अवघ्या दोन तासात परिस्थिती नियंत्रणात

0
नंदुरबार / शहरातील शास्त्रीमार्केट परिसरात आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास अचानक दोन गटांमध्ये तुफान दगडफेक सुरु झाली.
त्यामुळे दंगलसद़ृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अवघ्या दोन तासात दंगलीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
नंदुरबारच्या इतिहासात प्रथमच एवढया लवकर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. यात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांचा सिंहाचा वाटा आहे.
दरम्यान, शहरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

शहरात गेल्या आठवडयात शास्त्रीमार्केट परिसरातील चिकन टिक्काच्या लॉरीवर झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या इसमाचे आज मुंबईत उपचार सुरु असतांना निधन झाले.

त्यामुळे आज हा वाद पुन्हा उफाळून आला. एका गटाने शास्त्रीमार्केट भागात तुफान दगडफेक सुरु केली. त्यामुळे परिसरात पळापळ झाली.

शहरात दंगल झाल्याची अफवा पसरल्याने व्यावसायिकांनी पटापट दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. यावेळी बाटल्यांमध्ये पेट्रोल व रॉकेल टाकून जाळपोळ करण्याचा दंगेखोरांनी प्रयत्न केला.

दगडफेकीचे वृत्त सार्‍या शहरात पसरल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. पोलीस कर्मचारी वेळीच दाखल झाले. तरीही दगडफेक सुरुच होती.

त्यामुळे पोलीसांना अश्रुधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या. तब्बल 35 नळकांडया यावेळी फोडण्यात आल्या. त्यामुळे जमाव पांगण्यास मदत झाली.

दरम्यान, शहरातील सुभाष चौक परिसरात असलेल्या पेट्रोलपंपाजवळ एका गटाने चाल केली. यावेळी त्याठिकाणी केवळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल मोहकर व बोटावर मोजण्याएवढे पोलीस कर्मचारी हजर होते.

पोलीस निरीक्षक मोहकर यांनी प्रसंगावधान राखून आपली पिस्तोल काढली व गोळीबार करण्याची धमकी जमावाला दिली. त्यामुळे जमाव तात्काळ पांगला.

अन्यथा याठिकाणी असलेल्या पेट्रोलपंपाजवळ मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता आली नसती. यामुळे श्री.मोहकर यांचे विशेष कौतूक होत आहे.

बाजारपेठेत अघोषित संचारबंदी
सकाळी 9.30 च्या सुमारास दगडफेकीची घटना घडल्यानंतर शहरात पळापळ सुरु झाली होती. दंगल झाल्याच्या अफवेने सार्‍या शहरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने, प्रतिष्ठाने पटापट बंद केली.

तसेच सामान्य नागरिकांनीदेखील बाजारपेठेत येणे टाळल्याने शहरात अघोषित संचारबंदी लागू झाली होती. त्यानंतर दिवसभर तसेच रात्रीही व्यावसायिकांनी आपली दुकाने बंदच ठेवली.

सायंकाळी पुन्हा दगडफेक
दगडफेकीच्या घटनेवर अवघ्या दोन तासात नियंत्रण मिळविण्यानंतर दिवसभर शांतता असतांना सायंकाळी 6.30 च्या सुमारास पुन्हा मन्यार मोहल्ला परिसरात दगडफेक सुरु झाली.

ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांना पुन्हा अश्रुधुराच्या तीन नळकांडया फोडाव्या लागल्या. यामुळे वातावरण तापले होते. परंतू नंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

दोन पोलीस अधिकारी व नऊ कर्मचारी जखमी
दगडफेकीच्या घटनेत शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक बुधवंत, श्री.डांगे या दोन पेालीस अधिकार्‍यांसह 9 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

अश्रुधुराच्या 35 नळकांडया फोडल्या
परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीसांना ठिकठिकाणी तब्बल 35 अश्रुधुराच्या कांडया फोडाव्या लागल्या. त्यामुळे जमाव पांगला होता.

