Type to search

ब्लॉग

…असा व्हॉट्स अ‍ॅप गृप दुष्काळी गावागावात हवाच!

Share
जगात पंचमहासागरासह अनेक लहान-मोठ्या सागरात जलाशयाने पृथ्वीवरील एकुण 72 टक्के भूभाग व्यापलेला आहे. पण तरीही पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर जगाची तहान सोकाळलेली आहे. याला कारण म्हणजे एकुण पाण्याच्या साठ्यापैकी 96.5 टक्के खारे पाणी असून, फक्त 1.5 ते 1.75 टक्के पाणी गोडे आहे. म्हणजे पिण्यायोग्य आहे. उर्वरीत पाणी आर्टिक आणि अंटार्टिका महासागरातील बर्फामध्ये बंदीस्त असून त्याचा विनियोग होत नाही.

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी आपल्या एका अभिभाषणात म्हटले होते की, मानवनिर्मित कृत्रीम वस्तू व सेवा (उदा.संगणक, मोबाईल आदि.) ह्या भविष्यात स्वस्त होत जातील पण नैसर्गिक वस्तू (उदा.पेट्रोल, अन्नधान्ये, पाणी इ.) यासारख्या वस्तू महाग होतील किंवा त्यांची टंचाई निर्माण होईल. त्यासाठी मानवाने जाणिवपूर्वक नियोजन करून निसर्गदत्त वस्तूचे संवर्धन केले पाहिजे. अर्थतज्ञ कलाम साहेबांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरतोय…! निसर्गनिर्मित ज्या वस्तू दुरापास्त होत आहेत, त्यात पाणी जरा जास्तच भाव खात आहे. परदेशामध्ये समुद्राच्या खार्‍या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्यासाठीचे ‘डी-सेलीनेशन प्लांट’ मोठ्या प्रमाणावर उभारले जात आहेत. मात्र भारताच्या आजुबाजुला तीन महासागर रेंगाळत असले तरी आपल्याकडे एकही डी-सेलीनेशन प्लांट अद्याप सुरू झालेला नाही, कारण आपल्या राज्यकर्त्यांना कदाचित अजूनही अभ्यास करायला अवधी लागत असेल. जनतेसाठी आवश्यक आणि हितकारक गोष्टींची अंमलबजावणी कुठल्याही राजकीय पक्षांकडून केली जात नसल्याने जनतेचे कैवार पक्षी तहानलेलेच आहेत.

देश कभी भूक-गरीबी-बेकारी
और इलेक्शन की चपेट मे है ।
इस से भी बच गया तो जालीम,
नेताओं के पेट में है ।

…अशी अवस्था झाली आहे. आपण सारेच दरवर्षी या सरकारी यंत्रणेचा चांगलाच अनुभव घेतोय… पाणी टंचाई सुरू झाली की, दरवर्षी जिल्हा प्रशासनातील लगबग वाढू लागते आणि बैठकांचे सत्र सुरू होते. टंचाई निवारणाचे आराखडे कागदावर तयार होऊ लागतात. तातडीच्या निधीची मागणी केली जाते. उपाययोजनांच्या यादीचे कागद या आढावा बैठकीतून फिरू लागतात. यंत्रणा संक्रीय झाल्याचे दिसते. पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. घोट-दोन घोट पाणी काहींपर्यंत पोचते आणि सरकारी प्रयत्न थांबतात… हे सरकारी दुष्काळचक्र आता सार्‍यांच्याच परिचयाचे झाले आहे. म्हणून मग आता या सरकारी मदतीवर जोगवा मागण्याची सवय जरा कमी केली पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगून ठेवलेल्या उक्तीप्रमाणे…

