आता जगा 150 वर्षे?

0

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाचे आयुष्यमान वाढले आहे आणि शास्त्रज्ञही वय वाढण्याची प्रक्रिया मंद करण्यासाठी धडपडत आहेत. आता यासंदर्भात विज्ञानाची एक नवी शाखाच निर्माण झाली आहे. याला जराशास्त्र म्हणजे जेरॉटॉलॉजी असे म्हणतात. वय नियंत्रणात ठेवणारी जनुके शोधण्यासाठी या शास्त्राचे शास्त्रज्ञ झटत आहेत.

शास्त्रज्ञांनी एज-1, एज-2, क्लोफ-2 अशा प्रकारची काही गुणसूत्रे शोधून काढली आहेत. माणसाच्या शरीरावर वयाचा परिणाम केेव्हा दिसून येतो हे शोधण्याचा प्रयत्नही करत आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्रा. रिचर्ड डॉकिन्स यांचे म्हणणे आहे की, 2050 पर्यंत वय वाढण्याच्या प्रक्रियेची गती कमी करण्याचा मंत्र सापडलेला असेल. स्टेम सेल, दि ह्यूमन बॉडी शॉप आणि जीन थेरपी यांच्या माध्यमातून माणसाचे आयुष्यमान 150 वर्षांहूनही अधिक करणे शक्य होणार आहे. आपल्या देशात तर आयुष्यमान भव, चिरंजीवी भव असे आशीर्वाद नेहमीच दिले जातात. प्राचीन काळात भारतीय लोक दीर्घायुषी होते हे महाभारत, रामायण ही महाकाव्ये, पुराणे वाचल्यावर लक्षात येते. पितामह भीष्मांनी तर आपले मरणही रोखून धरले होते, असे सांगितले जाते.

1990 मध्ये जगातील माणसांचे सरासरी आयुष्य 65.33 वर्षे होते. आता ते वाढून 71.5 वर्षे इतके झाले आहे. यादरम्यान पुरुषांचे आयुष्य सरासरी 5.8 वर्षांनी तर महिलांचे आयुष्य 6.6 वर्षांनी वाढले. सरासरी आयुष्य वाढत आहे तसे वयाची शंभरी पार पडलेल्या लोकांची संख्याही वाढते आहे. आता शतायुषी होणे ही दुर्मिळ बाब राहिलेली नाही. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे की, भारतात 12 हजारहून अधिक लोकांनी वयाची शंभरी पार केली आहे आणि 2050 पर्यंत अशा लोकांची संख्या आणखी वाढेल. जपान शतायुषी लोकसंख्येत जगात सर्वात पुढे आहे. तेथे प्रत्येक गावात दोन-चारजण तरी शंभरी पार केलेले आढळतातच. जपानच्या सरकारी आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 2014 मध्ये जपानमध्ये 58 हजारहून अधिक शतायुषी वृद्ध होते.

जगभरात वाढणारे सरासरी वय आणि शंभरी पार केलेल्या वृद्धांची संख्या पाहता माणसाचे आयुष्यमान वाढत आहे, याची खात्री पटते. आरोग्यसेवांमध्ये झालेली वाढ आणि आरोग्याप्रती लोकांची वाढत असलेली जागरुकता यामुळे माणसाचे आयुष्यमान वाढत आहे. आपल्या देशातील पुरुषांचे सरासरी वय 64 आणि महिलांचे सरासरी आयुष्य 68 वर्षे आहे. गेल्या चाळीस वर्षांत पुरुष आणि महिलांचे सरासरी वय अनुक्रमे 15 आणि 18 वर्षांनी वाढले आहे.

