आरती अवधूता महासोहळा

0

‘आरती अवधुता’ ही अवधुत सांप्रदायाची, श्रीपंतमहाराजांनी स्वयंस्फुर्तीने लिहिलेल्या आरतीला आज 3 सप्टेंबर 18 रोजी 125 वर्षे पूर्ण होत आहेत त्याचे औचित्य म्हणून याच आरतीचा सारांश अर्थया लेखातून मांडलेला आहे.

– संपादक
आरती अवधूता जय जय । आरती अवधूता ॥धृ ॥
मी तू पणाचा भाव टाकुनी । दर्शन दे संता ॥1॥
ज्ञानाज्ञान खेळ कल्पुनी । सुख देसी चित्ता ॥ 2 ॥
प्रेमास्तव हा जन्म घेतला । बाणली खून दत्ता ॥3॥
श्री पंत महाराज बाळेकुंद्री हे बेळगाव येथील प्रसिध्द संत असून 1855 ते 1905 या अल्पशा कालावधीत त्यांनी अवधूत संप्रदायाचा प्रचार, प्रसार केला. त्यांचा जन्म श्रावण वद्य 8 शके 17777 म्हणजे दि. 03/09/1855 सोमवार रोजी रोहिणी नक्षत्रावर बेळगाव जिल्ह्यातील ‘दड्डी’ गावी त्यांच्या मातुलगृही झाला. आज 163 वर्षांनी तोच वार, तेच नक्षत्र, तीच तिथी व तीच तारीख असा योग जुळून आला आहे. आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे ‘आरती अवधूता’ या आरतीला याच दिवशी 125 वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या 38व्या जन्मदिवशी ऑगस्ट 1893मध्ये गुकुळाष्टमीला श्रीपंतांनी परमप्रिय भक्त ‘आण्णा यांना लिहिलेल्या पत्रात’ (पत्र क्र. 117 श्रींची पत्रे) या आरतीचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये श्री पंत महाराज म्हणतात, “खालील वाक्ये जन्म दिवसाची आहेत. आण्णा! प्रेमामृताकरिता राहणे आहे, त्याचीही तृप्ती जाहली”. यानिमित्त हे वर्ष ‘आरती अवधूता वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे. दि. 03/09/2018 गोकुळ अष्टमी दिवशी 125 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे यानिमित्ताने या आरतीबद्दल अधिकाधिक प्रबोधन, अध्ययन करणेचा सर्व पंतभक्तांचा मानस आहे. याच दिवशी जिथे जिथे पंत भक्त आहेत, जिथे जिथे दत्त मंदिरे आहेत, त्या सर्व ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.

श्रीपंतांचे प्राथमिक शिक्षण दड्डी व माध्यमिक शिक्षण बेळगाव येथे झाले. बेळगाव येथे मिशन स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण करत असताना पार्श्ववाड येथील अवघ्या 20व्या वर्षी त्यांना ‘परमहंस सदगुरु श्री बालावधूत उर्फ बालमुकूंद’ उर्फ श्री. बाळाजी अनंत कुलकर्णी यांचा अनुग्रह झाला. अवधूत संप्रदायाची धुरा सांभाळण्याची गुणवत्ता श्रीपंतांचे ठायी असल्याची जाणीव श्री बाळाप्पांना झाल्यामुळे त्यांनी श्रीपंतांकडून परिपूर्ण योगाभ्यास करुन घेतला. वेळोवेळी प्रवृत्ती-निवृत्तीचा समन्वय पटवून देऊन प्रपंच सांभाळून परमार्थाची बिकट वाट चालण्याचे अनमोल ज्ञानभांडार त्यांच्यासाठी उघड केले.

चरितार्थासाठी शिक्षकीपेक्षा स्विकारलेल्या श्रीपंतांवर संप्रदाय चालवण्याची जबाबदाी सोपवून श्रीबाळाप्पा श्रीशैल्य यात्रेस कायमचे निघून गेले. 1882 मध्ये सौ.यमुनाक्कांशाी विवाहबध्द झाल्यानंतर योगाभ्यासाची परिसिमा गाठलेल्या श्रीपंतांची वृत्ती हळूहळू भक्ती व भजनामध्ये रंगू लागल. सन 1883 ते 1889 चा कालखंड त्यांनी संप्रदाय प्रसार व प्रबोधन यात व्यतित करून अनेक शिष्यशाखा जोडल्या. सन 1885 साली श्रीबालमुकूंद उर्फ बाळाप्पांच्या महानिर्याण जाणीव अंत:प्रेरणेने झाल्यानंतर श्रीपंतांनी त्यांच्या पादुका स्थापन केल्या. गुरुद्वादशी, दत्तजयंती, गुरुप्रतिपदा यासारखे उत्सव सुरू करून ‘सद्गुरुभक्ती, बंधूप्रिती व आत्मशांती’ या त्रिसूत्रीचे बीजरोपन केले. त्यांचे अनेक मार्गदर्शनपर लेख ‘दत्तेप्रमेलहरी’ पुस्तकमालेत प्रसिध्द आहेत.

