आयुष्यात स्वयंप्रेरीत व्हा !

0
जळगाव  / आयुष्यात यश अपयश येतच असतात. त्यामुळे संयम, जिद्द आणि चिकाटी हवी. अपयशानंतर न्युनगंड निर्माण होतो. मात्र न्युनगंड बाजूला सारुन आयुष्यात स्वयंप्रेरीत व्हा, असा मोलाचा सल्ला देवून प्रज्ञाचक्षु प्रांजल पाटील यांनी आपल्या यशाचा प्रवास उलगडला.
युपीएससी परीक्षेत 124 वा रँक मिळवून उत्तीर्ण झालेल्या प्रज्ञाचक्षु प्रांजल पाटील जळगावात आल्या होत्या. यावेळी त्यांनी परिवारासह औद्योगिक वसाहतीतील दै.‘देशदूत’च्या मुख्य कार्यालयात सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी ‘देशदूत’ परिवाराशी दिलखुलास संवाद साधला. प्रारंभी ‘देशदूत’चे संपादक हेमंत अलोने, महाव्यवस्थापक विलास जैन यांनी प्रांजल पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

यावेळी प्रांजल यांचे पती कोमलसिंग पाटील, वडिल एल.बी. पाटील, भाऊ निखिल पाटील, दीपस्तंभचे जयदीप पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. अलोने यांनी तर आभार डॉ.गोपी सोरडे यांनी मानले.

अभ्यासात अनेक अडचणी
स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतांना अनंत अडचणी आल्या. परंतु या अडचणींवरही मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून माहिती संकलीत केली. परीक्षेच्या अनुषंगाने जी पुस्तके मिळतील ती पुस्तके स्कॅन करुन ठेवलेली आहेत. डोळ्यांनी वाचलेलं लगेच लक्षात येतं. परंतु जे ऐकतो ते लगेच कळत नाही. अशाही परिस्थितीत नियमितपणे स्पर्धा परीक्षेची तयारी केली असल्याचे प्रांजल पाटील यांनी सांगितले.

आयएएसचे ध्येय निश्चित
आयएएस होण्याचे ध्येय निश्चित केलेले होते. त्यासाठी कुटुंबाचेही पाठबळ होतेच. त्यामुळेच माझे ध्येय गाठू शकले, असेही प्रांजलने यावेळी सांगितले.

आत्मविश्वास महत्वाचा
आयुष्यात अपयश आल्यानंतर निश्चितच न्युनगंड निर्माण होतो. परंतु आत्मविश्वास महत्वाचा आहे. अपयश आल्यानंतर तिथेच न थांबता पुन्हा जिद्दीने यश मिळविण्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे.

दिव्यांगांसाठी जिल्ह्यात उपक्रम राबविणार
जळगाव जिल्ह्यातील असल्यामुळे माझी नाळ या मातीशी जुळलेली आहे. जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी काहीतरी उपक्रम सुरु करता येईल का? यासाठी निश्चितच प्रयत्न सुरु असल्याचेही प्रांजलने सांगितले.

सहानुभूती नको
मुलगा किंवा मुलगी असा भेद करायला नको. मी मुलगी असून एकटी कुठेही जावू शकते. हा माझ्यासाठी गर्व नाही तर माझा स्वाभिमान आहे. त्यामुळेच मी समानता मानणारी आहे. केवळ अंध आहे म्हणून दयेची भावना नको, असेही प्रांजलने स्पष्ट केले. एखादी स्त्री यशस्वी झाली की, पुरुषाला श्रेय दिले जाते. परंतु पुरुष यशस्वी झाल्यास स्त्रीला श्रेय दिले जात नाही. ही मानसिकता समाजामध्ये आढळून येत असल्याचे परखड मत प्रांजलने व्यक्त केले.

संयम अपेक्षित
स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यानंतर हताश न होता संयम ठेवला पाहिजे. अभ्यासात नियमितपणा ठेवला पाहिजे. त्याचबरोबर जिद्द आणि चिकाटी देखील महत्वाची आहे.

