आढळेत अवघा 16 टक्के पाणीसाठा!

0

लाभक्षेत्राच्या पाणी पातळीत मोठी घसरण

वीरगाव (वार्ताहर) – अकोले तालुक्याच्या उत्तर विभागाचे सिंचन करणारे देवठाण येथील आढळा धरणाचा पाणीसाठा खोल तळाकडे सरकत असून आज अखेर धरणात केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेच्या या धरणात 168 दलघफू पाणीसाठा आहे. धरणात सुरु असणारे कृषी वीजपंप, आढळा प्रादेशिक पाणीपुरवठा, इतर पिण्यासाठी पाणीउपसा, कडक उन्हातील बाष्पीभवन यामुळे पाणीपातळी अधिक खोलाकडे जात असून पावसाळा लांबल्यास धरणक्षेत्रात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवेल.168 दलघफू पाण्यापैकी 85 दलघफू मृतसाठा आहे. अनेक वर्षापासून धरणात साठलेला गाळ लक्षात घेता नक्की पाणीसाठा किती हा संशोधनाचा विषय होईल.
गेल्यावर्षी 3ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरलेल्या आढळा धरणाने लाभक्षेत्रातील 16 गावांचे तीन आवर्तनांद्वारे सिंचन केले.एकूण तीन आवर्तनांमध्ये अनुक्रमे 290, 348 आणि 121 मिळून 759 दलघफू पाणी खर्च झाले. या तीनही आवर्तनांमुळे लाभक्षेत्राच्या पाणीपातळीतही झपाट्याने सुधारणा झाली होती. लाभक्षेत्रातील गावाशिवारातले ओढे-नाले भरभरुन वाहते झाले. शिवाय, शेततळीही मोठ्या प्रमाणावर भरण्यात आली. आवर्तनात रब्बी हंगामासाठी शेतात फिरलेल्या पाण्यामुळेही विहिरींचे उद्भव मोकळे झाल्याने पाणीपातळीत अधिक भर पडली.
वीरगाव, हिवरगाव आंबरे, पिंपळगाव निपाणी, गणोरे आणि डोंगरगाव या पाच गावांना आढळा प्रादेशिक पाणीपुरवठ्यातून पिण्यासाठीचे पाणी आता दिवसाआड सुरु झाले. आढळेच्या लाभ आणि पाणलोटक्षेत्रातील मोठ्या वृक्षतोडीने हा पूर्ण परिसर भकास झाला. लाभक्षेत्रातील कालव्याचे शेवटचे टोक ते आढळेचे उगमस्थान या दरम्यान असणारे डोंगर आणि वनखात्याचे क्षेत्र उघडे-बोडके झाल्याने दर पावसाळ्यागणिक आढळेचे पर्जन्यमान कमी होत आहे.
रोहिणी नक्षत्रातच लाभक्षेत्राला पावसाची अपेक्षा आहे. पावसाळा लांबल्यास खरीप उशिरा सुरु होईल. तत्पूर्वी मात्र चारा आणि पिण्याच्या पाण्याअभावी पशुधनाचे मोठे हाल होतील.

 

LEAVE A REPLY

*