अमृत योजनेच्या विलंबासाठी सत्ताधारीच जबाबदार -उज्ज्वला बेंडाळे यांचा आरोप

0

जळगाव | प्रतिनिधी :  अमृत योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेली पाणीपुरवठा योजनेचे काम करण्याची इच्छा सत्ताधारी असलेल्या खाविआला दिसत नाही. ही योजना बारगडल्यास आणि विलंब झाल्यास सत्ताधारीच जबाबदार राहतील, असा आरोप भाजपच्या नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी केला. दरम्यान, विषय पत्रिकेवरील १५ विषयांना मंजूरी देण्यात आली.

मनपा स्थायी समितीची सभा सभापती डॉ.वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभा सुरु झाल्यानंतर चेतन शिरसाळे यांनी शहरात केबल टाकण्यासाठी रस्ते खोदले जात आहे. त्यामुळे जलवाहिन्याचे नुकसान होत आहे. पुन्हा अमृतच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु केल्यानंतर अडचण येईल. असे सांगताच उज्वला बेंडाळे यांनी अमृत योजना केव्हापासून सुरु होणार आहे? असा सवाल उपस्थित केला.

तसेच सत्ताधारी खाविआला अमृतचे काम करण्याची इच्छा दिसत नाही. असा टोला देखील मारला. या विषयावर चर्चा होताच शामकांत सोनवणे यांनी न्याय प्रविष्ठ बाब असल्याचे सांगताच सभापती डॉ.वर्षा खडके यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

महिनाभरासाठी दोन टँकर भाड्याने लावण्याचा निर्णय

मनपा हद्दीतील सार्वजनिक शौचालयात पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी दोन टँकर भाड्याने लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर चेतन शिरसाळे यांनी आरोग्य विभागाने ठरावात स्पष्ट उल्लेख नमूद करण्याची सुचना केली. उज्वला बेंडाळे आणि पृथ्वीराज सोनवणे यांनी तात्पुरती व्यवस्था न करता, कायम स्वरुपी नळसंयोजन आणि त्याठिकाणी बोअरवेलची दुरुस्ती करावी, असे सांगितले.

अग्निशमन अधिकार्‍यास अहवाल सादर करण्याची सुचना

मनपाच्या अग्निशमन विभागाकडे किती निधी आहे, निधीचा विनीयोग कशा पद्धतीने केला. किंवा शिल्लक किती आहे. याबाबत पृथ्वीराज सोनवणे यांनी प्रश्‍न उपस्थित केला. यावर अग्निशमन अधिकारी वसंत कोळी यांनी विविध कामांसाठी ४२ लाखाची निविदा प्रक्रिया झाली असल्याचे सांगितले. दरम्यान, पुढच्या स्थायी समिती सभेला याबाबतचा अहवाल सादर करावा, अशी सुचना सभापतींनी केली.

LEAVE A REPLY

*