पतीने खुप शिकावं
जेएनयु दिल्लीमध्ये एम.फिल करीत असतांना भुसावळ येथील कोमलसिंग पाटील यांच्याशी माझा विवाह झाला. कोमलसिंग हे स्वतःच्या पायावर उभे राहुन त्यांनी व्यवसाय सुरु केला. व्यवसाय करीत असतांनाच शिक्षण देखील सुरु होते. आता कोमलसिंग हे बारावी उत्तीर्ण झाले आहेत. माझ्या बरोबरीनेच त्यांनीसुध्दा खुप शिकावं अशी अपेक्षा प्रांजलने व्यक्त केली.

संवेदनशीलता नाहीच
मागील वर्षी युपीएससी परीक्षेत 773 रँक मिळवून उत्तीर्ण झाले. परंतु रेल्वे विभागाने केवळ अंधत्वाच्या कारणावरुन नाकारले. सरकार नियम बदलवू शकतात. परंतु शासकीय यंत्रणा चालढकल करीत होती. सरकार कुठलेही असो पण दिव्यांगांच्या बाबत क्रांतीकारी संवेदनशीलता निर्माण झालेली नाही, अशी खंत प्रांजलने व्यक्त केली.

अहंमपणा आल्यास समाजही जबाबदार
अंधत्वावर मात करुन युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. मी टोकाचा स्वाभिमान जपते. स्वाभिमानाचे रुपांतर अहंमपणात होणार नाही याची काळजी मी घेईनच पण तरीही अहम आल्यास त्यास माझ्याबरोबर समाजही तेवढाच जबाबदार असेल. कारण माझ्या कार्यक्षमतेवर रेल्वे विभागाने नोकरी नाकारली. त्यामुळे हे शल्य नेहमीच बोचत राहण्यासारखे असल्याचेही प्रांजलने सांगितले.
राजकीय पाठबळाचा अभाव
तामीळनाडूमधील अशाच एका उमेदवाराला नोकरी नाकरली होती. त्यावेळी जयललिता यांनी राजकीय वजन वापरुन त्या उमेदवाराला नोकरी मिळवून दिली. रेल्वे विभागाने मला नोकरी नाकारल्यानंतर महाराष्ट्राचेच केंद्रीय रेल्वेमंत्री असलेले सुरेश प्रभु यांची भेट घेतली. तसेच अनेक राजकीय नेत्यांची भेट घेतली. परंतु मला राजकीय पाठबळ मिळाले नाही. राजकीय पाठबळ मिळाले असते तर मलाही न्याय मिळाला असता, अशी स्पष्ट भूमिका प्रांजलने व्यक्त केली.

शिक्षण पाहून प्रांजलशी केले लग्न – कोमलसिंग पाटील
प्रांजल ही डोळस नसली तरी डोळस व्यक्तीला लाजवेल, असे गुण तिच्यात आहेत. प्रांजलचे शिक्षण पाहूनच लग्न केल्याची भावना प्रांजलचे पती कोमलसिंग यांनी व्यक्त केली. मी नुकताच बारावी पास झालो आहे. माझ्या पत्नीच्या प्रेरणनेच यापुढे शिक्षण घेणार असल्याचेही प्रांजलचे पती कोमलसिंग यांनी यावेळी सांगितले.
प्रांजलचा प्रवास खडतर – एल.बी. पाटील
प्रांजलचे दोन्ही डोळे अधू झाले. शस्त्रक्रिया केली परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. प्रांजल ही शिक्षणात आधीपासूनच हुशार होती. प्रांजलची आई दररोज वृत्तपत्र वाचून द्यायची. शालेय शिक्षण झाल्यानंतर मुंबईतील सेंट झेव्हीअर्स कॉलेजला तिने बी.ए. केले. दररोज ती 60 कि.मी. लोकलने प्रवास करायची. सुरुवातीला महिनाभर मी प्रांजलला घेवून जायचो. परंतु त्यानंतर ती एकटीच जात होती. बी.ए. नंतर जेएनयु दिल्ली येथे एम.ए. आणि एम.फिल आणि आता ती पीएचडी करीत आहे. प्रांजलचा प्रवास हा फार खडतर होता. अशाही परिस्थितीत तिने आपल्या अपंगत्वावर मात करुन यश संपादित केले, असे सांगत असतांनाच डोळ्यातून अश्रु तराळत होते.

LEAVE A REPLY

*