आपला आपण करावा उध्दार, तरावया पार भवसिंधू… असे म्हणत जोमानं उभं राहीलं पाहिजे. आपल्या जे हाती आहे, ते उदात्ततेने समाजासाठी करण्याचा चंग बांधला पाहिजे. पणतीरूपी कार्य… खारीचा वाटा… फुल ना फुलाची पाकळी… या म्हणींचा प्रत्यय प्रत्यक्षात उतरविला पाहिजे. बोदवड (जि.जळगाव) येथील काही तरूणांनी असाच एक उपक्रम सोशल मिडीयाच्या व्हॉट्स अ‍ॅफ गृपच्या माध्यमातून सुरू केला आणि सरकारी मदतीपेक्षाही सरस मदत सर्वसामान्य नागरीकांमधून मिळू लागली, पाण्याच्या टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणावर कमी होऊ लागल्या… नेमकं काय केलयं. या तरूणांनी… त्यांच्या या प्रबोधनात्मक, अनुकरणीय प्रयत्नांची माहिती घेऊ या…!

एक टँकर माझ्या तर्फे जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुका म्हणजे कायम दुष्काळी तालुका… या तालुक्याला पिण्याच्या पाण्याचा कायम स्त्रोत नाही, जवळच वीस कि.मी.अंतरावर मुक्ताईनगर येथील तापी नदी आहे. येथून ओडीए पाईपलाईन द्वारा पाणी पुरवठा होतो. मात्र वीज बील आणि जुनाट यंत्रणेमुळे गळती या समस्यांमुळे येथे तीन आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. “तापी उशाला आणि कोरड घशाला” अशी साधारण अवस्था आहे. वास्तविक राजकीय इच्छाशक्ती असती, तर आतापर्यंत बोदवडला नियमीत पाणी मिळू लागले असते. पण ही राजकीय चालढकल सर्वश्रुत आहे… असो!

मार्च 2019 मध्ये बोदवड शहरातील काही युवक असेच एकत्र आले. आणि आपल्या तालुक्यातील पाणी टंचाई निवारणासाठी काही करता येईल का? यावर विचारमंथन सुरू झाले. आणि ‘एक टँकर माझ्यातर्फे’ असा एक व्हाट्स अ‍ॅप गृप स्थापन करण्याची संकल्पना पुढे आली. आणि परिसरातील सामाजिक जाणिव असणार्‍या होतकरू लोकांना या गृपमध्ये सहभागी करून घेतले. आणि बघता-बघता दुष्काळ निवारण समिती तयार झाली आणि लाखो लिटर पाणी तहानलेल्या गावापर्यंत नियोजनपूर्वक पोहचू लागले.

एक टँकर माझ्यातर्फे… या अभियानांतर्गत सहा हजार लिटरचे एक टँकर किंवा त्यासाठी लागणारे रूपये 600 एवढे शुल्क दात्यांकडून घेतले जाते. या अभियानाचे खरे प्रवर्तक आहेत, बोदवड येथील उमेश चोपडा! एक सामान्य उद्योजक तरूणाच्या मनात ही संकल्पना निर्माण झाली. त्याला कारणही तसेच घडले… उमेश चोपडा त्यांच्या एका स्नेहीजनांच्या विवाह समारंभासाठी मनुर गावी गेले होते. जातांना गावातील आटलेले पाणवठे आणि हंडाभर पाण्यासाठी दाही-दिशा भटकणार्‍या भगिनी त्यांनी बघीतल्या… पण विवाह समारंभात पोचल्यावर त्या ठिकाणी भव्य शामियाना… धडाकेबाज डी.जे… पक्वान्नांच्या जेवणावळी आणि मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला जाणवला. ज्यांच्याकडे विवाह होता. त्यांची भेट घेतल्यानंतर चोपडाजींनी सहज म्हणून वधुपित्याकडे विषय काढला व म्हणाले, ‘विवाह समारंभ अगदी थाटात पार पडतोय, यात शंका नाही… मात्र या खर्चातून बचत करून काही पैसा, पाण्यासाठी वण-वण भटकणार्‍या आपल्या बांधवांसाठी खर्च करता आला तर बघा ना!’ चोपडाजींच्या या आवाहनास तात्काळ प्रतिसाद देत वधुपित्याने होकार भरला आणि 10 टँकर पाणी गावात पुरविण्यासाठी निधी दिलाही… आणि येथूनच ‘एक टँकर माझ्यासाठी ही संकल्पना रूजली. नंतर उमेशजींनी गावातील दानशूर लोकांजवळ टँकरसाठी शब्द टाकला. लोक आनंदाने तयार होऊ लागले. विशेष म्हणजे, कुणीही शब्द खाली जाऊ दिला नाही. नंतर मित्रांच्या समन्वयातून व्हॉट् अ‍ॅप वर ‘एक टँकर माझ्यासाठी’ हा गृप निर्माण करण्यात आला.

