Type to search

क्रीडा

अशेस मालिका बरोबरीत इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात

Share

लंडन । पाचव्या आणि अंतिम कसोटीत ऑस्ट्रेलियावर 135 धावांनी विजय मिळवून अ‍ॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत राखण्यात इंग्लंडला यश आले. स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक मार्‍यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनाही शरणागती पत्करावी लागली. त्यामुळे पाचव्या अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशीच इंग्लंडने सामना खिशात घातला.

ऑस्ट्रेलियाला इंग्लंडने विजयासाठी 399 धावा करण्याचे आव्हान दिले होते. पण, त्यांचा डाव 263 धावांत संपुष्टात आला. मॅथ्यू वेडने 117 धावा करताना एकाकी दिलेली झुंज ऑस्ट्रेलियाचा पराभव टाळू शकली नाही. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग होती. पण, बरोबरी झाल्याने दोन्ही संघाला प्रत्येकी 56 गुण मिळाले. मालिकेत बरोबरीत झाली असली तरी गतविजेता म्हणून अ‍ॅशेस ट्रॉफी ऑस्ट्रेलिया आपल्या देशात घेऊन जाणार आहे.

इंग्लंडने आपल्या दुसर्या डावात 329 धावा केल्या. इंग्लंडने पहिल्या डावात 69 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 399 धावांचे लक्ष्य मिळाले. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. उपहारापर्यंत त्यांनी 3 विकेटस् गमावल्या होत्या. सलामीवीर मार्कस हॅरिस (9) डेव्हिड वॉर्नर (11) या दोघांना स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. त्यानंतर लाबुशेन (14) लिचच्या गोलंदाजीवर यष्टिचित झाला.

उपहारानंतर स्टिव्ह स्मिथ (23) याला बाद करून ब्रॉडने इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. त्यामुळे इंग्लंडला चौथ्या दिवशीच विजयाची आशा निर्माण झाली. पण, मॅथ्यू वेडने एका बाजूने झुंज देत इंग्लंडच्या तोंडचे पाणी पळवले. मॅथ्यूने आपले तिसरे कसोटी शतक झळकावले. त्याने 166 चेंडूत 117 धावा करताना 17 चौकार आणि 1 षटकारही ठोकला. पण, शतकानंतर दिवसाच्या शेवटच्या सत्रात तो जो रूटच्या गोलंदाजीवर आठव्या विकेटच्या रूपात बाद झाला, अन् ऑस्ट्रेलियाचा पाडाव निश्चित झाला. जॅक लिच याने नॅथन लॉयन (1) आणि जोस हेजलवूड (0) यांना पाठोपाठ गुंडाळून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लिच यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. रूटने दोन गडी बाद केले.

स्मिथच्या एकाच मालिकेत सर्वाधिक धावा
ऑस्ट्रेलियाला सामना गमवावा लागला असला तरी फलंदाज स्टीव्ह स्मिथने मात्र 21 व्या शतकात कोणालाही न जमलेला विक्रम रचला. स्मिथने अ‍ॅशेस मालिकेतील 4 सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले. एका सामन्यात त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. पण त्याने केलेल्या 4 सामन्यात त्याने तब्बल 774 धावा केल्या. 21 व्या शतकात एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्मिथने केला. त्याने या खेळीसह भारताचा लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

विंडिजविरूद्ध 1971 साली एकाच कसोटी मालिकेत 4 सामन्यांत 8 डावात गावसकर यांनी 774 धावा केल्या होत्या. पण 21 व्या शतकात मात्र असा पराक्रम करणारा स्मिथ पहिलाच फलंदाज ठरला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!