A REPLY

*