असे होते टँकर नियोजन
‘एक टँकर माझ्यासाठी’ या गृपमधील सदस्य, मित्र अथवा टंचाईग्रस्त गावातील नागरीक यांच्या निरीक्षणातून टँकर पाठविण्यासाठीच्या गावाची किंवा स्थानाची निश्चिती केली जाते. टँकर साठीच्या खर्चाची तरतूद करणेसाठी दाता निश्चित केला जातो. सर्व टँकर भाडेतत्वावर नेमली जातात. टँकर चालकासोबत दुष्काळ निवारण समितीचे एक रिसीट बुक असते. त्यावर ज्या दात्याने टँकरसाठी दान दिले असेल, त्याचे नावाने रिसीट लिहीली जाते. व टँकर मालकास पैसा अदा केले जातात. ज्या ठिकाणी टँकर पोहचते, त्या ठिकाणी समितीचे सक्रीय सदस्य टँकर पाणी वितरणाचे फोटो आणि व्हीडीओचित्रण करून घेतात. टँकरच्या मागे टँकरसाठी मदत देणार्‍या दात्याचे नाव लिहिलेले असते. व्हीडीओचित्रणात हे सारे दिसून येते. व टँकरसाठी दान करणार्‍या व्यक्तीलाही आपले दान सन्मार्गी लागल्याचे समाधान लाभते. टँकरद्वारा पाणी वितरणाचे फोटो आणि व्हीडीओ ‘एक टँकर माझ्यासाठी’ या गृपवर व्हायरल केले जातात. मी कालपर्यंत हे लिखाण करेपावेतो 123 टँकर दुष्काळी भागात पोचले होते.

विशेष म्हणजे या दुष्काळ निवारण समितीचा कोणीही अध्यक्ष नाही, सचिव नाही, प्रमुख नाही… सुरूवातीला यात सहभागी असलेल्या व्यक्तींनी, ‘आमचे नावही छापू नका!’ असे नम्रतेने सांगितले. पण या कार्याची माहिती होऊन आपणास मदत प्राप्त होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊन त्यांची नावे देण्याचे निश्चित झाले.आज मितीस ‘एक टँकर माझ्यासाठी’ या अभियानात केवळ स्थानिक लोकच मदत करत नाहीत, तर पुण्यासारख्या शहरातून सुध्दा मदत मिळू लागली आहे. आतापर्यंत 28 जलदात्यांकडून 123 टँकर रिचविण्यात आले आहे. कुणी मुला-मुलींच्या वाढदिवसानिमित्त, कुणी पुण्यस्मरणानिमित्त, कुणी विवाह समारंभात वधु-वरांकडून… तर कुणी सामाजिक भावनेतून अशी टँकर सेवा देत आहेत. अजून मे-जून महिना कडाक्याच्या टंचाईचा असणार आहे. या एप्रिल महिन्यापर्यंत टँकर दात्यांची संख्या उपलब्ध आहे. मात्र मे महिन्यात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी कुणाला मदत करण्याची ईच्छा असल्यास 1) हरीओम जैस्वाल (9422284535), 2) उमेश चोपडा (9421516175), 3) नितीन कोल्हटकर (8407916619) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आहे. याशिवाय गृप स्थापन करून होतकरू तरूणांनी प्रेरीत व्हावे, हीच चावडीलेखन प्रपंचामागील भावना…

पुरुषोत्तम गड्डम

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!