आज 4 वाजेपर्यंतच बिले सादर होणार ; जि.प.मध्ये 31 मार्चच्या पूर्वसंध्येला हिशेबांची जंत्री

0

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांना शासनाचे अनुदान पदरात पाडून घेण्यासाठी 31 मार्चला सायंकाळी 4 वाजेपर्यंतच बिले सादर करावी लागणार आहेत. तर त्यानंतर मिळालेल्या पावत्या 6 वाजेपर्यंत कोषागारात देता येणार आहेत. त्यामुळे जि.प.मध्ये 31 मार्चच्या पूर्वसंध्येला लेखा विभागात हिशेबांची जंत्री सुरू होती.

शासनाने आज जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाला पत्र पाठवून सूचीत केले होते की, विविध खात्यांची अनुदाने हिशेब 31 मार्चला कोषागारात दुपारी 4 वाजेपर्यंतच सादर करता येणार आहेत. त्यानंतर पुढील दोन तासात त्याच्या पावत्या प्रत्यक्ष निधी वर्ग करून घेण्यासाठी कोषागारात जमा करण्याची वेळ देण्यात येणार आहे. हे निर्देश आजच जिल्हा परिषदेला मिळाले असल्याने लेखा विभागाने प्रत्येक विभागाला हिशेबाची बिले तात्काळ पूर्ण करून देण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यामुळे दुपारनंतर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, स्वच्छता, बांधकाम, ल.पा. आदी विभागांचे अधिकारी हिशेब मांडणीत गढून गेले होते. त्याचबरोबर ज्या विभागाने हिशेब पूर्ण केले होते त्यांचे हिशेब लेखा विभागाकडे सुपूर्द करण्यासाठी लेखाधिकारी सोनकांबळे यांच्या दालनात रीघ लागली होती.

जिल्हा परिषदेचा यंदा मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित आहे. त्यातच निवडणुकीचा काळ ऐन मार्च महिन्याच्या अगोदर आलेला असताना खर्च नियोजन कोलमडले होते. ज्या विभागाने हिशेबाचे पूर्ण कागदपत्र तयार करून ठेवले होते त्या विभागांना केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान खात्यावर वर्ग होते किंवा नाही याची माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या काही खात्यांनी एक कर्मचारी ऑनलाईन माहिती घेण्यासाठी बसवला होता.

LEAVE A REPLY

*