अश्विनी काळे व पूजा चौधरीस सुवर्णपदक

0

दक्षिण आशियाई ऑलिम्पिक योगास्पर्धेवर अकोलेचे वर्चस्व

अकोले (प्रतिनिधी)- कोलंबो(श्रीलंका) येथे झालेल्या दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय स्टुडंट ऑलिम्पिक योगा स्पर्धेत अकोले येथील खेळाडू अश्विनी सोमनाथ काळे व पूजा चौधरी-बिन्नर हिने सुवर्णपदक पटकावले आहे.
अश्विनी हिची कौटुंबीक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील सोमनाथ काळे हे घड्याळ विक्री व दुरुस्तीचे काम करतात. शालेय जीवनापासूनच अश्विनी हिला योगा या क्रीडा प्रकाराची विशेष आवड होती.

 

तिचे माध्यमिक शिक्षण येथील मॉडर्न हायस्कूल येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण अगस्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोले येथे सुरू आहे. शालेय व महाविद्यालयीन विविध स्पर्धांत राज्य व देश पातळीवर तिने यापूर्वी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. विविध पारितोषिके, मेडलची लयलूट केली आहे. जिद्द, चिकाटी, परिश्रम या जोरावर तिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले आहे.

 

स्टुडंट ऑलंपिक असोसिएशनच्यावतीने दक्षिण आशियाई योगा, बुद्धिबळ, कबड्डी, व्हॉलिबॉल व कराटे स्पर्धा नुकत्याच कोलंबो येथे झाल्या. या स्पर्धेत भारतातून 51 स्पर्धक सहभागी झाले होते. योगा या क्रीडा प्रकारात भारतीय संघातून तिची निवड झाली होती.अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूचा दारुण पराभव करत ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तिला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.राहुल भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्वांच्या सहकार्यामुळेच यश
मला लहानपणापासून योगाची आवड होती. याकामी मला क्रीडाशिक्षक गुरुवर्य दिलीप झोळेेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. माझे आई, वडील, भाऊ यांची खंबीर साथ मिळाली. तसेच त्यांचे कायमच प्रोत्साहन मिळाले.अकोलेतील वडीलधारी मंडळी व गुरुजनांच्या आशीर्वादामुळेच मला हे यश मिळालेले आहे. या पुढील काळात देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– अश्विनी काळे, खेळाडू

आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत सलग दुसर्‍या वर्षी अकोले महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूजा चौधरी-बिन्नर या विद्यार्थिनीने सुवर्णपदक पटकावले.
अकोले महाविद्यालयाला तिने सलग दुसर्‍या वर्षी सुवर्णपदक मिळवून दिल्याने तिचे कौतुक होत आहे. पूजा चौधरी-बिन्नर हिला अकोले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, सचिव यशवंत आभाळे, प्राचार्य डॉ. संजय ताकटे, प्रा. डॉ. राहुल भोसले, दिलीप झोळेकर, प्रा. डॉ. सुनील शिंदे, सुनिती आढाव, निलेश वाकचौरे आदींचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

*