आघाडीचा बहिष्कार; स्थायी, मबाक बिनविरोधची घोषणा

0

जाधव, भूतकरसह शिवसैनिक शिवालयात!

समदखान, दुल्लम गैरहजर
सभापती निवडीच्या विशेष सभेला राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा गटनेते समदखान तसेच सेनेचे मनोज दुल्लम हे दोघे गैरहजर होते. फौजदारी गुन्ह्यात समदखान जेलमध्ये आहे तर वैयक्तिक कारणामुळे येण्यास विलंब झाल्याचे दुल्लम यांनी सांगितले.

अहमदनगर (प्रतिनिधी)– महापालिकेच्या स्थायी आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापती निवडी अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाल्या. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी अभय महाजन यांनी स्थायी समिती सभापती पदी सुवर्णा जाधव तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती पदी सारिका भूतकर यांच्या नावाची घोषणा करताच महापालिकेत जल्लोष सुरू झाला. दोघींनीही लगेचच पदाचा पद्भार स्वीकारला. गुलालाची उधळण करत नवनियुक्त पदाधिकारी मिरवणुकीने शिवालयात पोहचले.
जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी सभापती निवडीसाठी विशेष सभेस सुरूवात झाली. स्थायी समितीसाठी मनसेच्या सुवर्णा जाधव यांचा तर महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी सारिका भूतकर, उपसभापती पदासाठी सुनीता मुदगल यांचे प्रत्येकी एक अर्ज असल्याने निवडी बिनविरोध होणार होत्या. विरोध केला तरी हाती काही लागणार नाही याची कल्पना असल्याने विरोधी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांनी विशेष सभेकडे पाठ फिरविली. पीठासीन अधिकारी महाजन यांनी निवडीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नूतन सभापती, उपसभापतीच्या नावाची घोषणा केली.
पीठासीन अधिकार्‍यांनी घोषणा करताच शिवसैनिकांनी पालिकेत एकच जल्लोष केला. सुवर्णा जाधव यांनी लगेचच पदाची सूत्रे स्वीकारली. मावळते सभापती सचिन जाधव यांनी त्यांचे समिती कक्षात स्वागत केले. भूतकर यांनीही लगेचच पद्भार घेतला. जाधव, भूतकर समर्थकांनी गुलालाची उधळण करत घोषणबाजी केली. महापालिकेतूनच मिरवणुकीने पदाधिकारी थेट शिवालयात पोहचले. तेथे माजी आमदार तथा उपनेते अनिल राठोड यांनी जाधव, भूतकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

LEAVE A REPLY

*