अल्पवयीन मुलांना सिगारेट विक्री केल्याप्रकरणी पानस्टॉल चालकावर गुन्हा

0

नाशिक : अल्पवयीन मुलांना सिगारेट विक्री केल्याप्रकरणी मानव उत्थान मंच व गुन्हे शाखा युनिट २ च्या वतीने संयुक्तपणे कारवाई करत शहरातील उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखल्या जाणार्‍या कॉलेजरोडवरील पानस्टॉल चालकाला अटक करण्यात आली आहे.

बाल न्याय अधिनियम व सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम २००३ च्या अनुषंगाने कारवाई करीत संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानव उत्थान मंच व गुन्हे शाखेच्या युनिट २ला कॉलेजरोडवरील सागर पान स्टॉल (कुसूमपुष्प अपार्टमेंट) येथे अल्पवयीन मुलांना धुम्रपानासाठी सिगारेटची सर्रासपणे विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार संयुक्तपणे सापळा रचून पानस्टॉल चालक संजय शरद धोंगडे यास दोन अल्पवयीन मुलांना सिगारेट विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले.

या कारवाईने पानस्टॉल चालकांचे धाबे दणाणले असून शहरातील पहिलीच कारवाई असल्याने या प्रकाराकडे व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकारच्या गुन्ह्यात सात वर्षांपर्यंत कैद व एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे.

या कारवाईत मानव उत्थान मंचच्या पदाधिकार्‍यांसह पोलीस उपायुक्त दत्तात्रेय कराळे, गुन्हे शाखेचे एसीपी सचिन गोर्‍हे, पो.नि. नीलेश माईनकर, स.पोनि. आर.एस.साळुंखे, व्ही.के.पगारे, व्ही.आर.नांद्रे, एम.आर.साबळे, यादव डंबाळे, राहुल सोळसे तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी भाग घेतला होता.

LEAVE A REPLY

*