‘आयमा’ प्रचाराचा आज शेवटचा दिवस; उद्या मतदान निवडणूक पार्श्‍वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

0

सातपूर | दि. २७ प्रतिनिधी – आयमा निवडणुकीच्या एक दिवस अगोदर पुन्हा एकदा आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींद्वारे निवडणूक रंगतदार करण्याचा प्रयत्न दोनही गटांकडून करण्यात आल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आयमाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस असून, मंगळवारी प्रत्यक्ष मतदान घेतले जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर काल पत्रकार परिषद घेऊन दोनही गटांनी आरोप- प्रत्यारोप केल्याने निवडणुकीत रंग चढला आहे. आयमा निवडणुकांना पोलीस ठंाण्यातील तक्रारींची पार्श्‍वभूमी आहे. त्यामानाने यंदाच्या निवडणुकीत केवळ पत्रकार परिषदेतून आरोप- प्रत्यारोपामुळे लोकांची करमणूक होत असली तरी निवडणुकाच्या काळात उडणार्‍या या धुराळ्यातून संघटनेची प्रतिमा मलीन होत असल्याने उद्योजकांत नाराजीचा सूर उमटत आहे.

खालच्या पातळीवर प्रचार
उद्योगांना कोणतीच जात, पंत, धर्म नसतो. उद्योजक व माझा उद्योग हीच माझी जात आहे. १५ वर्षांपासून काम करीत आहे. सोबत जेवताना आपण जात पाहत नाही मग प्रचारात कां? ही निवडणूक उद्योजकांची आहे की गल्लीतील? माझा प्रचार हा विकासावरच व सकारात्मक विचारांवर राहणार आहे. जातीय प्रचार करणार्‍यांना उद्योजक जागा दाखवतील.- वरुण तलवार (उमेदवार)

एकटा पाडण्याचा प्रचार
माजी अध्यक्षांद्वारे सोशल मीडियावर सुरू असलेला प्रचार चुकीचा आहे. मागील निवडणुकीत एकाच गटाचे मत बाद करणारी यंत्रणा भ्रष्ट होती. मतदार यादीत घोळ आहे. अध्यक्षपद जिंकल्यास एकटा पाडण्याचा प्रचार केला जात आहे. मात्र, आतून सर्व कमिटीची साथ आहे.-तुषार चव्हाण (उमेदवार)

घराणेशाहीसाठी जुन्यांना डावलले
सातत्याने २०१२ नंतर शब्द देऊन फिरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडक लोकांच्या हातात एकताची सूत्र असल्याने मनमानी कारभार केला जात आहे. आयमा हाऊसवरील केसेस मागे घेण्यात आलेल्या आहेत. या केसेसमुळे आयमाचा २ कोटी, ११ लाखांचा फायदाच झालेला आहे. सोबत वास्तूदेखील आयमाकडेच राहिली आहे. यावर पुन्हा चर्चा होत असल्याने खेद वाटतो.

तुषारवर सातत्याने अन्याय होत असल्याने केवळ एका जागेसाठी निवडणूक लढवण्यात येत आहे. ज्यांनी चूक केलेली नाही, त्यांच्याशी भांडण्याचे काय कारण, म्हणून एकाच जागेसाठी लढत राहणार आहे. मनमानी कारभाराविरोधात ही निवडणूक आहे. या पॅनलद्वारे आता घराणेशाही सुरू करण्यात आलेली आहे. जुने अनुभवी बाजूला ठेवले जात आहेत, तर नवख्यांना पुढे आणले जात आहे. १६०० उद्योगांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जुन्या ज्येष्ठांना डावलून युवकास पुढे आणले जात असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी तुषार चव्हाण, संजय महाजन, कैलास आहेर, कैलास वराडे, हिमांशू कनानी, बाळासाहेब गुंजाळ, सरदार देवरे, राजेंद्र नागरे, जयंत पवार, नीलेश पवार उपस्थित होते.

विकासासाठी कामे करा, मग हक्क सांगा
इच्छुकांशी चर्चा करून एक विचाराने कामाचा आढावा घेऊन चर्चेतून एकमताने निवड करणे ही एकता पॅनलची पद्धत आहे. चव्हाण यांच्याशीही चर्चा करण्यात आली होती. मागील चार निवडणुकांमध्ये फक्त एकच उमेदवार कां? कारण त्यांनाच फक्त महत्त्वाकांक्षा आहे. महत्त्वाकांक्षेवर उमेदवारी दिली जात नाही. येथे संघटनेत काम करावे लागते. कामाच्या मोजमापावरच उमेदवारी अन् पदे दिली जातात. त्यांना केवळ ‘अन्याय’ आणि ‘शब्द’ एवढेच माहीत आहे. आयमा इंडेक्स अध्यक्षपद धरसोडपणामुळे लांबणीवर पडले.

रद्द करण्याची नामुष्की येणार होती. याची वाच्यता नाही. अन्याय समजतो, जबाबदारी समजत नाही. याच्या दोन वेळेला केसेस मागे घेण्यावरुन तडजोड झाली होती. मात्र, अद्यापही केस संपलेल्या नाही, न्यायालयाने सुनावणी ठेवलेली आहे. ४१ अंतर्गत संस्थेच्या विरुद्ध केलेल्या दोन वेगळ्या केसेस आयमावर प्रलंबित आहेत. उद्योगांच्या, आयमाच्या विकासासाठी काम करा, मग हक्क सांगा, असे एकता पॅनलच्या वतीने पत्रकार परिषदेत ठणकावण्यात आले. यावेळी धनंजय बेळे, वरुण तलवार, ज्ञानेश्‍वर गोपाळे, राधाकृष्ण नाईकवाडे, गोविंद झा, जितेंद्र आहेर, राजेंद्र पानसरे, विवेक पाटील, बिएस पाटील, सचिन शर्मा, अनिल डिंगरे, अविनाश मराठे, सुदर्शन डोंगरे होते.

LEAVE A REPLY

*