Type to search

आम्हा सर्व भारतीयांची काश्मिरी जबाबदारी!

ब्लॉग

आम्हा सर्व भारतीयांची काश्मिरी जबाबदारी!

Share
काश्मिरी समाजात पसरलेले नैराश्य योग्य शिक्षण आणि पुरेसा रोजगार देऊनच दूर करता येऊ शकेल. काश्मिरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून परत जाण्यास सांगून आम्ही केवळ विकासाच्या त्यांच्या संधीच अवरुद्ध करीत नाही तर त्यांचे नैराश्य वाढवण्याचे कामसुद्धा करीत आहोत. हेच नैराश्य त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यास कारणीभूत ठरते. या युवकांना सोबत घेऊन आम्हाला दहशतवादाविरुद्ध लढायचे आहे. पंजाबात अशाच प्रकारचे प्रयत्न यशस्वी ठरले. मग काश्मिरात असे यश आपण का मिळवू शकलो नाही?

पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. ती स्वाभाविक आहे तशीच आश्वासकसुद्धा! आश्वासक यासाठी की, सर्व प्रकारचे मतभेद असतानादेखील देशाची एकता आणि सुरक्षेच्या प्रश्नाबाबत आम्ही सारे एक आहोत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपासून कच्छपर्यंत संताप आणि सूड घेण्याची भावना व्यक्त होत आहे. राष्ट्रविरोधी शक्तींना कोणत्याही स्थितीत यशस्वी होऊ द्यायचे नाही, असा देशाचा दृढ संकल्प आहे. या जोश आणि उत्साहाला अभिवादन! देशाचे नेतृत्व जनमानसाच्या या भावनेला योग्य दिशा देण्यात सफल ठरेल, अशी आशा करावी का?

राष्ट्रवादाच्या या ज्वराचा सर्वात मोठा धोका भावनांमध्ये वाहवत जाण्याचा असतो. म्हणून उत्साहाच्या भरात तारतम्य गमावू नये, असे म्हटले जाते. संयम आणि शिस्त टिकवण्याची गरजही अधोरेखित केली जाते. जम्मू-काश्मीरमध्ये दीर्घकाळापासून दहशतवादी आणि फुटीरतावादी शक्ती डोके वर काढत आहेत. आमचा शेजारी पाकिस्तान या स्थितीचा लाभ उठवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करीत आहे, हेही खरे! काश्मीरमधील देशविरोधी शक्तींनी डोके वर काढण्याच्या प्रयत्नांची केवळ अवहेलना करून चालणार नाही अथवा पाकच्या नापाक कारवायांना केवळ बदला घेण्यापर्यंत मर्यादित ठेवून चालणार नाही. प्रश्न फक्त बदला घेण्याचा नसून त्यांचे इरादे विफल ठरवण्याचा आहे. ते इरादे आमच्या देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला आव्हान देत आहेत. मात्र आमची लढाई दहशतवादाशी आहे, या गोष्टीकडेही लक्ष पुरवणे आवश्यक आहे. दहशतवादी कारवायांद्वारे देशाला कमकुवत करणार्‍या प्रवृत्ती व शक्तींना संपवायचे आणि त्यांना विफल करायचे आहे. अशा शक्ती देशाबाहेरूनही काम करीत असतात आणि आमच्यातही सक्रिय असू शकतात. याच अनिष्ठ शक्तींशी आमची लढाई आहे. या शक्तीचे एक नाव आहे दहशतवाद! या शक्तींना आम्हाला सर्व ताकदीनिशी नमवायचे आहे.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणात व्हायला नको असे काही घडत आहे. डेहराडून, मेरठ आणि पानिपतसारख्या ठिकाणी दहशतवाद्यांऐवजी काश्मिरी नागरिकांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. देशाच्या इतर भागातसुद्धा काश्मीरमधील विद्यार्थी उच्चशिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना परत जाण्यास सांगितले जात आहे. त्यांनी कुठे जावे? आणि का? ते भारताचे नागरिक नाहीत का? त्यांना परतण्यास सांगून आम्ही कोणता संदेश देऊ इच्छितो? पुढील वर्षापासून काश्मिरी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा डेहराडूनमधील एका महाविद्यालयाने केली आहे. काश्मीर आमचे आहे; पण काश्मिरी आमचे नाहीत हा कोणता विचार? देशात धर्म आणि प्रादेशिकतेच्या नावावर अशा प्रकारच्या फुटीरवादी प्रवृत्तीला प्रोत्साहन देऊन आम्ही दहशतवाद्यांचीच मदत करणार का? आम्ही कमकुवत व्हावे, आमच्या एकतेवर आच यावी आणि आमच्या देशात धर्म व जातीच्या नावावर दंगे उसळावेत हेच तर दहशतवाद्यांना हवे आहे.