वृद्धापकाळातील सक्रियता
निवृत्तीचे वय झाल्यानंतर बहुतांश लोक काही काम करण्याच्या किंवा सक्रिय राहण्याच्या मन:स्थितीत नसतात. इतकी वर्षे काम केले आता आराम करायचा, अशी भावना याआधी निवृत्त लोकांची असे. पण आता यात बदल होत आहे. निवृत्त झाल्यानंतरही लोक स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून घेत असतात. प्रत्येक वेळी हे काम म्हणजे नोकरीच असते असे नाही, तर त्यांना आवडणार्‍या कामात किंवा छंद जोपासण्यात ते गुंग असतात. अनेकदा नव्याने नोकरीही करू लागतात. ऑस्ट्रेलियात 2014 मध्ये एक कायदा मंजूर करण्यात आला असून त्यायोगे 2035 पासून तेथे निवृत्तीचे वय 70 वर्षे असेल. तेथील सरकार वृद्धांना कामावर घेण्यासाठी प्रोत्साहन आणि आर्थिक अनुदानही देते. भारत आणि चीन या देशांनी याबाबत विचार करणे आवश्यक आहे. कारण आज जरी हे देश युवकांचे असले तरी येत्या 25 ते 30 वर्षांच्या कालावधीत या दोन देशांतही वृद्धांची संख्या वाढलेली असेल.

वय वाढवण्याच्या काही युक्त्या
वय वाढवणारे खाद्यपदार्थ विकसित करण्यावर सर्वाधिक संशोधन सुरू आहे. यात गेटो नावाच्या एका वनस्पतीवर संशोधन होत आहे. जपानमधील ओकिनावा क्षेत्रात सर्वाधिक शतायुषी लोक राहतात. याच गोष्टीवरून हे संशोधन सुरू झाले आहे. ओकिनावा येथील रियुक्यूस विद्यापीठातील कृषिशास्त्रज्ञ प्रा. शिंकीची तवाडा यांनी या लोकांच्या शतायुषी होण्याचे श्रेय गेटो या वनस्पतीला दिले आहे. गडद पिवळ्या-भुर्‍या रंगाच्या या वनस्पतीचा अर्क माणसाचे वय 20 टक्क्यांनी वाढवतो. ही आले (जिंजर) प्रवर्गातील वनस्पती आहे. तवाडा या वनस्पतीवर गेली वीस वर्षे संशोधन करत आहेत. त्यांनी किटकांवर एक प्रयोग केला. त्यांनी गेटोच्या अर्काचा खुराक किटकांना दिला तेव्हा त्यांना आढळून आले की त्यांचे आयुष्यमान 22 टक्क्यांनी वाढले. मोठी हिरवी पाने, लाल फळे आणि पांढरी शुभ्र फुले असलेली गेटो ही वनस्पती ओकिनावाच्या लोकांच्या जेवणातील एक प्रमुख भाजी आहे. इतर अँटी ऑिक्सिडंटस्च्या तुलनेत गेटो अधिक प्रभावी आहे. जगातील अन्य भागात राहणार्‍या लोकांवरही गेटो तितकीच प्रभावशील राहील का, यावर आता संशोधन सुरू आहे.

चीनमध्ये सर्वाधिक वृद्ध
जपानमध्ये तरुणांच्या तुलनेत वृद्धांची संख्या जास्त आहे; पण चीनच्या हैनान प्रांतातील चेंगमाई गावात जगातील सर्वाधिक वृद्ध राहतात. इथल्या 200 लोकांनी वयाची शंभरी पार केली आहे. या गावात संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. गावाची लोकसंख्या आहे 5,60,000. त्यातील दोनशे लोक शंभरी पार केलेले आणि तीन लोक 110 वर्षांहून अधिक वयाचे आहेत. जगात असे केवळ 400 लोक आहेत. ब्रिटनमध्ये राहणार्‍या भारतीय वंशाच्या एका दाम्पत्याने नुकताच आपल्या लग्नाचा 90 वा वाढदिवस साजरा केला. त्या समारंभात त्यांची 8 मुले, 27 नातवंडे आणि तेवीस पणतवंडे सहभागी झाली होती.

सरासरी वयोमान सर्वाधिक असलेला देश आहे मोनॅको. तेथील सरासरी वयोमान 89.63 वर्षे आहे. इथल्या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते तणावरहित जीवन जगतात आणि आहाराविषयी जागरुक आहेत. हिरव्या भाज्या, सुका मेवा आणि रेड वाईन यांचे सेवन ते करतात. माणसाने वयाची शंभरी नव्हे तर 150 वर्षे गाठली तरी त्याचे आयुष्य हे निरोगी आणि सक्रियतेचे असायला पाहिजे, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
– जोसेफ तुस्कानो, ज्येष्ठ विज्ञान लेखक

LEAVE A REPLY

*