Type to search

ब्लॉग

आपुल्या घरात हाल सोसते मराठी..!

Share

दहावीच्या परीक्षेत मराठी भाषेचा निकाल घसरला आहे. मराठी घेऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांपेक्षा मराठी व्यतिरिक्त इतर भाषा घेऊन दहावी उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे.

बोर्डाच्या इयत्ता दहावीचा निकाल नुकताच लागला. यंदा एकूण निकालाची टक्केवारी घसरली आहेच, परंतु निकालातली आणखी एक चिंतेची बाब म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचा निकालही घसरला आहे.

‘लाभले आम्हास भाग्य…’ मराठीचे हे अभिमान गीत म्हणताना त्यातल्या ‘आपुल्या घरात हाल सोसते मराठी’ याच ओळी दुर्दैवाने खर्‍या ठरत आहेत. यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना कृतीपत्रिकेवर आधारित स्वविचारावर उत्तरे लिहिण्याची परीक्षा पद्धत होती. तसेच तोंडी परीक्षा रद्द करत 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यामुळे निकाल घसरला असल्याचे स्पष्टीकरण दिले जाते आहे. पण हे बदल योग्य पद्धतीने शिक्षकांकडून अंमलात आणले गेले का? त्याचबरोबर विज्ञान, गणित यासारख्या विषयांइतके लक्ष मराठी भाषेकडे पालक तरी देतात का? हा खरा प्रश्न आहे. यंदा 11 लाख 93 हजार 591 विद्यार्थ्यांनी पहिली भाषा म्हणून मराठीची परीक्षा दिली. यापैकी तब्बल 2 लाख 57 हजार 627 विद्यार्थी नापास झाले. मराठीची परीक्षा देणारे 21.58 टक्के विद्यार्थी नापास होण्याचे प्रमाण 2018 च्या तुलनेत खूपच जास्त आहे. मराठी भाषेत उत्तीर्ण होणा-यांचे प्रमाण यंदा केवळ 78.42 टक्के इतके आहे. मराठी खेरिज हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमीळ, तेलुगू, सिंधी आणि बंगाली हे पर्याय पहिली भाषा म्हणून उपलब्ध होते. या भाषा घेऊन दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍यांचे प्रमाण मराठीपेक्षा अधिक आहे. भाषा या विषयात मिळणारे कमी गुण, विद्यार्थ्यांचे त्याकडे होणारे दुर्लक्ष, तसेच या विषयात विद्यार्थी मागे पडत असला तरी त्यासाठी शिकवणी वा क्लासमध्ये पाठवण्यास पालकांकडून होणारी टाळाटाळ ही नापास होण्यामागची कारणे असावीत.

इंग्रजीसाठी विद्यार्थ्यांना क्लास वा शिकवणीला हमखास पाठवले जाते. पण, मराठीसाठी तसा विचार होत नाही. मराठी तर आपली मातृभाषाच आहे, या विचाराने त्याकडे विद्यार्थीही फार गंभीरपणे पाहत नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची भाषा व सामाजिक शास्त्र विषयाची तोंडी परीक्षा बंद केल्यामुळे या विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे. दहावीचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती यंदा बदलली. नवा पॅटर्न वेगळा आहे.

खरे तर हा पॅटर्न याआधीच विकसित करायला हवा होता, जेणेकरून गणित आणि विज्ञान या विषयांतील यश म्हणजेच बोर्डाचे यश, असा मर्यादित अर्थ आजवर प्रस्थापित झाला नसता. थोडे मागे डोकावून बघाल, तर हेच लक्षात येईल की, सामूहिक चाचणी परीक्षेतील उत्तम गुणांसाठी धावणारे पालक-शिक्षक-अंतिमत: विद्यार्थी दहावीत फक्त गणित आणि विज्ञान विषयांत मार्क मिळाले की, गंगेत घोडे न्हाले, अशी मानसिकता बाळगत होते. बाजारातही याच दोन विषयांना प्राधान्य देणार्‍या व्यावसायिक प्रशिक्षण संस्था, खासगी, सरकारी महाविद्यालये गणित आणि विज्ञानातील हुश्शारांची प्रतीक्षा करीत होते; किंबहुना फक्त अशाच विद्यार्थ्यांना शिकण्याचा अधिकार आहे, अशी संभावनाही अनेक जण करत होते. मराठी, हिंदी, इंग्लिश आणि इतर भाषांनाही महत्त्वपूर्ण स्थान मिळाले असते, त्यांचीही कदर झाली असती, तर आज या भाषांनी विद्यार्थ्यांची ही दुर्दशा केली नसती. दहावीच्या यंदाच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार भाषा विषयांत विद्यार्थ्यांच्या स्वयंमतावर भर देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपले मत, चांगले-वाईट मुद्दे मांडणे अपेक्षित होते. बहुतेक सर्व भाषा पेपरचा पॅटर्न एकसारखाच होता.

लिखाणाचा सराव नसणे, पालक आणि शिक्षकांमधील संभ्रम, विद्यार्थ्यांना नेमकेपणाने आकलन न झालेली पद्धत, ही कारणे यामागे देता येतील. याशिवाय मुलांमध्ये अवांतर वाचनाची, वर्तमानपत्र वाचनाची सवय नसणे, हे एक मुख्य कारण यामागे देता येईल. पॅटर्न बदलला म्हणजे त्यात नेमके काय हवे आहे, हे विद्यार्थ्यांना समजून देण्यात शिक्षण व्यवस्था कमी पडते. ज्यांना लिहिता-वाचता येते, मुलांचा अभ्यास घेता येतो, त्या पालकांनी तरी आपल्या पाल्यांना वाचनाची गोडी लावलीच पाहिजे. अभ्यास म्हणजे नुसती घोकंपट्टी नाही वा मेंढराप्रमाणे एकामागे एक जाणे नव्हे. स्वत: विचार करणे, आपल्या आसपास काय सुरू आहे, त्यावर लिहिण्याची, वेगवेगळ्या विषयांवर मंथन करण्याची, अनेक प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरे सापडेपर्यंत शोधण्याची आणि मदतीसाठी पालक, शिक्षकांना वेठीस धरण्याची क्षमता मुलांमध्ये विकसित करायलाच हवी आणि तरच भाषेचे महत्त्व, तिची गरज अधोरेखित होईल. तसेच केवळ पालकांना दोष देऊन चालणार नाही. मराठी भाषेलाच नाही, तर सर्वच भाषांना प्राधान्यक्रम मिळवण्यासाठी सरकारी दरबारातही भाषेला मानाचे पान मिळण्यासाठी सामूहिक दबावतंत्र निर्माण होण्याची गरज आहे.
– राजेंद्र पाटील, 9822753219

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!