अवकाळी तडाखा सुरूच

0

कांद्यासह द्राक्ष, आंबा, डाळिंब फळबागांची हानी

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – एकीकडे सूर्य आग ओकत असल्याने अंगाची लाहीलाही होत असताना, रविवारी दुपारनंतर नूर बदलला नि जिल्ह्याच्या काही भागांत दुसर्‍याही दिवशी विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटामध्ये कमीअधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ़़़़संगमनेर, श्रीगोंदा व पारनेर तालुक्यांत दुसर्‍या दिवशीही काही भागांत गारपिटीसह पावसाने दणका दिला.

 

निघोजमध्ये काही भागात गारांचा पाऊस झाला. राहुरीच्या कानडगाव, तांभेरे भागात गारा पडल्या. श्रीरामपुरात रिमझिम तर अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला होता. नगरमध्ये दीड-दोन तास पावसाच्या सरी कोसळत असल्याने नगरकरांनी चिंब होण्याचा आनंद लुटला.

 

दरम्यान, शनिवारी संगमनेर तालुक्यातील पठार भाग, अकोले व पारनेर तालुक्यांत वादळी पावसाने नुकसान झाले होते. अनेक भागांत सुरू असलेल्या पावसाने कांदा, द्राक्ष, टोमॅटो, आंबा, डाळिंब या पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर संकट कोसळले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडून होत आहे.

 

आरडगाव, केंदळ, तांदूळवाडी, राहुरी स्टेशन, मानोरी, मांजरी, मुसळवाडी या भागांत हलक्याशा सरी पडल्या. तर माहेगाव, महाडूक सेंटर, मालुंजे खुर्द, टाकळीमिया येथेही तुरळक पाऊस पडला. देवळाली प्रवरा येथे वादळी वार्‍यासह सुमारे 15 मिनिटे चांगला पाऊस झाला.

 
तालुक्याच्या पश्‍चिमेकडील मुळा धरणाच्या पट्ट्यातील बारागाव नांदूर परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रानात काढणी केलेला कांदा भिजून नुकसान झाले. तर कैर्‍या गळून पडल्याने आंबा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. वांबोरी, उंबरे, ब्राह्मणी, कुक्कडवेढे, सडे, खडांबे, गोटुंबा आखाडा भागात तुरळक पाऊस झाला. या पावसाने कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. देवळाली प्रवरा परिसरात काल सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या दरम्यानवादळी वार्‍यासह व मेघगर्जनेसह पावसाचा शिडकावा झाला.

 

सध्या परिसरात कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकर्‍यांचा कांदा शेतात काढून पडला आहे. अवकाळी पावसाने हा कांदा भिजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आठ-दहा दिवसांपासून दिवसाचे सरासरी तापमान 40 ते 44 अंशावर जाऊन पोहोचल्याने अंगाची लाहीलाही होत होती. काल अचानकपणे कोसळलेल्या पावसाच्या सरीने काही प्रमाणात उष्णतेपासून सुटका होऊन हवेत गारवा निर्माण झाला. मात्र, या पावसाने अनेक शेतकर्‍यांचा कांदा भिजला आहे.

 
सध्या आंब्याला पण चांगल्या प्रकारे कैर्‍या लागल्या होत्या. वादळाने आंब्याच्या झाडाखाली कैर्‍यांचा सडा पडला होता. हीच अवस्था जांभळाची झाली. कांद्यासह आंबा, जांभूळ या फळांचे नुकसान झाल्याने ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती परिसरात निर्माण झाली आहे. सायंकाळीच अवकाळी पाऊस आल्याने सर्वांची तारांबळ उडाली. लग्नतिथी असल्याने लग्नावाल्यांची पावसाने दाणादाण उडवून दिली. नेहमीप्रमाणेच वीज गायब झाल्याने यात आणखीनच भर पडली.

 
राहुरी शहरात वादळी वार्‍यासह दुपारी 4 वाजता पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी हलक्याशा सरी पडल्या. मात्र, साडेपाचच्या सुमारास 15 मिनिटे पावसाचा जोर वाढून दमदार पाऊस पडला. राहुरी तालुक्याच्या पश्‍चिमेकडील कानडगाव, निंभेरे, तांभेरे, तुळापूर येथे सुमारे एक तासभर मुसळधार पाऊस पडल्याने जमिनीवरून पाणी वाहू लागले होते. तर अनेक गावात गारांचा सुमारे 20 मिनिटे पाऊस झाला. वादळही झाल्याने कांद्याचे व कैर्‍याचे नुकसान झाले. रामपूर भागातही वादळी वार्‍याचा चांगलाच तडाखा बसला. म्हैसगाव, कोळेवाडी, ताहाराबादला तुरळक पाऊस पडला. वादळी वार्‍यामुळे झाडाच्या फांद्या पडल्या. तर कांद्याचेही नुकसान झाले. रात्री उशिरापयर्ंत काही ठिकाणी विजेचा कडकडाट सुरूच होता. तर तुरळक पाऊसही पडत होता.

LEAVE A REPLY

*