आत्महत्या केलेल्या विवाहितेवर घरासमोरच अंत्यसंस्कार

0

पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक

 

तळेगाव दिघे (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील मनीषा मच्छिंद्र पवार (वय 26) या विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून विहिरीत उडी घेत गुरुवारी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आत्महत्या केली. याप्रकरणी आरोपी पतीसह सातजणांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेरच्या संतप्त नातेवाईकांनी शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मयत मनीषा पवार हिच्या मृतदेहावर सासरी निळवंडे येथे घरासमोरच अंत्यसंस्कार केले.

 

 
निळवंडे येथील मनीषा मच्छिंद्र पवार या विवाहितेचा मुलबाळ होत नाही, तू वांझोटी आहेस, कायमच आजारी असते, तू काही कामाची नाही, असे कायमच हिणवत पतीसह सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता.

 

 
सासरच्या छळास कंटाळून मनीषा मच्छिंद्र पवार हिने गुरुवारी पहाटेच्या सुमारास निळवंडे गावानजीकच्या असणार्‍या मच्छिंद्र काशिनाथ आहेर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी मयत मनीषा पवार हिचा भाऊ देविदास गंगाराम शिंदे (रा. मनोली) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

 

 

त्यानुसार आरोपी पती मच्छिंद्र बाबुराव पवार, सासरा बाबुराव नाथा पवार, सासू बिजलाबाई बाबुराव पवार, भाया शिवाजी बाबुराव पवार, भाया बाबासाहेब बाबुराव पवार, जाव मीनाक्षी शिवाजी पवार, जाव कांताबाई बाबासाहेब पवार यांच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 85/17 भारतीय दंड संहिता कलम 304, 498, (अ), 323, 504, 43 अन्वये सदोष मनुष्यवध, शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

 
माहेरच्या संतप्त नातेवाईकांनी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास निळवंडे येथे सासरी घरासमोरच मयत मनीषा पवारच्या मृतदेहावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोठ्या संख्येने ग्रामस्थही अंत्यसंस्कारप्रसंगी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे, कचरू पाटील पवार व पोलीस पाटील अशोक कोल्हे यांनी सामंजस्याची भूमिका बजावत अनुचित प्रकार घडू नये यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

 
सदर विवाहिता आत्महत्येच्या गुन्ह्यात आरोपी पती मच्छिंद्र बाबूराव पवार व भाया बाबासाहेब बाबूराव पवार यांना अटक केल्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी सांगितले. अन्य आरोपी मात्र पसार झाले आहेत.

 

 

 

LEAVE A REPLY

*