Type to search

आरोग्यदूत फिचर्स

आरोग्यदूत – स्त्री सखी : बस्ती

Share

आतापर्यंतच्या अनुभवावरून असे सारखे वाटायला लागलेय की आयुर्वेदात जी बस्ती चिकित्सा वर्णिली आहे ती बहुधा स्त्रियांना समोर ठेवून सांगितली असावी. किंबहुना स्त्री आरोग्याच्या गरजेतून निर्माण झालेला तो चिकित्सा प्रकार असावा. इतका तो त्यांच्या प्रत्येक समस्येवर चपखल असा उपाय ठरत आलाय.

स्त्री जात ही मुळातच कष्टकरी जात. त्यात कष्टकर्‍यांचा आणि वाताचा घनिष्ट संबंध. या वातामुळेच मानेपासून, कमरेपर्यंतची दुखजी जी स्त्रियांच्या पाचवीला पुजलेली. मग त्यात ओटीपोटातील गर्भाशय नामक महाशयांचा तर दुखणेकर्‍यात वरचा नंबर आणि याच सार्‍यांचा कर्दनकाळ म्हणजे बस्ती.

या बस्तीची एक सुंदर कथा सांगते. साधारणपणे 16 ते 22 वयोगटातील तीन बहिणी, बहिणीच त्या. त्यामुळे त्यांच खाणेपिणे, उठणे, बसणे, झोपणे या सर्व सवयी सारख्या प्रकारच्या, त्यामुळे आजारही परस्परांचे फोटोकॉपी. तो म्हणजे पाळीच्या वेळी ओटीपोटात, कमरेत भयंकर वेदना, पायात गोळे येणे, कधीकधी मळमळून येणे, तिघींनाही पाळी पूर्वी 4 दिवस अगोदर 2-2 बस्ती दिले. तिघींचाही अनुभव एकदम झकास! पाळी कशी आली, कशी गेली कळलेदेखील नाही. असे करत तीन महिनेपर्यंत पाळीपूर्वीच फिल्डिंग लावून वाताला आटोक्यात आणले. जेणेकरून ऐन पाळीच्या वेळी त्याचे काहीही चालले नाही. त्यानंतर तर तिघी बहिरी स्वत: होऊनच पाळीपूर्वी बस्ती घेऊन जातात. वरून म्हणतात. पाळीचा त्रास आता नाहीच, पण इतर आरोग्यासाठीही याचा उपयोग होतोच ना! आयुर्वेदाय तस्मै: नम:।

आम्ही नव्यानेच भाड्याने घेतलेल्या घरात रहायला गेल्यानंतर लक्षात आले, शेजारच्या घरातील माझ्याच वयाच्या ताई दुसर्‍यांदा प्रेग्नंट आहे. म्हणून सहजच त्यांच्याशी गप्पांमधून कळले सहावा महिना आहे आणि वारेची पोजिशन अशी आहे की, बहुधा तिची वाढ गर्भाशय मुखाकडच होईल. जेणे करून सिझेरियनची शक्यता जास्त असे. सोनोग्राफी रिपोर्ट. नुकतेच जोशी नानांच्या सहवासात 15 दिवस राहून आले होते.

गर्भावस्थेत बस्तीच्या उपयोगांवर नानांनी बरेच प्रबोधन केले होते. मला आयतीच संधी मिळाली. मी सहजच म्हटले, आयुर्वेदात बस्ती म्हणून प्रकार आहे त्याद्वारे हे सगळे टळू शकते. ती माझ्याही पुढे 4 पावले गेलेली म्हणते ते माहिती आहे मला. एका वैद्यांनी हे मला आधीच सांगितले, पण ज्याची खात्रीच नाही त्यावर हजारभर रुपये कोण खर्च करणार. मग काय तिलाच तेल विकत आणायला सांगितले आणि सुरू आठवड्यातून 2 वेळा घरपोच बस्ती.

अगदी कळा सुरू झाल्या म्हणून हॉस्पिटलमध्ये जातानासुद्धा एक बस्ती दिला आणि काय गंमत! दुखायला लागल्यापासून 3 तासांच्या आत अगदी सहजच ताईचे बाळंतपण पार पडले तेही खालच्या जागेवरील जुजबी कटही न घेता सिझेरियन तर फारच लांबची गोष्ट आहे. मग काय कुणी प्रेग्नंट आहे का प्रेग्नंट अशा नजरेनेच बायकांकडे बघू लागले. अशातच ओळखीतल्या एक बाई 8 वा महिना. पायावर भयंकर सूज. बी. पी. वाढलेले. गर्भारपणाची विधिवत काळजी नामवंत स्त्री रोग तज्ज्ञांकडून घेत असलेल्या अवस्थेत मला भेटल्या.

मी सहजच त्यांना बस्ती घेण्याविषयी सुचविले. 2-2 दिवसाआड 4-5 बस्ती होताच सूज बर्‍यापैकी उतरली व बी. पी. चा त्रासही बर्‍यापैकी कमी झाला. नेहमीचा असणारा मलावष्ठंभ अर्थातच गायब होता. असे करता जेव्हा माझी स्वत:चीच प्रेग्नंसी ारात येऊन ठेपली तेव्हा तर मी बस्तीरुपी ढाल व तलवार घेऊनच या सार्‍यांना सामोरी गेले. मळमळ झाली घे बस्ती, पाठ दुखते घे बस्ती, कंबर दुखते घे बस्ती, दात दुखतो, डोके दुखते, शौचाला साफ होत नाही, झोप येत नाही तर अगदी मध्यरात्री उठून घे बस्ती. असे कुठलेच लक्षण वा दुखणे बाकी ठेवले नाही. ज्याच्या प्रतिकारासाठी मी बस्ती वापरला नसेल. परिणामी बाळ एकदम स्टाऊट, अंगपिंडाने मजबूत, बुद्धीने तेजस्वी आणि मी! डिलेव्हरीनंतर तिसर्‍याच महिन्यापासून दवाखान्यातल्या धावपळीला सज्ज, कुठल्याही क्षणाला कुठलेही कष्टाचे काम करण्याची शरीर मनाची तयारी, मात्र साहसं वर्जयेत् बरं का! मी गर्भावस्थेत जसे उठसूठ बस्ती घेतले तसाच परिपाठ आताच्या धावपळीच्या दिवसातही चालूच ठेवलाय. आता तर अगदी थोडेही पोट बिघडून गॅसेस झाले की मान वा कंबर दुखणारच हे ठरलेले समीकरण मी आधीच मोडून काढते. अर्थातच बस्तीद्वारे.

मग काय घेणार ना या प्रेमळ उपहाराचा उपयोग करून.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!