भजनानंदात रममान होतांना त्यांच्यात लुप्त असलेल्या कवीमनाला जागृती येऊन काव्यगंगा पाझरू लागली. परिस्थितीनुरूप तत्वज्ञानप्रविष्ट, प्रबोधनपर, कारूण्यभरीत अशी वैविध्यपूर्ण, रसमय, सद्गुरू प्रेमानुभवाने ओथंबलेली, अभंगरचना ही श्रीपंतांच्या काव्यरचनेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्या अप्रतीम, आर्ष आणि उत्स्फूर्तवाणीचा, शारदेचा अवतार म्हणजेच आजचे ‘श्रीदत्तप्रेमलहरी भजनगाथारूप’! पहिल्या पुष्पात असलेले सुंदर पदांचे संकलन ! यामध्ये श्री पंतांनी उत्स्फूर्त गायलेल्या पदांपैकी 2730 पदे, 84 आरत्या, धावे, पाळणे, कानडी पदे भक्तांनी संकलित करून ठेवल असून ती ‘श्री दत्तेप्रेमलहरी’ या नावाने ‘श्री पंत वाङमय प्रकाशन मंडळाने’ प्रकाशित केली आहेत. ती सर्व पदे व आरत्या इ.श्री पंतांच्या आत्मानुभवावर आधारित आहेत.

आत्मदर्शनातून सद्गुरूभक्ती प्रतिबिंबीत करतांना श्रीपंतांनी सर्व भक्तांना 84 आरत्यांचा कृपाप्रसाद दिला. त्यातील ‘आरती अवधूता’ ही एक जिथे जिथे दत्तभक्ती आहे तिथे व भजन संप्रदाय आहे. अशा सर्व ठिकाणी म्हणण्यात येणारी त्यातील आरती म्हणजे ‘आरती अवधूता’ ही आरती. समाजात असलेल्या वेगवेगळ्या आरत्यांमधील उपास्यदेवतांचा महिमा, सगुणरूप वर्णन अशा मर्यादित संकल्पनेपेक्षा सद्गुरुशिष्य समरसता, ऐक्यबोध यांनी परिपूर्ण असा समर्पणाभिमूख प्रेमाचा अविष्कार श्रीपंतआरती संग्रहातून पहायला मिळतो.

‘आरती अवधूता । जय जय आरती अवधूता’ ॥
श्रीपंत म्हणतात, अवधूताचे स्वरूप निर्गुण किंवा सगुण आठवतांनाच स्वरूपसार्वभौमत्व सिध्द होते. असा सर्वव्यापक, अविनाशी सद्गुरु, जो अवधूत आहे त्यांचा जयजयकार असो.

मी तू पणाचा भाव टाकूनी । दर्शन दे संता ॥
ज्याची आरती करावयाची तो अवधूत – जो करणारा तोही अवधूत आणि आरती ओवाळणे सुध्दा अवधूतच ही अभेद भावना होण्यासाठी माझ्यातील मी-तू पणा टाकून, तुझ्यात समरस होण्यासाठी तुझे सर्वव्यापी, शुध्द निर्गुणपण मला ओळखू येईल, असे दर्शन मला दे.

ज्ञानाज्ञान खेळ कल्पुनी । सुख देसी चित्ता ॥
अहंता टाकून तुझ्याशी असलेले अभेद नाते ओळखणे हेच मान, ओळखता न येणे हेच अज्ञान. गुरु-शिष्य, सगुण-निर्गुण, बंध-मोक्ष हे सर्व तुझ्याच कल्पनेचे खेळ आहेत याची जाणीव तूच करून देऊन सुखी करून माझ्या चित्तामध्ये तुझे प्रेमस्वरूप स्फुरण पावले. हीच तुझी आरती.

प्रेमास्तव हा जन्म घेतला । बाणली खूण दत्ता ॥
म्हणून पंतमहाराज म्हणतात, ‘एकटेपणामध्ये प्रेमभोग घडत नाही. तो घडावा यासाठी हा सारा संसाररूपी खेळ तू प्रगट केलास. केवळ प्रेम भोगण्यासाठी मी मनुष्यजन्म घेतला आणि प्रेम भोगण्यासाठी तू ही अवतरलास ही खूण आम्हांला दिलीस म्हणून तुझ्या प्रेमात, तुझ्या चरणी लिन होऊन म्हणतो –
‘ जय जय आरती अवधूता’ ॥

LEAVE A REPLY

*