आज महाराष्ट्र बंद

0

नगर जिल्ह्यात चौथ्या दिवशीही शेतकर्‍यांचा उद्रेक सुरूच

 

नाशिक, अहमदनगर (प्रतिनिधी) – मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेनंतर शेतकर्‍यांचा संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली असली तरी, नाशिकच्या बैठकीत मात्र संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या संपाचे नेतृत्व पुणतांब्यातून नाशकात सरकल्याचे स्पष्ट झाले आहे. बंदला शिवसेनेनेही पाठिंबा जाहीर केल्याने आंदोलनाची धार आणखी वाढणार आहे.

 

 

दरम्यान, नगर जिल्ह्यातही चौथ्या दिवशी संप सुरूच होता. अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवून त्यातील दूध ओतून देण्यात आले. भाजीपाल्याची वाहनेही रोखण्यात आली. सरकारला बुध्दी द्यावी म्हणून कोल्हार भगवतीमातेला दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच गोटुंबा आखाडा येथे दुधाचा टँकर पेटवून देण्यात आला. अनेक ठिकाणी आठवडे बाजार बंद होते. आजच्या बंदमध्येही अनेकांनी सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

 
यावेळी कृषीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात उद्या 5 जून रोजी ‘महाराष्ट्र बंद’ संपूर्ण राज्यभरात होणारच असल्याचे ठामपणे सांगण्यात आले. मेळाव्यानंतर मार्केट यार्डातील सभागृहात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राज्यातील शेतकरी चळवळीतील प्रमुखांची बैठक होऊन त्यात समन्वय समितीची गठीत करण्यात आली.

 

 
यामध्ये शेतकरी संघटना, स्वाभीमानी शेतकरी संघटना, किसान सभा, बळीराजा संघटना,संभाजी ब्रिगेड, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड, भूमिपूत्र छावा यास 17 संघटनांचा सहभाग आहे. याप्रसंगी रामचंद्र पाटील, अंसराज उघुले, राजू देसले, प. महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब पटारे, संतोष वाडेकर आदी उपस्थित होते.

 

 

8 जून रोजी रघुनाथदादा पाटील, आ. बच्चू कडू, खा. राजू शेट्टी, डॉ. अजित नवले यांच्या उपस्थितीत नाशिक येथे समन्वय समितीची बैठक होणार आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

 

 

या संपाचे ‘पुणतांबे’ होऊ देणार नाही. सरकारला 3 वर्षे पुरेसा वेळ मिळाला. सरकार शेतकरी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. हमीभाव दिला नाही. कर्जमुक्ती दान देत नाही. तुम्ही केलेली लूट मागतोय, असे नाशिकच्या मेळाव्यात शेतकर्‍यांनी सरकारला ठणकावून सांगितले. अजित नवले म्हणाले, सरकारने दडपशाही थांबवा. गुन्हे मागे घ्यावेत.

 

 

एका शेतकर्‍याला त्रास झाल्यास सरकारला पळो कि सळो करून सोडू. मुख्यमंत्री यांनी विश्वासघात केला. पाठीत खंजीर खुपसला. संप फोडण्याचा प्रयत्न केला. उद्याच्या बंदमुळे सरकारला नाक घासावे लागेल. यावेळी रघुनाथदादा पाटील, बुधाजीराव मुळीक यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

 
शेतकरी संप बैठकीतील ठराव
समन्वय समिती गठीत
संपात सहभागी शेतकर्‍यावरील गुन्हे मागे घ्या
संपाने केलेल्या मागण्यांवर आश्वासन नको
मुख्यमंत्र्यांनी मान्य करेपर्यंत आम्ही हटणार नाही
8 जूनला समन्वय समितीची बैठक
जिल्ह्यात काय घडले…
अनेक ठिकाणी टँकर अडवून दूध ओतून दिले
गोटुंबा आखाड्यात टँकर पेटवून दिला
भाजीपाल्याची वाहने रोखली
बंदमध्ये सहभागी होण्याचा अनेक गावांना निर्धार

LEAVE A REPLY

*