अ‍ॅपद्वारे शोधणार गॅसधारक ; जिल्हा पुरवठा विभागामार्फत मोहीम सुरू

0

नाशिक : अनेक गॅसधारक केरोसिनचा लाभ घेत असल्याने अशा गॅसधारकांचा आधार स्टेटस अ‍ॅपद्वारे शोध घेतला जाणार आहे. याद्वारे कुठल्या ग्राहकाकडे गॅस कनेक्शन आहे याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता कुठलाही ग्राहक गॅस सिलिंडर असतानाही केरोसिनचा लाभ घेऊ शकणार नसून केरोसिनमध्ये होणारी चोरीही थांबण्याची शक्यता वाढली आहे.

जिल्ह्यात गॅसधारकांची संख्या वाढत असताना रॉकेल वापरात घट होणे गरजेचे असताना ती कमी झालेली दिसत नाही. त्यामुळे किती रेशनकार्डधारक गॅसचा वापर करतात याची शोधमोहीम प्रशासनाकडून हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी दिली. ज्या नागरिकाकांकडे गॅस कनेक्शन आहे त्यांना केरोसिन देण्यात येऊ नये, असा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र दोन्हींचाही लाभ अनेक ग्राहकांकडून घेतला जात आहे. केरोसिन दुकानदारही प्रशासनाकडे गॅसधारकांच्या यादीची मागणी करत आहेत.

प्रशासनाकडून त्यांना यादीच मिळाली नसल्याने त्यांनी ग्राहकांच्या स्वघोषणापत्राच्या आधारवरच ग्राहकांना रॉकेल द्यावयाचे की नाही याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक ग्राहक गॅस आणि केरोसिन असा दोन्हींचाही लाभ घेत आहेत. परंतु आता आधार स्टेटस अँपमुळे गॅसधारकांचा शोध घेणे पुरवठा विभागाला सहज शक्य होणार आहे. या अ‍ॅपमध्ये ग्राहकांचा आधार नंबर टाकल्यास त्याच्याकडे गॅस कनेक्शन आहे की नाही, असल्यास कुठल्या कंपनीचे आणि कुठल्या एजन्सीचे आहे याची माहिती समोर येईल.

हे अ‍ॅप सर्वच तहसीलदार आणि तलाठ्यांना डाऊनलोड करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता केरोसिनसाठी अर्ज केलेल्या ग्राहकांचा आधार नंबर त्यात टाकल्यानंतर साहजिकच त्याला केरोसिन द्यायचे की नाही याचा निर्णय घेता येईल. 1 एप्रिलपासून ही प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*