विजय चौधरी यांचे पोलीसांना सहकार्य
सकाळी शहरात दगडफेक सुरु असतांना पोलीस अधिकारी व कर्मचारी जमावाला शांततेचे आवाहन करत होते. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी हे एकमेव राजकीय नेते पोलीसांसोबत नागरिकांना शांततेचे आवाहन करत होते.

त्यांनी दोन्ही संप्रदायातील लोकांना एकत्र आणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निवळले.

गोडावूनमधून तेलाचे 35 डबे लंपास
दगडफेकीची घटना घडत असतांना शहरातील सोनार खुंट भागात असलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाच्या गोडावूनमधून संजय सुप्रीम कंपनीच्या तेलाच्या 35 डब्यांची चोरी करण्यात आल्याची तक्रार संंबंधीत व्यावसयिकाने पोलीसांत केली आहे. या कंपनीचे तेल केवळ शहरात त्याच व्यावसायिकाकडे उपलब्ध असल्याने त्याने सांगितले.

25 जण ताब्यात
दगडफेकप्रकरणी 25 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

तळोदा, शहादा येथील अग्नीशमन बंब
यावेळी शहरात जाळपोळ होवून परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार, शहादा व तळोदा येथील अग्नीशमन बंब सज्ज ठेवण्यात आले होते.

विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून पाहणी
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी घटना स्थळी भेट देवून पाहणी केली. संवेदनशील भागात पाहणी करुन पोलीसांना आवश्यक त्या सुचना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे, उपअधीक्षक शिवाजी गावीत, रमेश पवार, पोलीस निरीक्षक गिरीष पाटील, दीपक बुधवंत, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.

पालिकेकडून सफाई
सकाळी झालेल्या घटनेनंतर शास्त्रीमार्केट, सुभाष चौक, सोनारखुंट, मन्यार मोहल्ला आदी भागात दगडविटा तसेच काचांचा खच पडला होता. हा खच नगरपालिका कर्मचार्‍यांनी अवघ्या काही वेळातच साफ केल्याने पालिकेचे कौतूक करण्यात आले.

शहराला छावणीचे स्वरुप
शहरात सध्या तणावपुर्ण शांतता असून ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

एसआरपी प्लाटून दाखल
सायंकाळनंतर एक एसआरपी प्लाटून शहरात दाखल झाली आहे. एक अप्पर पोलीस अधीक्षक, दहा पोलीस निरीक्षक, 20 पोलीस उपनिरीक्षक, 170 पोलीस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

परिस्थिती पुर्वपदावर
सकाळच्या घटनेनंतर व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली. सायंकाळच्या दगडफेकीची घटना घडल्यानंतर शहरात सर्वत्र शांततेचे वातावरण होते.

दुपारी 3 वाजेनंतर परिस्थिती पुर्वपदावर आली होती. तरीही तणाव मात्र कायम होता.

अफवांवर विश्वास ठेवू नये
शहरात सकाळपासून तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असतांना सोशल मिडीयाद्वारे काही प्रमाणात अफवा पसरल्या होत्या. प्रत्यक्षात परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, शहरात शांततेचे वातावरण आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी दिली. केले.

एकास पोलीस कोठडी
दरम्यान, याप्रकरणी काल दि.9 रोजी सचिन भिका मराठे रा.मराठागल्ली (नंदुरबार) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.4 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास शहरातील शास्त्रीमार्केट येथे बिर्याणीत किडा पडल्याच्या वादातून सचिन मराठे यास शब्बीर पिंजारी, साबीर पिंजारी व अन्य सहा ते सात जणांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण करून जखमी केले तसेच त्याच्या भावालादेखील बेदम मारहाण केली.

तसेच त्याच्या जवळील दहा हजाराची रोकड व एक ग्रॅम सोन्याची बाळी काढून नुकसान केले. सचिन हा दवाखान्यातून उपचार घेवून परत आल्यानंतर दि.9 जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून 9 जणांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच प्रकरणात शब्बीर पिंजारी यांनीदेखील घटनेच्या दुसर्‍या दिवशी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर सचिन मराठेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी आज सचिन मराठे यास तळोदा न्यायालयात हजर केले असता दि. 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*