आजी-आजोबांसह गिते कुटुंबियांचा आनंदोत्सव

0

जुने नाशिक । दि. 14 प्रतिनिधी
माजी महापौर वसंत गिते यांचे मोठे चिरंजीव प्रथमेश गिते मनपा निवडणुकीत विजय होऊन उपमहापौरपदी विराजमान झाल्याने संपूर्ण गिते परिवारात आनंदाची लहर पसरली.  ‘कमल निवास’ या गितेंच्या बंगल्यावर परिवारातील सर्व सदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

गिते परिवारातील दुसरी पिढी आता राजकारणात सक्रिय झाली आहे. पदार्पणातच उपमहापौरपदाची संधी मिळाल्याने परिवारात आनंदाचे वातावरण आहे. प्रथमेशने पहिल्यांदाच प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवत सेना, काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांना चित करत ते जायंट किलर ठरले.

प्रथमेश यांना वडील माजी आ. वसंत गिते यांचा राजकयि वारसा लाभला आहे. नगरसेवक, महापौर व मध्य नाशिकचे आमदार असा प्रचंड मोठा राजकीय अनुभव असलेल्या वसंत गिते यांनी केलेल्या नियोजनामुळे यश मिळाले, यात शंका नाही. यंदा महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने भाजपचाच महापौर, उपमहापौर होणार याची खात्री होती. त्यामुळे केवळ निवडीची औपचारिकता बाकी होती.

आज सकाळपासूनच गितेंच्या निवासस्थानी कुटुंब, आप्तस्वकीय, मित्रपरिवाराने गर्दी केली होती. प्रथमेशचे आजोबा व वसंत गितेंचे काका रामदास गिते, आजी शकुंतला गिते, प्रथमेशचे काका विजय गिते, भावजई धनश्री गिते, आत्या अनुसया शिंदे, काजल फडके, वर्षा नाशिककर यांच्यासह परिवारातील महिला, पुरुष मंडळी जमा झाले होते.

मुंबई नाका हा वसंत गितेंचा पूर्वीपासून बालेकिल्ला आहे. गिते यांनी राजकीय चढ-उतारमध्ये कधीही जनतेशी नाते तोडले नाही. शहराच्या विकासातदेखील त्यांचा मोठा वाटा असून यामुळेच मुलगादेखील पहिल्याच टप्प्यात थेट उपमहापौर झाला. प्रथमेश गिते यांचा कीर्ती वैद्य यांच्याशी साखरपुडा झालेला आहे. घरातील आनंदोत्सवात कीर्तीदेखील सामील झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

*