आझादवाडी शेती महामंडळ कामगारांना जागा खाली करण्याची धमकी

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरालगत शेती महामंडळाच्या जमिनींवर लॅण्ड माफियाचा डोळा असल्याने ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी सुटायच्या त्यांना हाताशी धरून मोक्याच्या जमिनी गिळंकृत करण्याचा प्रकार घडत आहे. याठिकाणी काल एक शेती महामंडळाचा अधिकारी असल्याचे सांगत ‘तोतया’ आला व त्याने 8 दिवसांत घरे खाली करा, असे तोंडीच सांगितले.

 

खरे तर सरकारी अधिकार्‍याला तोंडी घरे खाली करा, असे सांगण्याचा कोणताही अधिकार नाही. काय सांगायचे ते लेखी सांगायचे, असा नियम असतानाही हा शेती महामंडळाचा अधिकारी खंडकरी व लॅण्ड माफियांच्या ‘चाटेगिरी’मुळे तोंडीच या कुटुंबांना घरे खाली करा, अशी गोड बोलून धमकी वजा इशारा देऊन गेला. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. आम्हाला डिवचू नका, वेळप्रसंगी आम्ही वाट्टेल तो संघर्ष करू; असा नागरिकांनी इशारा दिला आहे

 

 

गेल्या 50 ते 60 वर्षांपासून शेती महामंडळाचे कामगार कुटुंबीय जे कामगार आज हयातीत नाहीत, काही माजी कामगार आहेत, असे सुमारे 50 कुटुंबे श्रीरामपूर शहरालगत बेलापूर रोड, गायकवाडवस्तीच्या पुढे आझादवाडी येथे राहतात. त्यामुळे 50 ते 60 वर्षांपासून राहणार्‍या या गरीब, कष्टकरी, निराधार कुटुंबातील लोकांना शारीरिक, मानसिक त्रास होऊन त्यांच्या झोपा उडाल्या.

 

 

या तोतयाने काही महिलांना अपशब्दही वापरले. त्यामुळे येथील गरीब कुटुंबांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून आम्ही गेल्या 50 ते 60 वर्षांपासून शेती महामंडळाच्या या घरांमध्ये राहतो. आमच्या कुटुंबातील प्रमुखांनी शेती महामंडळात कायदेशीर काम केलेले आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्या आहेत. आम्ही राहत असलेल्या जागेवर लॅण्डमाफियांचा डोळा असल्याने आम्हाला येथून काढण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरले जात आहेत.

 

 

आम्ही शांत असून आम्हाला डिवचू नका, वेळप्रसंगी आम्ही वाट्टेल तो संघर्ष करू, मात्र आमच्या निवासस्थानातून निवार्‍याच्या ठिकाणाहून हलणार नाही, असा इशारा सुभाष गायकवाड, आबा गायकवाड, संतोष खाजेकर, शाम मंडलिक, गोविंद सोनवणे, दादामिया शेख, नामदेव जाधव, सुनील मंडलिक, शिवदास म्हसे, दादाभाऊ केदार, मार्या भारस्कर, माया त्रिभूवन, गणपत केदार, बापू केदार, पुंडलिक केदार, दगडू त्रिभुवन, रूपाबाई परदेशी, बिसाबाई शेख, जगन पगारे, पांडुरंग चव्हाण, सुभाबाई पाडळे, भानदास म्हसे, फकिरा जाधव, बाबुलाल शेख, श्रावण जाधव, सलीम मन्सुरी, संतोष मोरे, फिरोज खान, रमेश खैरनार आदींनी दिला आहे.

 

पंतप्रधान मोदींकडे तक्रार, वाटपात नसलेले क्षेत्र कसे काढले?

 

पंतप्रधान मोदींकडे तक्रार, वाटपात नसलेले क्षेत्र कसे काढले?  ज्या खंडकरी शेतकर्‍यास जमीन सुटली, त्याला मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आजुबाजूला देण्यात आले आहे, मग याच जागेवर अडवणूक करून कामगार कुटुंबाला का अडचणीत आणले जाते, असा प्रश्‍न असून राज्य सरकारने संबंधित सर्व्हे नंबरचे क्षेत्र वाटपास काढू नये, असे सांगितले असतानाही हे क्षेत्र वाटपास बेकायदेशीररित्या कुणी काढले? एकीकडे निराधारांना घरे, जागा देण्याचे धोरण केंद्रातील मोदी सरकार घेत असताना राज्यातील सरकारी यंत्रणाच निराधार कामगार कुटुंबांना कसे धमकावू शकते? असा सवाल या कुटुंबातील लोकांनी उपस्थित केला असून यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, आ. भाऊसाहेब कांबळे, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या असल्याचे सांगितलेे.

LEAVE A REPLY

*