आपत्ती निवारणासाठी घेणार लष्कराची मदत; आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

0

नाशिक । नाशिक, पावसाचा जोर असाच कायम सुरू आहे. अशातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सतर्क झालेल्या जिल्हा यंत्रणेने 1 जुलैला लष्कर आणि एनडीआरएफच्या मदतीने आढावा बैठक बोलावली आहे.

आठवड्यापासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीकडून आगमन झालेल्या पावसाने नाशिकला दमदार हजेरी लावली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने चांगली सुरुवात केली. त्यानंतर आता पुन्हा पाऊस सुरू आहे. अशात पुन्हा मुसळधार पाऊस झाला तर शहर व जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवू शकते.

ही शक्यता लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती विभागाने आज लष्कर आणि एनडीआरएफच्या आधिकार्‍यांशी संपर्क साधला. पूरस्थिती उद्भवल्यास उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कामांचे फेरनियोजन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने पुढील काळात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शहरात पुराचे पाणी व गटारीचे पाणी साचून लागलीच पूरस्थिती गंभीर होत असल्याने महापालिका आणि इतर यंत्रणांच्या आधिकार्‍यांची बैठक घेतली जाणार आहे. नाशिकमध्ये 2016 मध्ये आलेल्या महापुरामुळे अनेकांच्या घरात पाणी जाऊन संसार उघड्यावर पडले होते. तसेच जिल्ह्याच्या काही भागात नागरिक पुराच्या पाण्यात अडकण्याच्या घटनाही घडल्या.

यावेळी एनडीआरएफची मदत घेण्यात येऊन बचाव कार्य राबवण्यात आले. यंदा जूनच्या सुरुवातीलाच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अधूनमधून विश्रांती घेणार्‍या पावसाची रिपरिप सुरूच असते. मात्र अनेक तालुक्यांत पावसाने जूनची सरासरीही ओलांडली आहे.

त्यामुळे पुढील काळात पावसाचा अंदाज घेऊन आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबत प्रशासनाने सतर्कता दाखवत तातडीने बैठकीचे आयोजन केले आहे.

LEAVE A REPLY

*