‘आयएमए’च्याअध्यक्षपदी डॉ.अग्रवाल, सचिवपदी डॉ.पाटील

0

जळगाव |  प्रतिनिधी :  शहर इंडियन मेडिकल असोसिएशनची निवडणूक नुकतीच बिनविरोध होऊन अध्यक्षपदी डॉ.विश्वेश अग्रवाल तर सचिवपदी डॉ.राजेश पाटील यांची निवड करण्यात आली. आयएमएच्या महत्त्वाच्या या दोन्ही पदांवर एकाच वेळी दोन्ही व्यक्ती बालरोग तज्ज्ञ असल्याची पहिलीच घटना आहे.

नूतन कार्यकारिणीच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ.चंद्रशेखर सिकची व डॉ.सी.जी.चौधरी यांनी काम पाहिले. त्यात १३ जागांसाठी जवळपास ५० डॉक्टरांनी अर्ज दाखल केले होते. चर्चेअंती निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी निवड झालेले डॉ.विश्वेश अग्रवाल बालरोग तज्ज्ञ असून त्यांच्या कुंटूंबातील दुसरी पिढी देखील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांच्या पत्नी प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल या रायसोनी मॅनजेमेंट इन्स्टिट्युटच्या संचालिका आहेत.

2IMA

 

सचिवपदी निवड झालेले डॉ.राजेश पाटील यापूर्वी आयएमएचे सहसचिव होते. ते देखील सुप्रसिध्द बालरोग तज्ज्ञ म्हणून रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष व सध्या सहप्रांतपाल आहेत. आयएमएच्या राष्ट्रीय पातळीवर झालेल्या क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक क्रिडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून व सर्वोत्तम गायक म्हणून उल्लेखनीय यश मिळवून जळगाव आयएमए चा नावलौकिक वाढविला आहे.

केवळ डॉक्टरांच्या विविध प्रश्नी झालेल्या मोर्चे, संप, आंदोलनामध्येच नव्हे तर डॉक्टर, आयएमए आणि रूग्ण किंवा डॉक्टर आणि प्रसारमाध्यमे यांच्या समवेत संवाद साधण्यातही ते अग्रभागी असतात. मेडिबीट या डॉक्टरांच्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात तर मराठा मंगल या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात ते नेतृत्व करीत आहेत.

नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्ष डॉ.किरण मुठे, कोषाध्यक्ष डॉ.तुषार बेंडाळे, सहकोषाध्यक्ष डॉ.पंकज शहा, सहसचिव डॉ.स्नेहल फेगडे, डॉ.राधेश्याम चौधरी, जनसंपर्क अधिकारी डॉ.जितेंद्र कोल्हे, सहजनसंपर्क अधिकारी डॉ.दिलीप महाजन, कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ.मनिषा दमानी, डॉ.तिलोत्तमा गाजरे, डॉ.भरत बोरोले, डॉ.प्रशांत देशमुख, डॉ.सुशिल राणे, डॉ.विकास बोरोले यांची निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

*