अश्रूंची फुले होतांना

0

सुख:ची शिदोरी बांधणारे तुम्ही आम्ही सारेच दुख:ला नकोसे म्हणतो. परंतु दुख:च एक असे असते की ते खरे पणाची जाणीव करून देते. दुख:च मानवाला त्याचे खरे प्रतिबिंब दाखवतो, सत्य सांगतो. सुखाच्या आनंदात विलीन झालेल्या माणसाला नंतर सहन होत नाही आयुष्याच्या दुस-या नाण्याची बाजू ज्याला तो दुख: म्हणून जगा समोर सादर करतो. ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकात अभिनेता प्रशांत दामले यांनी गायलेले ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे.

श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेले आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे शब्द रसिकांच्या ओठावर आजही जिवंत आहेत. परंतु गोडबोले यांनी रचलेल्या या काव्यात सुख: म्हणजे नक्की काय असत असा प्रश्न केला आहे. जीवनातही असेच काही आहे. उत्सव आणि शोक आपल्यालाच साजरी करावी लागतात. 27 ऑगस्ट 1966 रोजी वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग झाला. 27 ऑगस्टला या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला 52 वर्ष पूर्ण होत आहेत.

कानेटकरांनी जीवनाचे वास्तव सांगून त्यांचे हे नाटक प्रसिद्ध केले. त्याचेच औचित्य म्हणून आजचा अश्रूंची फुले होतांना हा लेख लिहिण्याचे ठरविले. मानवाचा स्वभाव हा त्याचा परिचय देतो. त्याच्या परिचयातून त्याची प्रतिष्ठा आणि सामजिक बांधिलकी निर्माण होते तेवढिच त्याची ओळख बनते. आपले मुल्यांकन करण्यासाठी समाजातील लाखो करोडो लोक आहेत. त्यामुळे स्वतःचे मुल्यांकन करणे आपल्याला कधीच जमले नाही.

बहुधा हेच आपल्या सर्वांना मान्य करावे लागते आणि ते योग्यच आहे कारण संत तुकोबाराय सांगतात निंदकाचे घर असावे शेजारी तेच आपल्या चुका दुरुस्त करतात. प्रा.वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या अश्रूंची झाली फुले या नाटकात जीवनाचे असेच वास्तव अधोरेखित केले आहे. जीवनाची सुरुवात आणि सांगता कशी होईल हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला नाहीच हे आपले कर्म आणि येणारी वेळच ठरविते.

कानेटकर मुळचे सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचे 20 मार्च 1920 साली त्यांचा जन्म झाला. मराठी भाषेतील कवी गिरीश त्यांचे वडील, म्हणून साहित्याची नाळ चांगलीच जुळलेली. शेवट पर्यंत त्यांचे वास्तव नाशिक येथील शिवाई बंगल्यात राहिले. नाटककार कानेटकर हे हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांनी इथे ओशाळला मृत्यू, आकाश मिठी, अखेरचा सवाल, कधीतरी कोठेतरी, गोष्ठ जन्मांतरीची, छु मंतर अशी 43 नाटके व 4 कादंबर्‍या लिहिल्या. त्यांची नाटके व्यावसायिकदृष्ट्या खूप यशस्वी झाली.

लेखकाच्या शब्दाला तलवारी सारखी धार असते हे सत्य आपल्याला चांगलेच माहिती आहे. शब्दच करतात जुळलेल्या मनाची तुकडे आणि शब्दच जोडतात तुकडे तुकडे झालेली मने. जीवनातील भरलेली रंग कधी बदलून जातात हे रंग भरणा-याला देखील कळत नाही. समाजाच्या या विषारी विचारांच्या डोहात प्रामाणिक आणि शुभ्र माणसाची त्यांच्याकडून हातोहात बांधून तिरडी काढली जाते. कारण गंगेत पापाची धुनी धुणारे त्याला चालत नाहीत. प्रामाणिक पणाचा थकलेला श्वाश कुठपर्यंत आवाज देईल. ज्या समाजात चांगले झाड वाहत येणा-या वाईट वा-यात उन्मळून पडली आहेत. तिथे सत्याचा टिकाव कसा लागेल.

त्यावेळी आपली बाजू मांडताना आपले मन आपल्याला साथ देत नाही. थकून जातो आपण ज्यावेळी सोंगी आपल्या भोवती असत्याची परिक्रमा घालून मोकळे होतात. परंतु आयुष्याच्या शेवटी अमरत्वाची विजय पताका त्यांचीच झळकते ज्यांनी समाजासाठी त्याग करून सत्याचा मार्ग स्वीकारला आहे. समजून घ्याव माणसाने परमेश्वराची किमया जन्म आणि मृत्युच्या दोन्ही प्रवासात रिकामा आणि एकटाच जाण्याची.

जगण्याचे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, पारतंत्र्यातील विचार करून तल्लख बुद्धीला लाल गंजाची झिलई येऊ देऊ नका. संयमाने केलेले विचार आणि जिद्दीने केलेला प्रवास तुमच्या शेवटच्या स्थानकावर आनंदाश्रूंनी फुलांचा गुच्छ घेऊन स्वागत करेल आणि समाधानाने जीवन जगल्याचा पुरस्कार देऊन तुमचा गौरव करेल. असाच आयुष्याचा प्रवास तुमचा आणि माझाही आहे. प्रश्न जीवनात आहे उत्तर जगण्यात सापडते. फरक फक्त विचारांचा आहे.
लेखक जी.एच. रायसोनी इन्स्टिट्युटचे
जनसंपर्क अधिकारी आहेत.
अमोल बाविस्कर – मो. 7798802275

LEAVE A REPLY

*