Type to search

अग्रलेख संपादकीय

आरोग्यसेवेची उत्साहवर्धक कामगिरी

Share
मुंबईच्या ससून रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. रुग्ण बाबासाहेब जाधव हे सातारा जिल्ह्यातील तारळे गावचे रहिवासी आहेत. त्यांना यकृताचा त्रास होता. त्यावर प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय असल्याचा सल्ला त्यांना मिळाला. खासगी रुग्णालयात त्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च जाधव कुटुंबियांना पेलवण्यासारखा नव्हता.

त्यामुळे त्यांनी सरकारी रुग्णालयाचा आधार घेतला. सरकारी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि रुग्ण व त्याच्या कुटुंबियांचा विश्वास सार्थ ठरवला. राज्याच्या आरोग्यसेवेबाबत तक्रारीचे सूर नेहमीच उमटतात. तथापि यकृत प्रत्यारोपणासारखी अवघड शस्त्रक्रिया अगदी कमी खर्चात यशस्वी करून सरकारी आरोग्यसेवेला मोठे श्रेय ‘ससून’च्या डॉक्टर व रुग्णसेवकांनी मिळवून दिले आहे.

तो विश्वास सामान्य जनतेचे मनोबल वाढवणारा व रुग्णांना दिलासा देणारा ठरेल. आदिवासी समाजाचे आरोग्य व बालमृत्यूंचा अभ्यास करण्यासाठी शासनाने डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानुसार राज्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी सार्वजनिक आरोग्यसेवेवर अवलंबून आहेत. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना सरकारी आरोग्यसेवेचाच आधार असतो. तथापि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या अनेक समस्या आहेत. वेळोवेळी अनेक आरोग्य योजना जाहीर होतात.

त्यासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली जाते. तथापि योजनांच्या अंमलबजावणीचा तपशील सहसा जनतेला कळत नाही. सरकारी आरोग्यसेवेतील सेवकांची अनास्थासुद्धा जनतेच्या रोषाचे कारण बनते. अनेक ग्रामीण आरोग्य केंद्रे तर विनोदाचा विषय बनली आहेत. डॉक्टर व सेवकांची अनुपस्थिती रुग्णसेवेबाबत नाराजीचे कारण बनते. काही तालुका व उपजिल्हा रुग्णालयेदेखील सेवकांची अनास्था आणि औषधांच्या कमतरतेने गाजत असतात.

उपलब्ध असूनही यंत्रसामुग्री नादुरूस्त असणे किंवा ती यंत्रे व्यवस्थित हाताळणार्‍या तंत्रज्ञांची अनुपलब्धतासुद्धा रुग्णसेवेला तापदायक ठरते. ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार शासनाने केला असावा. आरोग्य व्यवस्थेतील उणिवा हेरण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. आरोग्यसेवेत कामचुकारपणा करणार्‍या सेवक व वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी तंबी नुकतीच देण्यात आली आहे.

उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधितांना त्वरित निलंबित केले जाईल, असेही सांगितले गेले आहे. तथापि ‘ससून’मधील अवघड शस्त्रक्रिया सफल झाल्यामुळे सरकारी आरोग्यसेवेतील सर्व संबंधितांचा उत्साह वाढेल व कार्यक्षमतेत अनुकूल बदल दिसू लागतील अशी आशा जनतेने करावी का?

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!