नाशिक जिल्हा परिषद सत्तेची समीकरणे बदलली

0

नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदी शीतल सांगळे, तर बांधकाम सभापतीपदी गोरख बोडके यांची नावे जवळपास निश्चित झाली असून केवळ औपचारिकता बाकी असल्याचे अंतर्गत सूत्रांनी सांगितले.

शीतल सांगळे या सिन्नरच्या असून शिवसेनेच आमदार राजाभाऊ वाजे हे किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहेत.

मात्र अजूनही खलबते सुरूच असून हे वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याचे समजते.

सत्तेची समीकरणे बदलली

निकालापासून अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलणार्‍या जिल्हा परिषदेतील कारभारी कोण, याचा फैसला मंगळवारी होणार आहे. त्रिशंकू अवस्थेतील ‘मिनी मंत्रालया’ची सत्ता काबीज करण्यासाठी राज्यातील सत्तेत बसलेल्या भाजप व शिवसेनेने अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला साथीला घेऊन स्वतंत्रपणे जोरकस प्रयत्न केले असले तरी माकपच्या तीन सदस्यांच्या हाती ‘सत्तेचे पत्ते’ असल्याने ते कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, त्यावर सारी गणिते अवलंबून आहेत. सत्ता स्थापना आणि अध्यक्ष निवडीचा सोपस्कार मंगळवारी नव्या प्रशासकीय इमारतीमधील रावसाहेब थोरात सभागृहात होणार आहे.

जिल्हा परिषद सभागृहाची सदस्य संख्या 73 आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने 25 गटांमध्ये विजय मिळवला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँगे्रसने 18 गट, भाजपने 15, काँगे्रसने 8, अपक्षांनी 4 तर माकपने 3 गटात विजय मिळवला असल्याने त्रिशंकू अवस्था आहे. निकाल लागून एक महिन्याचा कालावधी उलटत असला तरी बहुमतासाठी कोण कोणाला मदत करणार, याचे गुपित शिवसेनेसह भाजप, राष्ट्रवादी, काँगे्रस, माकप आणि अपक्षांनी कायम ठेवले आहे.

वरवरच्या चर्चेत शिवसेना-काँगे्रस-माकप या कथित युतीची चर्चा जि.प. वर्तुळात रंगली आहे. त्याचबरोबर भाजप-राष्ट्रवादी-अपक्षांच्या कथित आघाडीची चर्चाही जोर धरून आहे. यात माकप आणि अपक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याने शिवसेनेसह भाजप किंवा राष्ट्रवादीलाही सत्ता स्थापनेसाठी जादूई आकडा 37 गाठण्यासाठी हे पक्ष मदतगार ठरणार आहेत. त्याचबरोबर प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका अजून गुलदस्त्यात असल्याने उद्या जिल्हा परिषदेत नेमके काय घडते, कोणाची सत्ता स्थापन होते आणि कोण जि.प. अध्यक्ष होतो, याची उत्सुकता जिल्ह्याला लागून आहे.

पंचायत समित्यांच्या सभापती निवडणुकीत शिवसेनेला काँगे्रसने मदत केली. तर काही ठिकाणी स्वबळावर सेनेने पंचायत समित्यांमध्ये सभापती निवडून आणले आहेत. सेनेला सात पंचायत समित्यांमध्ये सत्ता मिळाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँगे्रसने सर्वांना मदत करीत चार पंचायत समित्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. भाजप, माकप आणि शिवसेनेलाही राष्ट्रवादीने मदत करून पंचायत समित्यांमध्ये आपले बस्तान बसवण्यासाठी वाटेल ते करण्याची वृत्ती दाखवली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण सत्तेसाठी काहीही करून कोणत्याही राजकीय पक्षाला मदत करण्याची वृत्ती या पक्षाने दाखवली असल्याने या पक्षाने राजकीय धोरणाला तिलांजली दिल्याची टीकाही जि.प.अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर आहे. तर काँगे्रसने या पक्षाला धडा शिकवण्यासाठी शिवसेनेला मदत करण्याचा विडा उचलल्याचे चित्रही दुसर्‍या बाजूला आहे.

शिवसेनेसह राष्ट्रवादीने जि.प.अध्यक्ष निवडीच्या रिंगणात उडी घेतली आहे. तर भाजप, काँगे्रसनेही उपाध्यक्ष पदावर डोळा ठेवला आहे. कोण कोणाबरोबर युती, आघाडी करतो यावर विषय समित्यांच्या सभापतींची वाटणीही अंतिम टप्प्यात ठरल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

*