Type to search

ब्लॉग

आधी स्वत:ला स्वीकारा!

Share

वयात येणार्‍या मुलांना काहीतरी वेगळे वाटत असते. कोणाशी बोलावे तेही कळत नसते. संकोच आणि सगळाच गोंधळ असतो. या अडनिड्या वयात काय गंमत असते, ते आपण समजून घेणार आहोत, या लेखमालेत..

मागच्या लेखात आपण लैंगिकता शिक्षण का गरजेचे आहे, ते पाहिले. या लेखात आपण पौगंडावस्थेतील (साधारण 12 ते 18 वयोगट) मुला-मुलींमध्ये मानसिक आणि सामाजिक काय बदल होतात, ते पाहू. मानसिक बदल: एकीकडे अभ्यासाचा ताण आणि त्याबरोबर शरीरात होणारे बदल यामुळे भावनिक खळबळ माजलेली असते. हार्मोन्समध्ये होत असणारे बदल, स्वतःच्याच शरीराविषयी पडणारे प्रश्न, ते कोणापाशी न बोलता येणे, विरुद्ध लिंगाच्या व्यक्तिविषयी वाटणारे आकर्षण या अशा द्विधा मनस्थितीत मुले असतात. या वयात थोडा चिडचिडेपणा येणे, आई-वडिलांशी वाद, मतभेद होणे, आई-बाबा दुश्मन असल्यासारखे वाटणे, आपल्याला कोणीच समजून घेत नाहीये, आपले कोणी ऐकतच नाहीये, असे वाटायला लागते. मग मित्र म्हणजेच सर्वस्व वाटायला लागतात. आई-वडिलांपेक्षा त्यांचेच जास्त ऐकले जाते. कधी कधी खूप आनंदी वाटणे, दुःखी वाटणे, अचानक राग येणे, थकल्यासारखे वाटणे, अपराधी भावना येणे, असहाय्य वाटणे हे सर्व बदल हार्मोन्समुळे होत असतात. याशिवाय रात्रीची जागरण आणि सकाळी उठून शाळा, कॉलेजात जाणे असतेच, त्यामुळे अपुरी झोप, पुरेसे जेवण न करणे, जंक फूडस खाणे यासर्व गोष्टीही मूड स्विंग होण्यासाठी कारणीभूत असतात. काही काळ असे वाटणे हे नैसर्गिक आहे, परंतु दीर्घकाळ अशा प्रकारच्या डिप्रेशनची मनस्थिती असेल तर जरुर पालकांशी बोला. शाळेचे समुपेदशक किंवा तज्ञ व्यक्तींची मदत घ्या.

सामाजिक बदल: प्रत्येकाला एक बाह्य प्रतिमा (शारीरिक प्रतिमा) आणि आंतरिक प्रतिमा ( आत्मा, मन, स्वभाव) असे दोन पैलू असतात. सुंदर व आकर्षक दिसावे, हे प्रत्येकालाच प्रकर्षाने वाटत असते. मग अशातच स्वतः च्या शारीरिक प्रतिमेविषयी व कपड्यांविषयी जास्त विचार केला जातो. आपण कसे दिसतो, याकडे जास्त लक्ष दिले जाते. अचानक सारखेसारखे आरशात बघावे असे वाटणे, आरशात बघून सारखे केस नीट करणे, वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करून बघणे, वेगवेगळी कॉस्मेटिक्स वापरणे, मेकअपच्या साहित्यांचा वापर करणे यासारख्या गोष्टींना सुरुवात होते. जास्तीत जास्त वेळ मी कसा दिसतो/दिसते, यावर केंद्रित होते. सो कॉल्ड सुंदर दिसण्यासाठीचा अट्टाहासाला सुरुवात होते. म्हणजेच आपण आपली शारीरिक प्रतिमा कशी आहे, याला जास्त महत्त्व देतो. आजकाल मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्सचा प्रभाव आहे. वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी, उंची वाढवण्यासाठी औषध घेतली जातात. झीरो फिगर मेंटेन करण्यासाठी मुली डायटिंग करायला लागतात. पण त्यामुळे बर्‍याचदा पोषक अन्न मिळत नाही. मुली अ‍ॅनिमीक होतात. त्यामुळे अभ्यास, खेळ यासारख्या गोष्टींसाठी त्यांना स्टॅमीनाच रहात नाही. मुलांच्या बाबतीत सलमान खान, जॉन अब्राहमची सिक्स पॅक वाली बॉडी म्हणजे केवळ आदर्शच. मुलगे मग अशी बॉडी ( कमी वेळात) कमवण्याच्या मागे लागतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रोटिन्स पावडर घेणे (यामध्ये बर्‍याचदा स्टेरॉइडस असतात.), जिममधे वजन उचलणे यासारख्या गोष्टी केल्या जातात. या गोष्टीमागचा उद्देशच सर्वांनी आपल्याकडे बघावे, हाच असतो. असे वाटणे चुकिचे नाही. हे नैसर्गिकच आहे. आपली तब्येत नीट राहण्यासाठी शारीरिक कसरत करणे महत्त्वाचेच आहे. स्वत:साठी प्रेझेन्टेबल राहणे आवश्यकच आहे, परंतु ह्या गोष्टींचा अतिरेक करणे घातक आहे आणि सर्व काही सोडून याच गोष्टीच्या मागे लागणे चुकीचे आहे.

बर्‍याचदा आपण कसे दिसतो, यापेक्षा आपल्याला लोक कसे बघतात, काय बोलतात यावर आपण आपली एक प्रतिमा तयार करत असतो, यालाच ‘लेबलिंग’ असेही म्हणतात. हे आपण पण आपल्याला करत असतो. दिसण्यावरून, उंचीवरून, वजनावरून कळत न कळत कधी घरचे तर कधी बाहेरचे लोक आपल्याला जज करत असतात आणि आपण पण आपली स्वःप्रतिमा तयार करत असतो. ‘तुझ्यापेक्षा तुझी बहीण जास्त छान आहे दिसायला’ किंवा ‘आता काही तुझी उंची वाढायची नाही’, अशा प्रकारच्या कॉमेंट्समुळे व्यक्ती आत्मविश्वास गमावू शकतो. ‘तू अगदी ऐश्वर्यासारखी दिसते’ किंवा ‘तू काय मस्क्युलिन दिसतोस’ यासारख्या कॉमेंट्समुळे अति आत्मविश्वासाचा अहंगंड निर्माण होऊ शकतो. यापेक्षा स्वतःचा आहे तसा स्वीकार करणे, स्वत:च्या शारीरिक प्रतिमेचा स्वीकार करणे, गुण दोषांसकट स्वतःला स्वीकारणे, हे योग्य राहील.
meghamanohar1971@gmail.com
मेघा मनोहर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!