आंदोलनात अयोग्य टाळावे

0
विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी पुकारलेला संप अचानक मागे घेतल्याची घोषणा कुणा उपटसुंभाने केली व शेतकर्‍यांचा संताप वाढवला. परिणामी संप पुढे चालवण्याचा निर्धार केला गेला. आता संपाच्या नेतृत्वासाठी सुकाणू समिती स्थापन झाली आहे. संप चालू ठेवावा व पुढील धोरण ८ जूनला सुकाणू समितीने आखावे, असे ठरवण्यात आले आहे.
आंदोलनाला सुरूंग लावण्याचा आगाऊपणा करणार्‍यांना आंदोलक शेतकर्‍यांनी मोठा धडा शिकवला आहे. पुन्हा श्रेयाच्या मोहाला कुणी बळी पडू नये याची काळजी घेतली आहे. राज्यातील शेतकर्‍यांच्या मागण्यांची तड लागायला हवी. गेले वर्षभराहून जास्त काळ त्यांना झुलवले गेले आहे. थोडी सहृदयता दाखवली गेली असती तर कदाचित आंदोलन टळले असते.

तथापि या आंदोलनातील अयोग्य भाग वगळता आला नसता का? काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लावण्याचा व शेतीमाल वाहून नेणार्‍या गाड्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. शेतकर्‍याने मेहनतीने पिकवलेला शेतीमाल अनेक ठिकाणी रस्त्यावर फेकून देण्यात आला. भाज्यांचे ट्रक पालथे करण्यात आले.

दुधाचे टँकर रस्त्यावर रिकामे केले गेले. उन्हातान्हात घाम गाळत चोवीस तास काबाडकष्ट करून पिकवलेला शेतीमाल स्वहस्ते रस्त्यावर फेकून द्यायला शेतकरी का उद्युक्त झाले? त्यांच्या समस्या सोडवण्याकामी झालेले अक्षम्य दुर्लक्ष याला जबाबदार आहे. त्या उग्र कृतीतून शेतकर्‍यांची असहाय्यताच स्पष्ट होते.

हे खरे असले तरी रोज अर्धपोटी झोपणार्‍यांना किंवा घोटभर दूधही नशिबी नसणार्‍यांना दूध व शेतीमालाच्या नासधूशीची दृष्ये पाहताना काय वाटले असेल? पिढ्यान् पिढ्या जगाच्या पोशिंद्याची भूमिका निभावणार्‍या शेतकर्‍याशिवाय ती कल्पना अन्य कोण करू शकेल? असे प्रकार विधायक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लावणारे ठरतात.

ज्यांना हे आंदोलन चिरडून टाकायचे आहे व शेतकर्‍यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यासाठी जे सबबी शोधत आहेत ते या मुद्याचे भांडवल करणारच! म्हणून आंदोलनातील विध्वंसक भाग टाळण्याचा विचार सुकाणू समितीने गांभीर्याने करावा. शेतकर्‍यांचे विधायक प्रयत्न व प्रयोगशीलतेमुळे राज्यातील शेती बहरली आहे.

निर्यातक्षमसुद्धा बनली आहे. शेतकरीच जनतेचा खरा पोशिंदा आहे हे राज्यकर्तेही नाकारू शकणार नाहीत. म्हणूनच उद्या नाशिकमध्ये होणार्‍या राज्यव्यापी परिषदेत आंदोलनाची पुढील दिशा ठरवणारी सुज्ञ मंडळी विधायकतेवर भर देऊनच शेतकर्‍यांच्या जीवन-मरणाचा लढा पुढे चालवण्याबाबतची भूमिका निश्‍चित करतील, अशी अपेक्षा करावी का?

LEAVE A REPLY

*