Type to search

आरोग्यसेवा सुधारणार कशी?

अग्रलेख संपादकीय

आरोग्यसेवा सुधारणार कशी?

Share
हजेरी नोंदवणारी बायोमेट्रिक प्रणाली खासगी आणि बहुतेक शासकीय आस्थापनांत स्वीकारली गेली आहे. तथापि काही शासकीय आस्थापनांमधील सरकारी सेवकांचा या प्रणालीला विरोध आहे. नवी मुंबई मनपाच्या सर्व रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी दिवसाला जेमतेम दोन तास काम करतात.

रुग्णालयातील परिचारिका, आया, आरोग्यसेवक, तंत्रज्ञ, सुरक्षारक्षक असे अनेक सरकारी सेवक दिवसाला सरासरी फार तर पाच तास काम करतात, असा निष्कर्ष रुग्णालयांतील बायोमेट्रिक नोंदींवरून निघाला आहे. नवी मुंबई मनपाची आरोग्यसेवा कोलमडली आहे. डॉक्टर आणि प्रशासनात वाद सुरू आहेत. मनपात कायमस्वरुपी सेवेत असणार्‍या डॉक्टरांना महिन्याला किमान लाखभर तरी वेतन असल्याचे सांगितले जाते. एवढे वेतन घेऊनही डॉक्टर दोनच तास काम करणार असतील तर आरोग्यसेवेचे आरोग्य कसे सुधारणार?

शासकीय सेवेत कायमस्वरुपी सेवा बजावत असताना स्वत:ची खासगी आरोग्यसेवा सुरू ठेवणे बेकायदेशीर आहे हा नियम सर्व डॉक्टरांना माहीत आहे. तरीही जेमतेम दोन तास सेवा सरकारी रुग्णालयात दिल्यावर त्यांचा इतर वेळ कुठे खर्च होतो? आपापला खासगी व्यवसाय सुरळीत चालावा म्हणून प्रारंभिक पायरीसारखा सरकारी सेवेचा उपयोग अशी बहुतेक डॉक्टर मंडळी करतात. आतापर्यंत अनेकदा सरकारी डॉक्टरांच्या खासगी व्यवसायाबद्दल चर्चा झाली आहे. तथापि अशा महत्त्वाच्या सेवेबाबत सरकारसुद्धा फारच कनवाळू दृष्टिकोन का स्वीकारत असावे हा प्रश्न जनतेला पडला तर नवल नाही. शासकीय सेवा-सुविधांचा हा दुुरुपयोग आहे;

पण त्याला आळा घालण्यात शासनदेखील का उत्सुक नसावे? सरकारी खर्चाने डॉक्टर व्हायचे, डॉक्टर झाल्यावर ग्रामीण भागात रुग्णसेवा करण्याची आधी मान्य केलेली अट दंड भरून रद्द करून घ्यायची आणि स्वत:चा खासगी व्यवसाय वाढवण्यासाठी सरकारी आरोग्यसेवेचा पायरीसारखा वापर करण्याचा उद्योग वर्षानुवर्षे राजरोस चालू आहे. खासगी व्यवसायाचा जम बसवण्यात काहीकाळ जावा लागतो.

अननुभवी नवीन डॉक्टरकडे जाण्यास रुग्ण सहसा धजावत नाहीत; पण ‘सरकारी रुग्णालयातील डॉक्टर’ हा शिक्का मारला गेला की तेच काम खूप सोपे होते. सरकारी रुग्णालयात आलेल्या रुग्णांना अधिक चांगल्या सेवेची गरज आहे हा सल्ला हस्ते-परहस्ते दिला जातो. खासगी व्यवसाय सुरळीत सुरू होतो. बायोमेट्रिक हजेरी प्रणालीला वर्षानुवर्षे अंगवळणी पडलेली ही पद्धत कशी रुचणार? या सर्व परिस्थितीचा साकल्याने विचार करून आरोग्यसेवेची प्रचलित पद्धत सुधारण्याचा विचार सर्व संबंधित आणि सरकार करील का?

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!