गोष्ट सांप्रदायिकतेची असो अथवा दहशतवादाची, या दोन्हींच्या आधारे आम्हाला कमकुवत बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यदाकदाचित सर्व दहशतवादी मुस्लीम असतील; पण प्रत्येक मुस्लीम दहशतवादी असतो असे म्हणणे अतिशयोक्त व चुकीचे ठरेल. काश्मीरमध्ये काही फुटीरवादी प्रवृत्ती सक्रिय आहेत म्हणून सगळेच काश्मिरी फुटीरवादी आहेत, असेही म्हणणे चूक ठरेल. दहशतवाद समजण्यासाठी दोन अधिक दोन अर्थात चार असे सोपे गणित चालणार नाही. जगाच्या पाठीवर अनेक भागात दहशतवादी वेगवेगळ्या हेतूने आणि अनेक पद्धतीने आपला स्वार्थ साधण्यासाठी सक्रिय आहेत. म्हणून दहशतवादाविरुद्धची लढाई केवळ भारताची नाही. ही लढाई जगाला एकजुटीने लढावी लागेल. भारताचा शेजारी वैश्विक दहशतवादाचे केंद्र बनू पाहत आहे हा मुद्दा जगातील प्रत्येक महत्त्वपूर्ण व्यासपीठावरून पटवून देण्याचा प्रयत्न आपला देश करीत आहे.

दुर्दैव म्हणजे दहशतवादाचा आधार घेऊनच आमचा शेजारी स्वत:चीच पाळेमुळे कमकुवत करीत आहे; पण याला केवळ दुर्दैव म्हणून चालणार नाही. त्यासाठी समग्र मानवतेला दहशतवादापासून मुक्त करण्याचे प्रयत्नही व्हायला हवेत. यातील एक प्रयत्न म्हणजे आपल्यामध्ये डोके वर काढू पाहणारा दहशतवादी विचार संपुष्टात आणण्याचा आहे. पुलवामात दहशतवादी हल्ला करणारा आमच्याच देशाचा नागरिक होता हे तर खरे! मग भलेही त्याला दहशतवादी बनवणारा त्याचा धनी पाकिस्तानात बसलेला असेल. आपल्या कामात दहशतवादी शक्ती यशस्वी ठरल्या याचा अर्थ आपल्या त्या तरुणाला दहशतवादी विचारांची शिकार होण्यापासून वाचवण्यात आम्ही अपयशी ठरलो. या दिशेने आम्ही प्रयत्न करीत नाही असा नव्हे; पण हे प्रयत्न पुरेसे नाहीत, असे दिसते. दहशतवादी ज्या काश्मिरी युवकांच्या हाती बंदुका सोपवण्यात अपयशी ठरतात त्या हातात ते दगड देतात. दगड फेकणारी आमचीच मुले आहेत. त्यांचे हात दगड फेकण्यासाठी नसून कारखान्यांत यंत्रे तयार करण्यासाठी आहेत, शेतात नांगर चालवण्यासाठी आहेत हे त्यांना कोण समजावणार? या हातात घातक हत्यारे नकोत तर लेखणी किंवा लॅपटॉप असायला हवा.

या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. डेहराडून, मेरठ किंवा पानिपत येथे शिकणारे काश्मिरी तरुण त्याचेच उदाहरण आहेत. काश्मिरी समाजात पसरलेले नैराश्य योग्य शिक्षण आणि पुरेसा रोजगार देऊनच दूर करता येऊ शकेल. काश्मिरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून परत जाण्यास सांगून आम्ही केवळ विकासाच्या त्यांच्या संधीच अवरुद्ध करीत नाही तर त्यांचे नैराश्य वाढवण्याचे कामसुद्धा करीत आहोत. हेच नैराश्य त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यास कारणीभूत ठरते. या युवकांना सोबत घेऊन आम्हाला दहशतवादाविरुद्ध लढायचे आहे. पंजाबात अशाच प्रकारचे प्रयत्न यशस्वी ठरले. मग काश्मिरात असे यश आपण का मिळवू शकलो नाही?

आज देशात राष्ट्रवाद जणू उसळ्या मारत आहे. शहिदांच्या बलिदानाचा बदला घेण्याच्या शपथा घेतल्या जात आहेत. ‘आम्ही सारे स्वत:ला भारतीय समजू’ अशीही शपथ घ्यावी लागेल. ‘ए मेरे वतन के लोगो…’ हे गीत गुंजते तेव्हा त्यात एक ओळ हीसुद्धा येते… ‘सरहद पर मरनेवाला, हर वीर था भारतवासी।’ ही ओळ ऐकल्यावर डोळे पाणावतात. डोळ्यांचा हा ओलावा आमच्या विचारांचा भाग बनायला हवा. तेव्हाच आमचा राष्ट्रवाद यथार्थ ठरेल. या राष्ट्रवादाला एखाद्या धर्म अथवा विचाराशी जोडून आम्ही त्याला संकुचितच करीत आहोत का? ही एका अर्थी स्वत:चीच फसवणूक नाही का?

सव्वाशे कोटी भारतीयांचा हा देश आहे. या देशातील प्रत्येक नागरिक स्वत:ला किती भारतीय समजतो यावर दहशतवादाविरुद्ध लढल्या जाणार्‍या कोणत्याही लढाईचे यश निर्भर आहे. आमची एकता आणि ताकदीचा सर्वात मोठा आधार भारतीयत्व हाच विचार आहे. जो आम्हाला धर्म, जात आणि प्रादेशिकतेच्या मर्यादा ओलांडून ‘आम्ही भारतीय लोक’ म्हणवतो. आम्हा भारतीय लोकांना एकमेकांवर विश्वास करणे शिकावे लागेल. यासाठी संशय नव्हे तर स्नेहाची आणि परस्पर विश्वासाची दृष्टी असायला हवी.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत आहेत.)
– विश्वनाथ सचदेव

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!