‘आनंदधाम’च्या प्रांगणात सामूहिक क्षमापना

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– जैन धर्मियांच्या पवित्र चातुर्मास पर्वातील पर्युषण महापर्वामधील सामुदायिक क्षमापना कार्यक्रम रविवारी सकाळी आनंदधामच्या प्रांगणात झाला. क्षमा वीरस्य भूषणम’ या उक्तीला अनुसरुन उपस्थित प्रत्येकाने कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल हात जोडून एकमेकांची क्षमा मागितली. ‘खमाव खमाव’च्या गजरात आनंदधामचे पवित्र प्रांगण दुमदुमून गेले. जैन साध्वीजींच्या सान्निध्यात सर्वांनी क्षमापना कार्यक्रमात सहभाग घेत त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
चातुर्मासानिमित्त आचार्यश्रींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आनंदधाममध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. रविवारी वात्सल्यमूर्ती पूज्य श्री दर्शनप्रभाजी, पूज्य श्री अनुपमाजी साध्वीजींच्या सान्निध्यात संवत्सरी महापर्वातील सामूहिक क्षमापना कार्यक्रम झाला.
महासाध्वी पूज्य श्री जिनेश्‍वराजी म.सा.म्हणाल्या की, क्षमापना हे जैन धर्मातील आत्मशुध्दीचे पर्व असते. दैनंदिन जीवन जगताना प्रत्येकाकडून अनवधानाने अथवा जाणीवपूर्वक चुका होतात. कोणाला अपमानास्पद बोलले जाते. रागलोभाचे परिमार्जन करणे व त्यासाठी क्षमा मागणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. एखाद्याला क्षमा करणे तसेच मनापासून क्षमा मागणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येकाने या तत्वाचा अंगिकार केल्यास संपूर्ण विश्‍वात एक प्रकारचे आनंदी वातावरण तयार होवून बंधुत्त्व वृध्दींगत होण्यास मदत होईल.
या वेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, खासदार दिलीप गांधी, माजी आमदार अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, श्रावक सोंघाचे सेक्रेटरी संतोष बोथरा, सविता फिरोदिया, कापड बाजार जैन मंदिरचे अध्यक्ष सुभाष मुथा आदी उपस्थित होते. सर्वच उपस्थितांनी साध्वीजींच्या प्रवचनाचे भक्तीभावाने श्रवण केले. आचार्यश्रींच्या ध्वनीमुद्रीत प्रवचन संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली. यानंतर सर्वांनी विनम्रतेने हात जोडून खमाव खमाव म्हणत एकमेकांची क्षमा मागितली. यावेळी पारण्याची व्यवस्था सविता रमेश फिरोदिया यांच्यावतीने करण्यात आली होती. आनंदधामच्या प्रांगणात संवत्सरी महापर्वानंतर आता दररोज सकाळी 9 ते 10 या कालावधीतील नियमित प्रवचने सुरू झाली आहेत.

 

LEAVE A REPLY

*