Type to search

धुळे

अरूणावतीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

Share

शिरपूर | मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला युवक येथील अरुणावती नदीवरील पवनकुट्टी बंधार्‍यात गुरुवारी बुडाला होता. एसडीआरएफच्या पथकाने घेतलेल्या अथक प्रयत्नामुळे दुसर्‍या दिवशी आज त्यांचा मृतदेह सापडला.

संदीप विजय पाटील (वय १८) रा. हुडको, शिरपूर हा युवक गुरूवारी अरुणावती नदीवर बांधलेल्या पवनकुट्टी केटीवेअर बंधार्‍यात पोहण्यासाठी गेला होता. करवंद मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बंधार्‍याचे सर्व दरवाजे उघडले आहेत. बंधार्‍यालगत पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे डोह तयार झाला आहे.

गुरुवारी दुपारी अडीच वाजता बंधार्‍यावरून उडी टाकल्यानंतर संदीप पाण्यात बेपत्ता झाला. बराच वेळ तो वर न आल्याने सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केली. आमोदे व सावळदे येथील पट्टीच्या पोहणार्‍यांनी शोध घेतला. मात्र पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने शोधकार्यात वारंवार अडथळे येत होते. एसडीआरएफ धुळे येथील पथकाचे २२ कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल यांनी सूचना देवून सहकार्य केले.

नदीकाठावर दोन्ही दिवस प्रचंड गर्दी होती. गुरुवारी अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळ पासून शोधकार्य सुरू करण्यात आले. सायंकाळी मृतदेह सापडला. संदीपचे पितृछत्र त्याच्या बालपणीच हरपले आहे. तो येथील पांडू बापू माळी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!