आदर्शाची हेळसांड!

0
दरवर्षी शिक्षक दिनाला जिल्हाभरातील आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्याचा प्रघात आहे. त्यासाठी जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत प्रत्येक तालुक्यातून एक व एक उत्तेजनार्थ अशा 16 शिक्षकांचा सन्मान केला जातो. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना वेळ मिळत नसल्याने यंदाही शिक्षकदिनी आदर्श शिक्षकांचा सन्मान होऊ शकला नाही. कोणत्याही बाबतीत औचित्याला महत्व असते. आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शिक्षक दिनी व्हावे,

यासारखे औचित्य नाही, पण केवळ पालकमंत्र्यांना वेळ नाही यामुळे पुरस्कार वितरण लांबणीवर पडावे यासारखे दुर्दैव नाही. एक प्रकारे ही आदर्शाची हेळसांडच आहे. जिल्हा परिषद शाळांची स्थिती अगोदरच बिकट आहे. या शाळांना विद्यार्थी मिळत नसल्याची ओरड केली जाते. सुमार दर्जाच्या शिक्षणामुळे अनेक पालक या शाळांकडे पाठ फिरवतात, खूद्द जिल्हा परिषद शाळांचे शिक्षकही आपल्या पाल्यांसाठी वेगळा पर्याय शोधतात, ही वस्तुस्थिती आहे. नगरपालिका, महानगरपालिका शाळांची स्थिती याहून वेगळी नाही.

ग्रामीण भागात शिक्षणाचे पुरेसे पर्याय उपलब्ध नसतात त्यामुळे जिल्हा परिषद शाळाच महत्वाच्या ठरतात. या शाळांमधून प्राथमिक, माध्यमिक शिक्षण दिले जाते. उच्च शिक्षणासाठी पायाच भक्कम नसेल तर पुढील संधी कशा मिळणार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये अशी स्थिती असली तरी काही शिक्षक मात्र पोटतिडकीने ज्ञानदानाचे अवितरत कार्य उपलब्ध साधनसामुग्रीत करीत असतात. त्यातून आदर्श शिक्षक निवडले जातात. सध्या काही ठिकाणी आदर्श शिक्षकांची यादी पाहिली तर त्यावरही आक्षेप घेता येऊ शकतात. या पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव द्यावा लागतो. त्याचे परिक्षण होऊन आदर्श शिक्षक ठरविले जातात.

मुळात ही पध्दतच आदर्श शिक्षकांचा अवमान करणारी आहे. अनेक खर्‍या अर्थाने आदर्श असणारे शिक्षक अशा प्रस्तावबाज पुरस्कारांसाठी पुढे येत नाहीत. असे असले तरी प्रचलित पध्दतीनुसार आदर्श शिक्षक निवडले जातात, मात्र केवळ पालकमंत्र्यांना वेळ नाही या सबबीमुळे पुरस्काराचे वितरण होत नाही, हे संतापजनक आहे. गेल्यावर्षी तर महिनाभर हे पुरस्कार वितरण रखडले होते. आताही पालकमंत्र्यांना सवड मिळेल तेव्हाच हा सन्मान सोहळा होऊ शकणार आहे. या पार्श्वभूमिवर ‘आशा फाऊंडेशन’तर्फे दिले जाणारे समाज शिक्षक पुरस्कार आपले वेगळेपण राखून आहेत. दरवर्षी आशा फाऊंडेशनतर्फे समाजाला शिक्षित करणार्‍यांचा सन्मान शिक्षक दिनीच केला जातो. आशा फाऊंडेशन सारख्या संस्थेला शिक्षक दिनाचे औचित्य पाळता येते, मात्र हे जिल्हा परिषदेला जमू नये, हे दुर्दैवच आहे.

LEAVE A REPLY

*