अरेरे ! कोण-कोण या श्रेयाचे धनी?

0

परवा नाशिकचे नाव राज्यात सगळीकडे गाजले. ‘मनपा आयुक्त जाणार की राहणार?’ असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मनपा आयुक्तांच्या समर्थनात व विरोधात मोहिमांनी जोर धरला आहे. चूक कोणाची व बरोबर कोण? याविषयी अनेकांच्या मनात तर्‍हेतर्‍हेचे संभ्रम असावेत वा ते जाणीवपूर्वक निर्माण केले गेले असावेत का?

लोकांची सत्ता प्रमुख मानणार्‍या एका वृत्तपत्राने तर ‘नाशकातल्या निलाजर्‍यांची’ कीर्ती काल सर्वत्र नेली. याबद्दल ‘निलाजरे’ म्हटले गेलेल्या ‘नाशिककरां’ना काही म्हणावे की हे सामान्य नाशिककरांचे दुर्दैव म्हणावे? प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने नाशिकची भूमी पावन झाली असे अभिमानाने सर्व नाशिककर सतत सांगतात. आदर्श राज्यकर्ते म्हणून प्रभू रामचंद्रांचे दाखले दिले जातात;

पण याच शहरात सध्याचे राज्य कोणाचे म्हणायचे? ‘निवडून येण्याची क्षमता, निवडून आल्यावर त्या क्षमतेत कित्येक पटींनी वाढ करण्याची क्षमता, या क्षमता विस्ताराआड जो कोणी येईल त्याला संपवण्याची वा न जमल्यास वळसा घालण्याची वृत्ती, या क्षमतावाढीसाठी वाटेल त्या पक्षाशी वाटेल तितक्या वेळा घरोबे करण्याचे कसब इत्यादी व्यवच्छेदक लक्षणांनी युक्त असा हा नगरसेवक’ असे वर्णन ‘नाशकातले निलाजरे’ या अग्रलेखात केले गेले आहे.

सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत लोकप्रतिनिधींना नावे ठेवण्याची पद्धत रूढ झाली असली तरी ज्यांची ही जाहिरात मानावी ते नगरसेवक कोणती व कोणाची सेवा करतात? गेल्या काही वर्षांत राजकारणाने नवी-नवी वळणे घेतली. ज्यांना कोणतेच काम जमत नाही त्यांच्या पोटापाण्याची सोय राजकारणाच्या राजधर्मात सुखेनैव होऊ लागली. नगरसेवकसुद्धा लोकप्रतिनिधीच! नगरसेवक असोत की एखाद्या पंचायत समितीचा सदस्य; सर्वांच्या पोटापाण्याची सोय राजरोसपणे करण्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थांचे कुरण हिरवेगार ठेवले जाते.

सगळीकडे एकच तर्‍हा असताना केवळ नाशिककर नगरसेवकांना ‘निलाजरे’ ठरवण्याइतके धाडस एखादे वृत्तपत्र कसे करते? यामागे काय कारणे असावीत? नाशिकच्या नगरसेवकांना कदाचित ‘निलाजरे’ ही संभावना टोचली नसेल; पण सामान्य नाशिककरांना मात्र ती नक्कीच भयंकर टोचली असल्यास नवल नाही. याच नाशिक शहराने चार दशकांपूर्वी देशासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला.

त्याच आदर्शाचा कित्ता गिरवून देशातही चार वर्षांपूर्वी सत्तापालट झाला. समाजसेवेत व राजकारणात योग्य माणसे आल्यास शहराचा कायापालट होतो हा अनुभव नाशिककरांनी घेतला. मात्र नाशिकच्या नगरसेवकांनी कारभार कुशलतेने फारच मोठे विशेषण मिळवले. या बदलौकिकाचे श्रेय कुणाकुणाला द्यावे? ‘महाजनो येन गत: स: पंथ:’ या संस्कृत सुभाषिताचा हा ताजा तडाखा मानावा का?

LEAVE A REPLY

*